भाजपचा डाव फसला, पवारांपुढे ईडी नरमले

भाजपचा डाव फसला, पवारांपुढे ईडी नरमले

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण

‘महाराष्ट्र, शिवसेनासे पंगा लिया हैं’- राऊत आक्रमक
भाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले
सोनियांची विरोधी पक्षांना एकजुटीची हाक

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाणार होते. पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि ईडीने चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने पवारांनीच आपण ईडीकडे जात नसल्याचे जाहीर केले आणि हा एकूण मामला काही काळापुरता थंडावला. पण या प्रकरणाने राज्याच्या राजकारणामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा तीव्र संघर्ष पाहावयास मिळाला. राज्यात दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने, धरणे धरलेली दिसून आली. काही शहरात बंदही पाळण्यात आला होता.

शुक्रवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात उपस्थित राहणार असल्याने सकाळपासून राजकीय वातावरण तापत चालले होते. काहीही कारणे असो पण आपण ईडीच्या कार्यालयात जाणार अशी भूमिका पवारांनी घेतल्याने पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र पवारांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परिसरात जमू नये असे आवाहन केले होते. तरीही प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत फोर्टच्या दिशेला जमू लागले होते. एकंदरीत मोठ्या प्रमाणात जमाव जमण्याची शक्यता पाहता गुरुवारीच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगत कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे.जे. मार्ग. एमआरए मार्ग या पोलिस ठाण्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. तरीही मोठ्या प्रमाणावर राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक मुंबईत शुक्रवारी सकाळी धडकत होते. पण दुपारी तूर्त कोणत्याही चौकशीची गरज नसून आवश्यकता भासल्यास बोलवण्यात येईल असा ईमेल ईडीच्या कार्यालयातून शरद पवार यांना पाठवण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळली.

त्याअगोदर मुंबई पोलिस आयुक्तांनी पवारांची भेट घेऊन ईडीच्या कार्यालयात आपण जाऊ नये अशी विनंती त्यांना केली. पवार ईडीच्या कार्यालयात गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळू शकतो असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अखेर दोनच्या सुमारास खुद्ध पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर पवार पुणे व बारामतीची पूरपरिस्थिती पाहण्यास तिकडे रवाना झाले.

‘सहानभूतीचा राष्ट्रवादी इव्हेंट’

इकडे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप दरम्यान संघर्ष पेटत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ईडीने गुन्हा दाखल केला तर त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने त्याचा इव्हेंट केला अशी टीका केली. पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केंद्र आणि राज्य सरकारचा काडीमात्रही संबंध नाही, असा त्यांनी दावाही केला.

राज्य सहकारी बँकेमधील आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशीचे आदेश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिले होते. त्यावेळी, पवारांच्या शब्दावर चालणारे सरकारच राज्यात सत्तेत होते. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच गुन्हा दाखल झाला असून, ईडीने त्यानुसारच कारवाई केली आहे. सरकारने यात आकसाने कोणतीही पावले उचललेली नाहीत’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: