आसाममधील भाजप नेत्यावरही फेसबुकची कृपा

आसाममधील भाजप नेत्यावरही फेसबुकची कृपा

नवी दिल्लीः तेलंगणमधील भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांच्या धार्मिक द्वेष व चिथावणीखोर मजकूराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून आपले व्यावसायिक हित पाहणार्या

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम
नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार
मेवानी यांना जामीन मंजूर पण दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक

नवी दिल्लीः तेलंगणमधील भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांच्या धार्मिक द्वेष व चिथावणीखोर मजकूराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून आपले व्यावसायिक हित पाहणार्या फेसबुक इंडिया कार्यालयाने भाजपच्या आसाममधील एक आमदार शिलादित्य देव यांच्याही समाजात तेढ व द्वेष पसरवणार्या मजकुराकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त पुढे आले आहे.

अमेरिकेतील टाइम मॅगझिनच्या २७ ऑगस्टमध्ये या संदर्भात एक वृत्त आले असून ‘आवाज’ या एका आंतरराष्ट्रीय जनजागृती संस्थेच्या एक वरिष्ठ सदस्य अल्फिया झोयाब यांनी जुलै २०१९मध्ये फेसबुक इंडियाच्या नजरेत शिलादित्य देव यांच्या १८० फेसबुक पोस्ट नजरेस आणून दिल्या होत्या. आणि त्या संदर्भात फेसबुक इंडियाशी त्यांनी व्हीडिओद्वारे चर्चाही केली होती.

ही चर्चा अर्धवट झाली कारण त्यावेळी फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी शिवनाथ ठुकराल यांनी महत्त्वाचे काम आहे, असे सांगत व्हीडिओ कॉल मध्येच थांबवला व ते उठून गेले, असे झोयाब यांनी टाइम्स मॅगझिनला सांगितले.

शिवराल ठुकराल हे पूर्वी एनडीटीव्हीमध्ये पत्रकार होते आणि २०१७मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन फेसबुक इंडिया कार्यालयात भारत व द. आशिया पब्लिक पॉलिसी विभागाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. शिवराल ठुकराल हे आंखी दास यांना आपल्या कामाची माहिती देत असतात. याच आंखी दास सध्या चर्चेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ठुकराल व आंखी दास यांनी त्यांची भेट घेतल्याचा दावा ‘द रिअल फेस ऑफ फेसबुक इंडिया’ या पुस्तकाचे लेखक व पत्रकार परंजय गुहा ठाकुरता यांनी केला होता.

ठुकराल यांचे काम भारत सरकारमध्ये लॉबिंग करण्याचे असले तरी फेसबुकवर एखाद्या राजकीय नेत्याचे विधान धार्मिक विद्वेष व चिथावणीखोर असेल तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जावीत, यावर आपल्या टीमशी चर्चा करण्याचेही आहे, असे टाइम मॅगझिनच्या वृत्तात म्हटले आहे.

शिलादित्य देव हे आसाममधील होजाई या मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. गेल्या वर्षी आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात एका मुस्लिम व्यक्तीस अटक करण्यात आली होती. या घटनेवर फेसबुकवर भाष्य करताना देव यांनी बातमी शेअर करत ‘बांगलादेश मुस्लिम आपल्या आई-बहिणींना लक्ष्य करतात;’ असा मजकूर लिहिला होता. ही फेसबुक पोस्ट ८०० जणांनी शेअर केली गेली होती. या संदर्भातील एक अहवाल ‘आवाज’ने ‘मेगाफोन फॉर हेट’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला होता.

या अहवालात देव यांची ही वादग्रस्त पोस्ट एक वर्षे होती व नंतर ती काढून टाकण्यात आली. टाइमने २१ ऑगस्ट २०२० रोजी फेसबुकशी संपर्क साधल्यानंतर देव यांचा मजकूर वगळण्यात आला.

फेसबुकने आपले म्हणणे टाइमला पाठवले होते. त्यात त्यांनी ‘आवाज’ने हेट स्पीचचे उपस्थित केलेले मुद्दे आम्ही पाहिले होते. पण देव यांचा मजकूर हटवण्यात आम्ही हटवू शकलो नाही, ही आमची चूक होती अशी कबुली दिली. ‘आवाज’ने १८० हेट स्पीचच्या पोस्टची तक्रार फेसबुककडे केली होती. यातील ७० पोस्ट हटवण्यात आल्या पण या पोस्ट भाजपच्या नेत्यांच्या होत्या का, यावर टाइमच्या बातमीत स्पष्टता नाही.

देव यांचे मुस्लिमविरोधी विधान ‘आवाज’ने प्रकाशात आणल्यानंतर हा विषय आसाममध्ये एक मुद्दा बनला. राज्यात देव यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या.

२०१८मध्ये देव यांनी ईदच्या दिवशी मुस्लिम बहुसंख्य जिल्ह्यांत बॉम्बस्फोट करावेत असे बंडखोर गट उल्फाला सांगितले होते. यावरून ऑक्टोबर २०१८मध्ये ऑल आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघटनेने देव यांच्याविरोधात अनेक फिर्यादी दाखल केल्या होत्या.

जुलै २०१९मध्ये करीमगंज जिल्ह्यातील एका स्थानिक न्यायालयाने देव यांच्या आणखी एका वादग्रस्त विधानावर अरेस्ट वॉरंट जारी केले होते. आसाममध्ये राहणारे ८० टक्के मुस्लिम बांगलादेशी असून ते अवैधरित्या या देशात राहात असल्याचे विधान त्यांनी केले होते.

गेल्या जूनमध्ये मुस्लिम व्यक्तीकडून झालेल्या एका हत्येसंदर्भात देव यांनी अशीच भडकाऊ टिप्पण्णी केली. त्याविरोधात फिर्याद दाखल झाली होती.

ऑगस्टमध्ये राममंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर देव यांनी पद्मभूषण पुरस्कार विजेते व आसामचे प्रसिद्ध लेखक सैद अब्दुल मलिक यांना ‘बुद्धिनिष्ठ जिहादी’ म्हटले होते. त्यावेळी या विधानावर त्यांच्यावर अनेक फिर्यादी दाखल झाल्या होत्या. देव यांच्या विधानाचा द ऑल इंडिया स्टुडंट युनियन व असोम साहित्य सभेने निषेधही केला होता.

देव यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून नोव्हेंबर २०१८मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी त्यांना समजही दिली होती. पण तरीही देव यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाबाबतच्या विधानांमध्ये खंड पडला नव्हता. गेल्या जुलै महिन्यात देव यांनी पक्षात आपल्याला वेगळे पाडत असल्याच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचे विधाने केली होती. पण अद्याप त्यांनी तशी पावले उचललेली नाहीत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0