सुशांत सिंग प्रकरणः सत्योत्तर काळातील मिडिया ट्रायल

सुशांत सिंग प्रकरणः सत्योत्तर काळातील मिडिया ट्रायल

बातमीदारी संपली की प्रसारमाध्यमं खटले चालवू लागतात. सत्योत्तर काळातील समाजमाध्यमांमुळे जवळपास प्रत्येक व्यक्ती कुणालाही गुन्हेगार म्हणून जाहीर करू शकते.

शेती कायदे मागे; पंजाबमध्ये काय घडू शकेल?
चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान
लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला, १३० जिल्हे रेड झोनमध्ये

सुशांत सिंग राजपूतची हत्या की आत्महत्या, ह्या विषयावरचा खटला अनेक वृत्तवाहिन्यांनी चालवला. विशेषतः अर्णब गोस्वामीने. सुशांत सिंगची हत्या करण्यात आलीय, आरोपी, साथीदार, सूत्रधार यांची नावं, त्यांनी बजावलेल्या भूमिका सर्वकाही प्रसारमाध्यमांनी आणि सामाजिक माध्यमांनी जाहीर केलं आहे. बातमीदारी संपली की प्रसारमाध्यमं खटले चालवू लागतात. सत्योत्तर काळातील समाजमाध्यमांमुळे जवळपास प्रत्येक व्यक्ती कुणालाही गुन्हेगार म्हणून जाहीर करू शकते. फक्त सजा ठोठावणं बाकी असताना सीबीआयसह अन्य दोन तपासयंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केलीय.

    सुशांत सिंगचा निष्प्राण देह १४ जून २०२० रोजी त्याच्या घरी आढळला. त्याने आत्महत्या केली ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली. एकाही बातमीदाराने पोलिसांना प्रश्न विचारले नाहीत. पोलिसांनी जे सांगितलं तीच बातमी. पोलिसांना जे पेरायचं होतं ती माहिती सूत्रांकडून कळते-समजते अशा थाटात दिली गेली. गुन्हेगारी क्षेत्रातील जवळपास ९० ते ९५ टक्के बातम्या अशाच दिल्या जातात. कारण कोणत्याही वार्ताहराला पायपीट करण्याचा कंटाळा असतो. त्यासाठी आवश्यक असणार्‍या साधन-सुविधा वा रिसोर्सेस त्याच्याकडे नसतात. प्रिया राजवंश या सिनेअभिनेत्रीने आत्महत्या केली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. तिच्या मानेवर असणारे दोन वळ दुसरी शक्यता वर्तवत होते. परंतु पोलिसांनी प्रथम तिकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर मात्र मालमत्तेच्या वादातून घरकाम करणार्‍याने तिचा गळा आवळल्याचं पुढे आलं होतं. त्यावेळीही गुन्हेगारीचं वृत्तांकन करणार्‍या एकाही पत्रकाराने पोलिसांना प्रश्न विचारले नव्हते.

   सिनेपत्रकारिता वा मनोरंजन पत्रकारिता नावाची चीज अस्तित्वातच नसते. तिथे फक्त पीआर स्टोरीज म्हणजे निर्माते-दिग्दर्शकांचा जनसंपर्क वाढवण्यासाठीच्या बातम्या दिल्या जातात. त्यामुळे प्रिया राजवंश असो की सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असो, सिनेपत्रकारांनी या बातम्यांचा पाठपुरावा केल्याचं दिसत नाही.

   सर्वसाधारण वाचक-प्रेक्षकाला रहस्य आणि नाट्याचं आकर्षण असतं. विशेष बुद्धिमत्ता, कौशल्य वा प्रतिभा नसताना सिनेमा आणि गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींना मिळणार्‍या बेहिशेबी संपत्तीबद्दल असूयाही असते. याचा रहस्यभेद करणारी बातमीदारी नसल्याने गॉसिप म्हणजे कुचाळक्यांना ऊत येतो. त्यांनाच प्रसिद्धी मिळू लागते आणि त्याचं रुपांतर अनेकदा मिडिया ट्रायलमध्ये होतं. सलमान खानने दारू पिऊन कार चालवताना केलेल्या अपघाताच्या पुराव्यांची मांडणी करण्यात पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा न्यायालयात उघड झाला. ज्येष्ठ पत्रकार निळू दामले आणि निखिल वागळे यांनी या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले म्हणून!

   सुशांत सिंगच्या मृत्यू संबंधात रिपब्लिक टिव्हीच्या अर्णब गोस्वामींनी मिडिया ट्रायल सुरु करून राजकारणाला गती दिली. सुशांतच्या एका मैत्रीणीला या प्रकरणात माध्यमांनीच आरोपी ठरवलं. सामाजिक माध्यमांनीही त्याचीच री ओढायला सुरुवात केली. त्यामध्ये सिनेक्षेत्रातील अनेक हस्तींनी चिखलफेकीत रस घेतला. बिहार सरकारने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचं पाऊल उचलल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय गुप्तचर विभागाकडे जाणार हे स्पष्ट झालं. आणि तसंच घडलंही. केंद्रीय गुप्तचर विभाग, सक्तवसुली संचलनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशी तीन पथकं या प्रकरणाची चौकशी करू लागली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पी. मुरलीधरन यांनी अशी मागणी केली आहे की नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी(एनआयए )लाही या तपासकार्यात सामील करून घ्यावं.

