काँग्रेसची ‘नाना’ संजीवनी?

काँग्रेसची ‘नाना’ संजीवनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा देशातील एकमेव नेता म्हणून चर्चेत असलेले नाना पटोले यांच्या हाती काँग्रेसने जीर्ण आणि फुटलेल्या अवस्थेत असलेल्या प्रदेश अध्यक्षपदाच्या जहाजाचे सुकाणू सोपविले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप, निंदा नालस्तीच्या वादळात हे सुकाणू 'हातात' घट्ट धरून महाकाय जहाज सत्तेच्या किनारी नेण्याचे अवघड काम पटोले यांच्या समोर आहे.

इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत…
भाजपला राष्ट्रवादीने रोखले
ग्रामपंचायत निवडणूक: शिवसेना फायद्यात!

मरगळ आणि सर्व शक्तिपात झालेल्या राज्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी नाना पटोले यांच्या रूपाने अत्यंत आक्रमक आणि कामाची धडाडी राखणाऱ्या नेत्याला हे मानाचे आणि तेवढेच आव्हानाचे पद देण्याची मानसिकता काँग्रेसच्या हाय कमांड दाखविली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला देशात आणि राज्यातही मोठी ओहोटी सुरू झाली. सुमारे १३० वर्षांचा ज्वाज्वल्य इतिहास आणि तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची दारुण अवस्था सुरू झाली. महाराष्ट्रातही हा पक्ष आजही कसाबसा तग धरून टिकला आहे. केवळ राजकीय गणितांमुळे आज हा पक्ष सत्तेत वाटेकरी झाला आहे. काँग्रेस आणि त्याच्या विचारसरणीला मानणारा गट आजही असला तरी नव मतदार मात्र अजून खूप दूर आहे. काँग्रेसची पारंपरिक मतपेटी असलेली बलस्थाने ही सध्या उध्वस्त झाली आहेत. पक्षाला मानणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी वेगळा रस्ता पकडला. त्यातच  सत्तेपासून दूर राहिल्यामुळे कार्यकर्त्यांचा संच आणि ताकद याची वानवा कायम जाणवते.

सत्तेत असलेल्या मोदी आणि शाह यांनी सातत्याने काँग्रेस व गांधी घराणे यांना टार्गेट करत या पक्षाविषयी लोकांमध्ये नकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले. एकेकाळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या या पक्षाला जणू काय शेवटचे आचके लागले आहेत अशी स्थिती. पण कोणताही पक्ष कधीच संपत नाही या तार्किकतेतून मग त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणि हेच मोठे आव्हान नवीन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर आहे.

नाना पटोले कोण आहेत याची झलक दोन दिवसात महाराष्ट्रासह अन्य राज्यात त्यांच्यासाठी लावलेल्या अभिनंदन फलकामुळे स्पष्ट झाली आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात नानांच्या अभिनंदनाचे फलक झळकविण्यात आले हे विशेष. नानांची ओळख आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांना भिडणारा आणि त्यांना थेट शिंगावर घेणारा देशातील एकमेव नेता म्हणून.

नानांची राजकीय कारकीर्द ही पण संघर्षाने भरलेली आहे. २०१४मध्ये त्यांनी लोकसभेच्या गोंदिया भंडारा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शक्तिशाली नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले. त्यावेळी ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते. मूळचा आक्रमक स्वभाव तसेच थेट तोंडावर बोलण्याची वृत्ती यामुळे त्यांनी खासदारांच्या मिटींगमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले. एरव्ही आणि आजही कोणाचीही अशी हिंमत बीजेपीमध्ये होत नाही. स्वामीनाथन आयोगाची शिफारस आणि शेतीमाल या प्रश्नावरून त्यांचे आणि मोदी यांच्यामध्ये खूपच बिनसले. या घटनेची देशभर चर्चा झाली आणि नाना राष्ट्रीय चर्चेत आले. त्यानंतर नाना यांनी बीजेपी सोडली व ते काँग्रेसवासी झाले.

आधी विधानसभा अध्यक्ष आणि आता प्रदेश अध्यक्ष या टप्प्यावर नानांचा प्रवास आला आहे. भीडभाड न बाळगता थेट बोलणे आणि कृती ही त्यांची वैशिष्ट्य. काँग्रेस सध्या राज्यात गलितगात्र अवस्थेत असताना आणि हे महाकाय जहाज बुडण्याच्या दिशेने प्रवास करत असताना नानांच्या हाती त्याचे सुकाणू आले आहे. त्यामुळे जुनीच आव्हाने आणि त्याला काही नवीन आव्हानांची जोड अशी दुहेरी कसरत त्यांच्या समोर आहे. दोन माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षातील वजन तसेच काही बाहुबली नेते या सर्वांना सांभाळून घेऊन पटोले यांना वाटचाल करायची आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचे अभिनंदन करून तुमच्या समोर सर्वात कठीण आव्हान कोणते आहे असा प्रश्न विचारतात नाना म्हणाले, आव्हान कोणतेही कठीण आणि आव्हानात्मक असावे तरच काम करण्यासाठी कस पणाला लागतो. माझ्यापुढे सर्वात महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासाने एकत्र करून पक्ष वाढ करणे. त्यासाठी मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करणार आहे. एक प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्ष विस्तार करण्यास मला मोकळीक आहे. माझी नियुक्ती केल्यामुळे नवीन जबाबदारी घेऊन मी जनतेसमोर जाईन. आधीच मोदी सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रम निरास झाला आहे. त्यामुळे हीच ती खरी वेळ आहे जनतेला विश्वास देण्याची असेही नाना म्हणाले.

काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी सर्व घटकांना एकत्रित करून काम केले जाईल असे स्पष्ट करून नाना पटोले म्हणाले, की येत्या काही काळात पक्ष पुन्हा उभारी घेईल.

निवडणूक ही मतपत्रिकेवर घ्यावी या आपल्या मतावर आपण ठाम असून तसे निर्देश राहुल गांधी यांनीच दिले आहेत असे सांगून पटोले म्हणाले, की महाविकास आघाडीमधील अन्य घटक पक्षातील नेत्यांचे मत वेगळे असू शकते. मोदी यांना केवळ अदानी आणि अंबानी यांचेच भले करायचे आहे. प्रस्तावित कृषी कायदे कायमस्वरूपी रद्द केलेच पाहिजेत आणि तो पर्यंत शेतकरी आंदोलन संपणार नाही असेही ते म्हणाले. मोदी हे नाटकी आहेत ते चांगले नौटंकी करतात. गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्ती वेळी ते राज्यसभेत भावुक झाल्याचे सर्वाना दाखवत होते पण ही भावुकता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या त्यांच्याच पक्षातील नेत्यांच्या निवृत्ती वेळी का दाखविली नाही असा परखड सवाल नाना पटोले यांनी केला.

मोदी यांना भिडणारा एकमेव नेता अशी देशभरात आपली ओळख आहे या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, मला पक्षाने आदेश दिला मी वाराणसी मतदारसंघातून मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवेन.

मोदी हे ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोके टेकवत फक्त गरिबांसाठी काम करणार असल्याचे सांगितले होते पण सद्यस्थितीत त्यांच्या दृष्टीने केवळ अंबानी आणि अदानी हेच दोन गरीब लोक आहेत आणि त्यांच्यासाठी ते अहोरात्र काम करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

पटोलेंसोबत नवी टीम

नाना पटोले यांना कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष पद देतानाच पक्षाने त्यांना नवीन टीम दिली आहे. यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे आणि चंद्रकांत हंडोरे यांचा यामध्ये समावेश आहे. त्याच बरोबर १० नवीन उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार नाना पटोले आणि त्यांची नवीन टीम पक्षाला उर्जितावस्था देऊ शकतात. पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सांगितले की, नवीन नेतृत्व आणि टीम यामुळे कार्यकर्त्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून अन्य पक्षात गेले असले तरी आता नवीन नेतृत्व मिळाले असल्याने पुन्हा ‘सोनियाचे’ दिवस येतील का ? तसेच ‘नाना’ संजीवनी ठरणार का? याचे उत्तर भविष्यात मिळेल.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0