काँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश

काँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश

काँग्रेस पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या व प्रचलित कार्यशैली आणि कार्यपद्धतीतील उणिवांचा आढावा घेऊन, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः जबाबदारी व नेतृत्वासह काम करणार्‍यांनी, तशा प्रकारच्या चुका टाळणे, हे किती महत्त्वाचे आहे, त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा.

काँग्रेसच्या विविध राज्यांतील पक्ष पुढार्‍यांच्या झालेल्या व्यापक बैठकीत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या २३ नेत्यांचे पक्षनेतृत्वाबद्दल अपेक्षा व्यक्त करताना लिहिलेले पत्र, त्यावर सोनिया गांधींची संयत, तर राहुल गांधी यांची संतप्त प्रतिक्रिया, त्यावर प्रमुख पत्रकार पुढार्‍यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया व त्यावर सर्वांकडून करण्यात आलेली सारवासारव, यावरून काँग्रेससारखा पक्ष आजही नेतृत्वाविना व दिशाहीन असल्याचेच पुन्हा स्पष्ट झाले.

खरं तर या सार्‍या दु:खद घटनाक्रमाचा मागोवा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आपल्या प्रदीर्घ लेखात घेतला असून तो चिंतनीय व वाचनीय ठरला आहे. मुख्य म्हणजे, विषय प्रचलित राजकारणाशी संबंधित व ज्वलंत असला तरी लेखातील मुद्दे आणि आशय राजकारणापासून प्रामुख्याने दूर राखण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, लेखाच्या सुरुवातीलाच नमूद केलेल्या मुद्द्यांच्या आधारे काँग्रेस पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या व प्रचलित कार्यशैली आणि कार्यपद्धतीतील उणिवांचा आढावा घेऊन, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः जबाबदारी व नेतृत्वासह काम करणार्‍यांनी, तशा प्रकारच्या चुका टाळणे, हे किती महत्त्वाचे आहे, त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा.

आपल्या सहकारी कनिष्ठांवर दोषारोपण करणे 

व्यक्तिगत, व्यवसायात्मक व राजकीय जीवनात हार-जीत होतच असते. अशा निर्णायक व निर्वाणीच्या प्रसंगीच व्यवस्थापन-नेतृत्वाची खरी कसोटी असते. व्यक्ती-नेताच नव्हे, तर संस्था-व्यवसायाचे भवितव्यही त्यावरच अवलंबून असते. व्यवस्थापकाचा कस अशाच प्रसंगी लागतो. त्यावर प्राप्त वा प्रस्तावित अपयशासाठी आपल्या सहकारी-कनिष्ठांवर खापर फोडणे म्हणजे नेता आणि नेतृत्वाचे अपयशच ठरते. काँग्रेसच्या नेतृत्वाने ज्या प्रकारे पक्षातील ज्येष्ठांच्या पत्राची व त्यातील मजकुराची दखल न घेता, पत्र लिहिणार्‍यांवर जाहीर व जहरी स्वरूपाचे दोषारोपण केले, तसे कुणाही व्यवस्थापक-व्यवस्थापनाने कधीही करू नये, हे यातून शिकण्यासारखे आणि महत्त्वाचे.

अनावश्यक बैठक चर्चेमध्ये वेळ घालविणे

काँग्रेस कार्यसमितीच्या तब्बल सात तास चाललेल्या चर्चा- बैठकीतून काही निष्पन्न न होणे, हा एकच निर्णय समोर आला. व्यक्तिगत स्तरावरील पक्षीय राजकारणात हे सर्व क्षम्य असते. मात्र, व्यवस्थापनात असे करून चालत नाही. विशेषतः ‘नेता’ म्हणून व्यवस्थापकासाठी इतर बाबी तर मूल्यवान असतातच, पण वेळेचे मूल्य अमूल्य ठरते. त्यामुळे व्यवस्थापकाने अशा प्रकारच्या निरर्थक बैठकांसाठी वेळेचा अपव्यय करू नये.

आपल्याबद्दलचा अनावश्यक आभास निर्माण करणे व्यवस्थापनात वर्तमान-आजची अवस्था ही प्रत्येक व्यवस्थापकासाठी महत्त्वाची जमेची बाजू ठरते. याचे भान न ठेवता आपला व आपल्या कंपनी-संस्थेचा भूतकाळ व इच्छित भविष्याचाच अवास्तव विचार संस्थेसाठी कधीच लाभदायी नसतो.

व्यवसायात सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ही स्पर्धा आपण कशाप्रकारे व यशस्वीरीत्या पार पाडू, त्यावरच व्यवसाय यशस्वी ठरतो. याला सहसा पर्याय नसतो व त्यासाठी वेळोवेळी वस्तुनिष्ठ आकलन करणे गरजेचे ठरते. अशाप्रकारे ठोस विचार व कृती न करता व मुख्य म्हणजे सध्या काँग्रेसची काय अवस्था आहे, त्यावर वस्तुनिष्ठ मंथन न करता काँग्रेसी नेतृत्वाने अंहमपणाचा अट्टाहास कायम राखला. हाच अट्टाहास त्यांच्यासाठी अवसानघातकी व व्यवसायघातकीही ठरू शकतो, हा धडा यातून सर्व व्यवस्थापकांना मिळाला आहे.

नेता आणि त्यांचे नेतृत्व वरचढ असावे, पण, डोईजड असू नये, हा एक सर्वमान्य प्रघात आहे. व्यवसाय-समाजकारण, राजकारणासह समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा न्याय लागू होतो. नेता मग तो राजकारणी असो अथवा व्यवसायी, आग्रही असावा व हट्टी अथवा दुराग्रही नसावा. असे झाल्यास अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली केलेले मार्गाक्रमण नक्कीच अपयशी ठरते. या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा अट्टाहास व सोनियाजींचा आडमुठेपणा या दोन्ही बाबी आव्हानपर व संघर्षमय वातावरणात व्यवस्थापकाने कसे वागू नये, याचे ठोस व ज्वलंत उदाहरण ठरले आहे.

इतरांच्या मतांचा आदर करा

व्यवसायात ग्राहक तर लोकशाही निवडणुकीत मतदार हा राजा असतो. या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी समान बाब म्हणजे, इतरांच्या मतांवर विचार करून त्यांचा आदर करणे. विशेषत: इतरांच्या मतांचा अनादर करणे, तर विविध समस्यांना आमंत्रण देणारेच ठरते.

काँग्रेस कार्यसमितीमध्ये यासंदर्भात नेमके काय झाले, हे थोडक्यात पडताळणे महत्त्वाचे ठरते. कार्यसमितीच्या २३ सदस्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून काही मते मांडली, त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. पत्र लिहिणार्‍यांमध्ये अधिकांश ज्येष्ठ नेते होते. मात्र, पत्रावर काय कारवाई झाली? पत्र लिहिणार्‍यांबद्दल विनाकारण व फार मोठा त्रागा करण्यात आला. मुख्य म्हणजे, पत्राचा विषय व त्यातील आशय पडताळून न पाहता, पत्र लिहिण्यासाठी साधलेल्या वेळेवरच कांगावा केला गेला व त्यातूनच ‘न भूतो’ अशा वादंगाने बैठक गाजली, नव्हे गाजविण्यात आली. आपल्या कंपनी-व्यवसायात ग्राहकाच्या पत्र वा तक्रारींच्या बाबतीत जर व्यवस्थापनाने अशीच भूमिका घेतली तर? मुख्य म्हणजे, व्यवस्थापनात टीकात्मकच नव्हे, तर प्रसंगी विरोधी मतांची पण दखल घेण्याचा आग्रही सल्ला का दिला जातो, हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले.

निष्ठावंत कोण असावे?

व्यवसाय असो वा पक्ष, निष्ठा ही बाब समान मूल्याची ठरते. प्रत्येक जण निष्ठावंत असावा असे म्हणणे सोपेच; पण प्रत्यक्ष व्यवहारात आणणे कठीण असते. विशेषत: नेतृत्वाकडून तर, यासंदर्भात अधिक अपेक्षा असतात. निष्ठेला पर्याय नसतो व निष्ठा ९९ टक्के असूनही भागत नाही. या निष्ठेची जपणूक मूल्य आणि व्यवहारांवर आधारित असायला हवी. या साध्या, पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे काँग्रेस नेतृत्वाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असले तरी, व्यवस्थापनात असे करून चालत नाही.

खुशमस्कर्यांना आवरा; स्वत:ला सावरा!

राजकारण व व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात खुशमस्कर्‍यांचा सुकाळ असतो. वक्ते-प्रवक्ते अनेक असतात व निर्णायक क्षणी स्पष्टवक्ते कमी असतात. ज्या स्वरूपात काँग्रेस कार्यकारिणीने काँग्रेसवर नव्हे, तर ‘गांधी’ नामावलीवर स्तुतीसुमने वाहिली व त्यासाठी निष्ठावंत आणि निष्ठेचा पण बळी दिला, त्यावरून नेते आणि नेतृत्वाने ‘राजकारण’ आणि ‘व्यवसाय’ या दोन्ही संदर्भात स्वत:ला सावरून निर्णय घेणे किती महत्त्वाचे ठरते, याची साक्ष पटते.

स्वत:च्या मर्यादांची जाणीव ठेवा

व्यक्तिगत व संस्थास्तरावर प्रत्येकाला मर्यादा या असतातच. याची जाणीव ठेवून निर्णय घेणे व कार्यरत असणे आवश्यक असते. राहुल गांधींच्या संदर्भात सांगायचे तर त्यांना आपल्या मर्यादा तर औपचारिक बैठकीतील चर्चेनंतरही ओळखल्या आलेल्या नाहीत. शिवाय या मर्यादांची जाणीव करून देणार्‍यांनाच टीकेचे लक्ष्य केले जाते व अनर्थ घडतो. व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांना काँग्रेसमधील या रणधुमाळीच्या निमित्ताने व्यवस्थापनासारख्या सार्वजनिक क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून स्पर्धेवर मात करून यशस्वी होण्यासाठी काय करण्याची आवश्यकता असते, याचा वस्तुपाठ मात्र निश्चितपणे मिळाला असेल.

COMMENTS