   बातमी लिहिताना वा सांगताना स्मेल टेस्ट म्हणजे गंध परिक्षा करायची असते. त्यासाठी पुढील प्रश्न विचारायचे असतात—बातमी सत्य आहे का? अचूक आहे का? उचित आहे का? सर्व बाजू आल्या आहेत का? बातमीत सर्व व्यक्तींचा आदर होतो आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर ‘ होय’ असतील तरच बातमी लिहायची वा प्रसारित करायची असते. यालाच पत्रकारितेची नीतीमत्ता असंही म्हणतात. पत्रकारिता आणि नीतीमत्ता एकत्र नांदू शकतात का (जर्नालिझम अँण्ड एथिक्स, कॅन दे को-एक्झिस्ट)? या मथळ्याचा निबंध अँड्र्यू बेलसे यांनी लिहिला आहे (मिडिया एथिक्सः अ फिलॉसॉफिकल एप्रोच, संपादन- मॅथ्यू क्येरन). पत्रकारिता आणि नीती यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. लोकशाही प्रक्रिया सुव्यवस्थित चालायची असेल तर पत्रकारांनी अचूकता, प्रामाणिकपणा, सत्य, वस्तुनिष्ठता, निःपक्षपातीपणा, समतोल बातमीदारी आणि सामान्य लोकांच्या स्वायत्ततेचा आदर करायला हवा. हा लोकशाही प्रक्रियेचाच भाग आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात अनेक बाबींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, यशस्वी करिअर, बढती मिळवणं, डेडलाईन वा बातमी देण्याची वेळ पाळणं, माध्यम कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी निश्चित केलेली वाढीची लक्ष्यं गाठणं, इत्यादी. त्यामुळे अनेक अतिशय उथळ बातम्या रंगवून सांगण्याचा मोह टाळता येत नाही. या प्रकारच्या पत्रकारितेत लोकांच्या हितापेक्षा लोकांना कशामध्ये रस आहे याचा विचार केला जातो, या वास्तवाकडे सदर निबंधात अँड्र्यू बेलसे यांनी लक्ष वेधलं आहे. कोणताही आदर्श प्रत्यक्षात येणं अवघड असतं. परंतु आपल्या प्रयत्नांची वा वाटचालीची दिशा त्याच्यामुळे निश्चित होते. हे भान कालपरवापर्यंत पत्रकारितेला होतं. परंतु सत्योत्तर काळाने हे आदर्शच उलटेपालटे करून टाकले आहेत.

   दूरसंचार तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान यांच्या मिलाफामुळे माहितीचं उत्पादन आणि प्रसारण करणं कोणत्याही व्यक्तीला शक्य झालं आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ तथ्यांपेक्षा लोकांच्या भावना आणि श्रद्धांना संबोधित करणं सहजशक्य झालं आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस् एप या सर्व माध्यमांवर लोकांच्या भावना आणि श्रद्धांना संबोधित करणारा मजकूर (कंटेट) दुथडी भरून वाहात असतो. कारण प्रत्येक व्यक्ती मिडिया (शब्द, ध्वनी, चित्र, चित्रपट) बनला आहे. सत्योत्तर काळाचं राजकारणही जनहित आणि सत्य यांच्याभोवती नाही तर भावना आणि श्रद्धा यांच्याभोवती फिरत आहे. अमेरिका, युरोप, तुर्कस्तान, चीन सर्वत्र ह्या राजकारणाची लाट आलेली दिसते. अर्थकारण, राजकारण, पत्रकारिता, कारखानदारी सर्वांचीच नीतीपासून फारकत होऊ लागली आहे. ह्याला सत्योत्तर काळ म्हणतात.

   मात्र जगण्याच्या प्रश्नांना टाळता येत नसतं. जॉर्ज फ्लॉईडच्या खुनानंतर वर्णद्वेषाच्या विरोधात हजारो लोक वॉशिंग्टनच्या चौकात जमले. मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा आग्रह त्यांनी धरला. या उठावाची दखल अमेरिका आणि युरोपातील सर्व प्रसारमाध्यमांनी घेतली. भारतातही रेल्वे कर्मचारी संपावर आहेत, एक कोटी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत, वस्तु व सेवा कराचा वाटा राज्यांना देण्याबाबत केंद्र सरकारने हात वर केले आहेत. दैवी संकटाकडे देशाच्या वित्तमंत्री बोट दाखवत आहेत. एनडीटीव्ही अतिशय बहादुरपणे सत्योत्तर काळाचा मुकाबला करतो आहे. चांगल्या पत्रकारितेची कास धरणं म्हणजे नीतीचा आग्रह धरणं. केवळ पत्रकारितेतच नाही तर अर्थकारणात, राजकारणातही. म्हणजेच आपल्या दैनंदिन जगण्यात. बातमीदारी संपली तर प्रसारमाध्यमं- लोंढा आणि सामाजिक, खटले चालवू लागतात. त्यातून छद्म वा विकृत राजकारणाला गती दिली जाते. जगण्याचे प्रश्न पिछाडीवर पडतात. हे रोखण्यासाठी जबाबदार पत्रकारितेशिवाय अन्य पर्याय नाही.

सुनील तांबे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: