‘वन्स अपॉन…इन हॉलिवूड’ – हॉलीवूड सुवर्णयुगाची दुरुस्ती

‘वन्स अपॉन…इन हॉलिवूड’ – हॉलीवूड सुवर्णयुगाची दुरुस्ती

‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ हा हॉलिवूडच्या सुवर्ण युगाचं संगीत आणि चित्रपटाचा महोत्सव साजरा करणारा सिनेमा आहे.

झायराची एक्झिट
बॉलिवुडच्या नजरेतून काश्मीर
बॉलीवुडमधून हजारो कोटींची वसुली – मलिक

प्रसिद्ध दिग्दर्शक क्वन्टीन टेरेन्टिनोच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटाला यंदा १० ऑस्कर नामांकनं मिळाली होती पण प्रत्यक्ष दोनच पुरस्कार मिळू शकले. २०१९च्या यशस्वी आणि सर्वांत अधिक चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांत ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटाचं नाव अग्रेसर होतं. अनेक काँट्रॅव्हर्सिज् या चित्रपटानं निर्माण केल्या आणि भूतकाळातील अनेक गोष्टींना त्यानिमित्ताने उजाळा मिळाला.

‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ हा चित्रपट हॉलिवूडच्या सुवर्ण युगाचा अस्त दाखवणारा चित्रपट. ६०च्या दशकात नवी सिनेमा पद्धती, विचार आणि तंत्रज्ञानामुळे अमेरिकन सिनेमा वेगानं बदलत चालला होता आणि अमेरिकन समाज सुद्धा. अमेरिकन राज्यक्रांती, १९२९मधील आर्थिक मंदी, दुसऱ्या महायुद्धात १९४५ मध्ये पर्ल हार्बरवरील जपानचा हल्ला त्यानंतर १९६०चं दशक हे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत धगधगतं आणि महत्त्वाचं दशक मानलं जातं. व्हिएतनाम युद्ध, नागरी अधिकार चळवळी, महिला अधिकाराचा लढा आणि विद्रोही सांस्कृतिक (काउंटरकल्चर) चळवळ यामुळे हे दशक गजबजलेलं होतं. हिप्पी चळवळ ही याच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा एक भाग. ही चळवळ ६०च्या पूर्वार्धात सुरू झाली १९६७मध्ये शिगेला पोहचली आणि १९६९मध्ये जवळपास संपलीच. त्याला कारणीभूत होतं टेट-ला बियांका हत्याकांड जे स्वतःला हिप्पी म्हणवून घेणाऱ्या मॅन्सन ग्रुपने घडवून आणलं होतं.

‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स हा याच घटनेवर आधारित आहे. या क्लायमॅक्सबद्दल बोलण्याआधी हिप्पी चळवळीबद्दल जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

१९२९च्या आर्थिक मंदीतून बाहेर आल्यानंतर भौतिक सुखाची लालसा अमेरिकेत वाढत होती. १९६०पर्यंत अमेरिकी समाज हा पुरुषप्रधान होता. औद्योगिक अर्थव्यवस्था असलेल्या या समाजात स्त्रीने घर सांभाळावं आणि पुरुषानं अर्थार्जन करावं हे गृहीत होतं. आजच्या आपल्या भारतीय समाजातील अनेक वैशिष्ट्ये तत्कालीन अमेरिकन समाजात पहायला मिळतात. उदा. संयुक्त कुटुंब, मुलीनं लग्न होईपर्यंत व्हर्जिनच राहायला हवं, घरकामात कुशल आणि स्त्रीसुलभ गोष्टींत मुलींनी पारंगत असावं, प्रत्येक पुरुषानं अधिकाधिक अर्थार्जन करून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवावं, इत्यादी इत्यादी. अमेरिकेतले पालक सुद्धा त्यांच्या पाल्यांना गुंतवणूक समजायचे आणि त्यांच्यावर स्वतःची स्वप्नं लादायचे.

१९४०नंतर जन्मलेल्या पिढीला सर्व भौतिक सुखसोयी आयत्याच मिळाल्यानं त्यांची बौद्धिक आणि आध्यात्मिक गरज वाढत गेली आणि पारंपरिक अमेरिकन कौटुंबिक मूल्यांना १९६०च्या पूर्वार्धात नव्या पिढीनं धक्के द्यायला सुरुवात केली. रोज सकाळी उठणं, कॉलेजला जाणं, नोकरी आणि नंतर छोकरी मिळवण्यासाठी धडपड करणं, ठरवून दिलेले कपडे घालणं, मोठ्यांशी बोलतांना अभिव्यक्तीच्या मर्यादा पार न करणं अशा पठडीतल्या संस्कारांना ही नवी पिढी विरोध करायला लागली. गाडी, बंगला, प्रतिष्ठा या चंगळवादाला नाकारू लागली. पण पालक जेव्हा या विरोधाला जुमानत नाहीत असं दिसायला लागलं तेव्हा हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी घरदार, कॉलेज सोडून पांथस्थ म्हणून बाहेर पडले. जगण्यासाठी कमीतकमी वस्तूंचा वापर करणं, कमी खाणं, मिळेल ते कपडे घालणं, केस वाढवणं अशी मिनीमॅलिस्ट विचारधारा यांच्यात रुजायला लागली. व्हिएतनाम युद्धाला विरोध, जागतिक शांतता, मुक्त सेक्स, प्रेम, सद्भावना, संगीत, नृत्य आणि आध्यात्मिक जागृतीसाठी ड्रग्सचा वापर ही या चळवळीची वैशिष्ट्ये. भारतीय सितार आणि हरे रामा हरे कृष्णा तत्वज्ञान हे सुद्धा याच चळवळीचा भाग बनलं. आयुष्य हे फक्त अमेरिकन स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसून काहीतरी वेगळं हासिल करण्यासाठी आहे; पण काय हे ठावूक नसल्यानं ही पिढी हळूहळू सैरभैर आणि प्रयोगशील (एक्सपेरिमेंटल) व्हायला लागली.

समाजानं ठरवून दिलेल्या प्रत्येक मूल्यांना नाकारून एक वेगळं समानतेचं, शांती आणि प्रेमाचं जग उभारण्याचं स्वप्न उराशी घेऊन हे तरुण हिप्पी कॅलिफोर्नियाकडे वाटचाल करू लागले. १९६७मध्ये कॅलिफोर्नियाजवळ हेईत ऍशबरी जिल्ह्यात ‘समर ऑफ लव्ह’ हा महोत्सव घेण्यात आला जेथे एक लाखांवर लोक जमले ज्यात अधिकांश युवक युवती होत्या.
या चळवळीदरम्यान जागतिक संगीताला कलाटणी देणारे अनेक रॉक बँड अस्तित्वास आले. ‘बीटल्स’, ‘द डेव्ह क्लार्क फाइव्ह’, ‘रोलिंग स्टोन’, ‘द हू’, ‘द किंक’हे त्यांपैकी काही. जिमी हेंड्रीक्ससारखा गिटार वादक आणि बॉब डिलनसारखा महान गीतकार ही याच चळवळीची देण. ‘गिव्ह पिस अ चान्स’, ‘ब्लोविंग इन द विंड’, ‘वेअर द फ्लॉवर’, ‘लव द वन यू आर विथ’, ‘कॅलिफोर्निया ड्रीमिंग’, ‘पिस ट्रेन’, ‘टीच युअर चिलड्रेन’ ही काही त्यावेळची गाजलेली गाणी या चळवळीपासून प्रेरित झाली होती आणि त्यांनी पुन्हा या चळवळीला प्रेरित केलं. हिप्पी हे शांतीचा संदेश देणारे, निरुपद्रवी म्हणून सामान्य लोकसुद्धा या हिप्पींना आश्रय देत होते. हळूहळू हिप्पींचे तत्वज्ञान समाजात झिरपायला सुरुवात झाली होती.

मात्र ८ आणि ९ ऑगस्ट १९६९च्या रात्री चार्ल्स मॅन्सन या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या हिप्पी लीडरने त्याच्या पंथातील काही तरुण तरुणींची माथी भडकवून ९ लोकांची हत्या घडवून आणली. शेरॉन टेट ही अभिनेत्री प्रसिद्ध दिग्दर्शक रोमन पोलन्सकी यांची बायको. लॉस एंजेलिसमध्ये भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात राहात होती. ८ महिन्याची गर्भवती असताना शेरॉनची या चार्ल्स हिप्पी पंथीयांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली. तिच्यासोबत घरात असलेल्या तिच्या मित्रांनासुद्धा जीवे मारण्यात आलं. ला बियांका सोबत सुद्धा दुसऱ्या रात्री हाच कित्ता गिरवण्यात आला.
हाच तो क्लायमॅक्स जो ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे पण त्याला एक वेगळी कलाटणी देऊन.

क्वन्टीन टेरेन्टिनोने या चित्रपटात भूतकाळात होऊन गेलेल्या खऱ्या पात्रांचा काल्पनिक पात्रांशी संवाद घडवून आणला आहे. त्यामुळेच या चित्रपटात मॅन्सन पंथीय टेटला मारायला येतात पण ते चुकीच्या घरात, जिथं हॉलीवूडच्या सोनेरी युगातील प्रसिद्ध अभिनेता रिक डाल्टन (लिओनार्दो दि कॅप्रिओ) राहात असतो तेथे घुसतात. क्वन्टीन टेरेन्टिनो त्याच्या चित्रपटात ‘स्टायलाईज व्हायोलन्स’ (हिंसा) दाखवण्यासाठी नेहमी टीकेचा धनी झालेला आहे. या चित्रपटातसुद्धा अशी हिंसा त्यानं क्लायमॅक्ससाठी सांभाळून ठेवलेली दिसते. शेवटी क्लिप बूथ (ब्रॅड पिट) या मॅन्सन पंथीयांना अत्यंत क्रूरपणे मारतो. आणि शेरॉन टेट जिवंत राहते. जणू काही टाइममशीन प्रमाणे मागे जाऊन टेरेन्टिनोला हॉलिवूडच्या सोनेरी युगातली ही एक गोष्ट दुरुस्त करायची होती असं वाटत राहातं. (तसं ते सर्वांनाच वाटतं)

शेरॉन टेट सारख्या मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूनं संबंध अमेरिकेला हादरवून सोडलं होतं. चार्ल्स मॅन्सन हे नाव रातोरात सर्वत्र पसरलं. मात्र त्यामुळे हिप्पींबद्दलचं आकर्षक कमी होऊन त्याची जागा संशयाने घेतली गेली. प्रत्येक हिप्पीकडे खूनीच्या नजरेनं पाहण्यात येऊ लागलं आणि नंतर हळूहळू ही हिप्पी चळवळ संपुष्टात आली.

हिप्पी कोण होते? संसाराला त्यागून आयुष्याचा नवा अर्थ समजून घेण्याच्या जिद्दीला पेटलेले. सत्तेविरूद्ध नवी व्यवस्था निर्माण करू पाहणारे. पण ती कशी असेल याची कल्पना कुणालाच नव्हती. फक्त क्रांती करायची हाच ध्यास होता. त्यामुळेच कधी हा ध्यास त्यांना ड्रॅग ऍडिक्ट बनवून गेला तर कधी खुनी. पण या चळवळीने अनेक नवे कलाकार जगाला दिले आणि स्वातंत्र्याचा नवा अर्थ अमेरिकन रुढीवादी समाजाला समजावून सांगितला. तुमचं मुल हे तुमची गुंतवणूक होऊ शकत नाही हा विचार अमेरिकी पालकांमध्ये कायम रुजवण्यात ही चळवळ यशस्वी झाली. आज हिप्पी या शब्दाचा अर्थ बदलला आहे. सरळधोपट संसाराला कधीमधी त्यागून, शांती आणि प्रेमाच्या मार्गानं जग पाहणारा, नवे लोक जोडणारा, निसर्गाशी साधर्म्य राखणारा आणि जगण्याचे नवे आयाम शोधणारा म्हणजे हिप्पी.(तरीही ड्रग्स हे नाव हिप्पींसोबत कायम जोडलं जाईल)

‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ हा हॉलिवूडच्या सुवर्ण युगाचं संगीत आणि चित्रपटाचा महोत्सव साजरा करणारा सिनेमा आहे. रिक डाल्टन या पन्नाशीमधील सुपरस्टारच्या आयुष्याचा पडता क्रम, त्याची बदलत्या युगात टिकून राहण्याची धडपड आणि त्याच्या स्टंट मॅन क्लिप बूथशी त्याचं असलेलं भावकीचं नातं ही या चित्रपटाची मुख्यधारा आहे. मात्र या मुख्य कथानकाला जोडून शेरॉन टेट अधेमध्ये डोकावत राहते आणि तिचं कथानक मुख्य कथानकाच्या समांतर जात राहतं. हिचा कधीही खून होईल असं प्रेक्षकांना वाटत असतांनाच आश्चर्यकारक क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि ‘फील गुड’ घेऊन प्रेक्षक थेटरच्या बाहेर पडतात.

सुवर्ण काळाच्या सिनेमात वाईटावर चांगल्याचा विजय हेच तत्व असायचं. खऱ्या आयुष्यात मात्र तसं नसतं. ते अनेक खाचखळग्यांनी भरलेलं असतं. आणि आयुष्यातील वाईट घटनांचा शेवट नेहमीच चांगला नसतो. सिनेमा मात्र त्याला अपवाद आहे. ‘Cinema Celebrates Life & All Is Well That Ends Well’ याच न्यायानं त्याकाळी सिनेमाचा शेवट व्हायचा(आजही होतोच). आयुष्य हे आशावादावर टिकून असतं आणि सिनेमा हा आशावाद अगदी योग्य प्रकारे साजरा करतो. त्यामुळेच ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’मध्ये दिग्दर्शक पुढं जाऊन प्रसिद्ध अभिनेत्री होऊ पाहणाऱ्या शेरॉन टेटला जीवनदान देतो आणि वाईट मॅन्सन पंथीयांना अत्यंत निर्घृणपणे कॉमिक पद्धतीनं मारतो. या चित्रपटात शेवटी हिरो हिरोईन जिवंत राहतात त्यामुळे ते आपल्या क्षेत्रात उत्तम करिअर करतीलच असा आशावाद घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. टेरेन्टिनोने हा आशावाद उत्तम पद्धतीनं साकारत हॉलिवूडच्या सुवर्णकाळाला सलामी दिलेली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0