काही काँग्रेस नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची ‘बी टीम’ असल्याचे म्हटले असले, तरी ज्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार हरले आहेत ते पाहता त्यांना कोणत्याही ‘शत्रू’ची गरजच नव्हती असे म्हटले पाहिजे.
वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आणि नव्याने तयार झालेली वंचित बहुजन आघाडी (वंबआ) यांच्यातील निवडणूकपूर्व युतीबाबतची बोलणी फिसकटली. जातीयवाद विरोधी नेते आणि वरिष्ठ राजकारणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर ‘ते त्यांच्या पक्षाच्या लायकीपेक्षा फारच मागत आहेत’ अशी तीव्र टीका झाली. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे समर्थक यांनी लगेचच आंबेडकरांच्या पक्षावर भाजपची ‘बी टीम’ असा शिक्का मारून टाकला.
निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसचा संपूर्ण धुव्वा उडाला, त्यांच्या वाट्याला केवळ एक जागा आली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही कामगिरी वाईटच होती, त्यांना चार जागा मिळाल्या. आता राज्यात या पक्षांच्या पराभवाकरिता वंबआ जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
पण मतांची टक्केवारी आणि प्रत्येक ठिकाणी भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेना यांचे उमेदवार किती फरकाने जिंकले ते आकडे पाहता काँग्रेसला ‘शत्रू’ची गरज नव्हती हेच दिसून येते. हा पक्ष स्वतःचाच शत्रू होता हे सिद्ध झाले आहे. राज्यातील वरिष्ठ पक्ष नेते असे पानिपत होण्यामागची अनेक कारणे सांगत आहेत. आधीच समस्यांनी गांजलेल्या पक्षाच्या समस्यांमध्ये वंबआने आणखी भर घातली असे त्यांना वाटते.
एनडीएने जिंकलेल्या जवळजवळ सर्वच जागा एक लाखाहून अधिक फरकाने जिंकल्या आहेत. जवळजवळ २० जागांवर एनडीए उमेदवार दोन लाखांहून अधिक फरकाने जिंकले आहेत. जिथे फरक जास्त आहे त्या ठिकाणी वंबआचे अस्तित्व असून नसल्यासारखेच आहे. उदाहरणार्थ, राज्याच्या उत्तर भागातील रावेर मतदारसंघात भाजपच्या निखिल खडसे यांना ६,५५,३८६ मते मिळाली. काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना फक्त ३,१९,५०४ मते मिळाली. या ठिकाणी मतांमधला३,३५,८८२ हा फरक धक्कादायक होता. या मतदारसंघात वंबआ उमेदवार नितिन कांडेलकर यांना केवळ ८८,३६५ मते मिळाली.
त्याचप्रमाणे उत्तर मुंबईचे उदाहरण घ्या. तिथे पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना २.४१ लाख मते मिळाली तर भाजपचे गोपाळ शेट्टी ७.०६ लाख मते मिळवून पुन्हा निवडून आले. म्हणजे दोन्हीतला फरक होता ४,६५.२४७. २०१४ मध्ये ते संजय निरूपम यांच्याविरुद्ध ४,५६,३९९मतांनी निवडून आले होते. म्हणजेच या वेळी हा फरक आणखी जास्त होता.
गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये, काँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांना ४.४२ लाख मते मिळाली, जी विजयी उमेदवार भाजपच्या अशोक नेले यांच्यापेक्षा ७०,००० ने कमी आहेत. या ठिकाणी राज्यात सर्वात कमी म्हणजे केवळ पाचच उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात वंबआ आणि इतर दोन जातविरोधी पक्ष – बहुजन समाज पक्ष आणि आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया – यांनी १.५५ लाख मते आपल्याकडे खेचली, विजयी मताधिक्याच्या जवळपास दुप्पट.
अधिक मोठी समस्या
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात, हे मताधिक्य एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधते. “संपूर्ण राज्यात, भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य मोठे आहे. मतदानाचे हे चित्र कसे समजून घ्यायचे ही पक्षापुढची मोठी समस्या आहे,” सावंत यांनी द वायरला सांगितले.
वंबआमुळे पक्षाचे नुकसान होत आहे का याबाबत सावंत म्हणाले, “काँग्रेस केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतात अपयशी ठरला आहे. सगळीकडे एका ठराविक प्रकारे मतदान झाले आहे. आंबेडकरांच्या पक्षाने ‘धर्मनिरपेक्ष’ मते आपल्याकडे खेचल्यामुळे काही मतदारसंघांमध्ये आम्हाला नक्कीच त्रास झाला. पण वंबआ नसती तर काँग्रेसला त्या जागा मिळाल्याच असत्या असेही नाही. आम्हाला याबाबत अधिक सखोल आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.”
येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वंबआ हा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू झालेला एक वेगळा प्रयोग आहे. २०० लहानमोठ्या सामाजिक, जातविरोधी संघटना एका छत्राखाली एकत्र आल्या आहेत. खासदार असादुद्दिन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) हा पक्षसुद्धा या आघाडीचा भाग आहे. यामुळे बहुजन आणि मुस्लिम समुदाय एकत्र आले आहेत. राज्यातील मराठवाडा भागातल्या औरंगाबाद मतदारसंघातून विजयी झालेले एआयएमआयएमचे इम्तियाज जलील हे आघाडीचे एकमेव विजयी उमेदवार आहेत.
वंबआमुळे अगदी थोड्या जागांवर काँग्रेसला नुकसान
बुलढाणा, नांदेड, गडचिरोली आणि परभणी या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे वंबआच्या उपस्थितीमुळे हार पत्करावी लागली. या ठिकाणी इतर मतदारसंघांपेक्षा वंबआच्या उमेदवारांची कामगिरी खूपच चांगली होती आणि पक्षाला विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा थोडी अधिक मते मिळाली.
नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी २०१४ मध्ये ‘मोदी लाट’ असूनही त्यांची जागा राखण्यात यश मिळवले होते. यावेळी मात्र वंबआने लक्षणीय प्रमाणात मते आपल्याकडे खेचली आणि ते केवळ ४०,००० मतांनी पराभूत झाले. नांदेडमध्ये वंबआचे उमेदवार यशपाल भिंगे यांना १.६५ लाख मते मिळाली. चव्हाण यांना स्वतःचा गड राखता आला नाही आणि राज्यातही काँग्रेसची कामगिरी अत्यंत वाईट होती याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. “मी आमच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. आम्ही सातत्याने लोकांच्या समस्या लावून धरल्या आणि सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहिलो. परंतु दुर्दैवाने आम्हाला यश मिळाले नाही,” चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले उमेदवार म्हणजे चंद्रपूरचे सुरेश धानोरकर. ते पूर्वी शिवसेनेमध्ये होते. पक्षाचे मूळ उमेदवार, विनायक बनगडे यांच्या जागी शेवटच्या क्षणी धानोरकरांची लागलेली वर्णी पक्षाच्या यशामध्ये कळीचा मुद्दा ठरली. वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या मते वास्तविक परिस्थिती इतकी वाईट होती की राज्यात पक्ष वाचवण्यासाठी शेवटी सेनेच्या कार्यकर्त्याची गरज पडली.
यूपीएमधील लहान मित्रपक्षांचे भवितव्य
राजू शेट्टी या शेतकरी नेत्याच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्ष या यूपीएच्या आणखी एका मित्रपक्षाला पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले आणि सांगली या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला. शेट्टी यांचा सेनेच्या धैर्यशील पाटील यांनी ९६,००० हून अधिक मतांनी पराभव केला आणि वंबआ उमेदवार अस्लम बादशाहजी सय्यद यांना १.२३ लाखांहून अधिक मते मिळाली.
एप्रिलमध्ये शेट्टी यांनीत्यांना वंबआबरोबर जाण्याची इच्छा असल्याचे द वायर ला सांगितले होते. मात्र वंबआने काँग्रेसबरोबर युती केली नाही तेव्हा शेट्टी यांनी काँग्रेसची निवड केली. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती करण्याचा आपला निर्णय म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी केलेली तडजोड होती असे शेट्टी म्हणतात. ते हातकणंगले मतदारसंघात आणि विशाल पाटील सांगलीमधून पराभूत झाले. “आंबेडकरांना शेट्टींबरोबर हातमिळवणी करण्याची खूपच इच्छा होती. ते आमच्याबरोबर आले असते तर आम्हाला हातकणंगले येथे उमेदवार उभा करण्याची गरज नव्हती,” आंबेडकरांचा मुलगा आणि पक्षातील नवे नेतृत्व सुजात आंबेडकर म्हणाले.
शेट्टींचे दुसरे उमेदवार पाटील हे सहकारी साखरकारखान्याचे अध्यक्ष आहेत, आणि खरे तर शेट्टींचे वैचारिक विरोधक आहेत. सांगलीमध्ये, वंबआचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे धनगर जातीतील एक प्रभावी नेते आहेत, ज्यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली.
घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध
जागावाटपातील मतभेदांव्यतिरिक्त, आंबेडकर यांचा शरद पवारांच्या ‘घराणेशाहीच्या राजकारणा’लाही विरोध होता. आंबेडकरांनी पवारांवर जातीयवादी राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. सुजातने दावा केला की अकोल्यामध्ये आंबेडकर हरले याचे एकमेव कारण म्हणजे ‘पवारांचा माणूस’ असलेला काँग्रेस उमेदवार त्यांच्या विरोधात उभा होता. “हे दोषारोप आम्हाला लागू होत असतील तर ते काँग्रेसलाही लागू होतात. विशेषतः अकोल्यामध्ये आंबेडकरांना जिंकण्याची बरीच संधी होती हे काँग्रेसला माहीत होते. तरीही त्यांनी उमेदवार दिला. आणि त्याचा भाजपलाच फायदा झाला. जर धर्मनिरपेक्ष पक्षच यावा असे वाटत होते तर काँग्रेसने ती जागा का नाही सोडून दिली?” सुजातने प्रश्न केला. अकोल्यामध्ये आंबेडकरांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना तिसऱ्या. भाजपचे संजय धोत्रे २.७५ लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आले.
आंबेडकरांचे काँग्रेसच्या उमेदवारांच्या निवडीबाबतही मतभेद होते. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये काँग्रेसने भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरोधात ब्राम्हण मोहन जोशींना उभे करण्याचे ठरवले. मागच्या वर्षी १ जानेवारी रोजी पुण्याच्या जवळच्या भीमा कोरेगाव येथे भेट देणाऱ्या दलितांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आंबेडकर आणि इतर जातविरोधी गटांनी पुण्यातूनच आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती. सुजातच्या म्हणण्याप्रमाणे, “तत्त्वतः ते कधीच वंबआशी सहमत नव्हते.”
एक नवीन स्थापन झालेला पक्ष म्हणून पाहिले तर वंबआची कामगिरी नजरेत भरावी अशीच आहे. त्यांना राज्यभरात ४१ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. मतांची टक्केवारी सुमारे ९% इतकी आहे. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी थोडी जास्त म्हणजे १६.३% आहे.
आयआयटी मुंबई येथे मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्र विभागात राजकीय समाजशास्त्रज्ञ असणारे सूर्यकांत वाघमोरे यांच्या मते वंबआची कामगारी “असामान्य” होती. “या निवडणुकीत लोक त्यांचा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान करत होते, राज्याचा मुख्यमंत्री नव्हे. त्यांना माहीत होते की त्यांची एकत्रित मते मोदी आणि काँग्रेस या दोघांच्याही विरोधात असणार होती. मला वाटते महाराष्ट्रात पहिल्यांदाच तिसऱ्या आघाडीची खरीखुरी शक्यता दिसू लागली आहे. आणि तीही बहुजन तिसरी आघाडी. हे खरोखरच एक सुचिन्ह आहे.” वाघमोरे काही रणनीतींकडेही लक्ष वेधतात ज्या वंबआसाठी उपयुक्त ठरल्या. “वंबआने मागासांसाठी आपली ओळख ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट बनवली आणि न्यायासाठी त्यांना एकत्र आणले. यामुळे बहुजन समाज आंबेडकरांच्या बाजूने येण्यास मदत झाली,” ते म्हणाले.
वंबआला जरी औरंगाबादमधून केवळ एकच जागा मिळाली असली तरी वाघमोरे यांच्या मते ती महत्त्वाची ठरेल. “त्यामुळे वंबआ आणि एमआयएमचे मनोधैर्य वाढेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे, जलील यांच्या विजयामुळे हेही पुन्हा दिसून आले आहे की पारंपरिक रित्या काँग्रेसला मतदान करणाऱ्या मुस्लिम समुदायासाठीही एक पर्याय आहे,”
सहा महिन्यांतच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांसाठी पुन्हा मतदान होईल. सावंत म्हणाले, राज्यामध्ये वंबआबरोबर युती करण्यास काँग्रेस तयार आहे. “आम्हाला भाजप आणि सेनेसारख्या उजव्या पक्षांचा सामना करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र काम करावे लागेल. राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये वंबआबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत,” सावंत म्हणाले.
मूळ लेख
COMMENTS