मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. हा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत १६ लाखापेक्षा जास्त घरे ५०० चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
राज्यातील सर्वानाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
सर्वात मोठी भेट – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबईकरांच्या ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून १६ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाची मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेतात. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.
या निर्णयावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
COMMENTS