भाजपचे १२ आमदार निलंबित

भाजपचे १२ आमदार निलंबित

महाराष्ट्र विधानसभा सभागृहामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले.

राज्याच्या संमतीविना ‘आयएएस’ना केंद्रात घेण्याचा प्रस्ताव
सायबर छळाच्या तक्रारीनंतर भाजप नेते कल्याणरामन यांना अटक
‘अच्छे दिन’ जानेवाले है !

महाराष्ट्र विधानसभा सभागृहामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव काम पाहत होते. आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आल्यावर जाधव म्हणाले, की विरोधी पक्षांच्या नेत्यांना मी विनंती केली की, आपण बोलताहात तर आपल्या सदस्यांना बसायला सांगा. त्यावेळी विरोधीपक्ष नेते हळू आवाजात बोलले, नाही, नाही बसायचं नाही. पण त्यांचा माईक सुरु होता. माझं पूर्ण लक्ष होते. विरोधीपक्षाने सर्व मुद्दे मांडले. तेव्हा सभागृहात शांतता होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले, आपल्याला हवे तेव्हढे बोल, पण सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा शांत राहण्याचे वचन द्या. त्यावर विरोधीपक्षाने सांगितलले, की ते मेरिटवर बोलत असतील, तर आम्ही ऐकू. विरोधी पक्षनेत्यांचं भाषण पूर्ण झालं. कुठेही आडकाठी नाही. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांना मी थांबवलं आणि सांगितलं. पहिल्यांदा प्रस्ताव वाचा. मग त्यावर भाष्य करा. मग भुजबळांनी प्रस्ताव वाचला. भुजबळांनी विरोधीपक्षाच्या एकाएका मुद्द्याचं स्पष्टीकरण पुराव्यानिशी दिलं. त्यावर विरोधी पक्षाला काही मुद्दे उपस्थित करायचे होते. ते उभे राहिले. गेली ३६ वर्षे सभागृहात मी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं घडलेलं नाही. मी स्वत: आक्रमक आहे. रोखठोक आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही. सत्ताधारी पक्षानं दिलेलं उत्तर विरोधीपक्षाला मान्य नसतं. यावेळी व्यासपीठावर काही सदस्य आले. आणि माझ्या समोरचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव झाला, सभागृहाचं काम दहा पंधरा मिनिटाकरिता तहकूब केले.”

भास्कर जाधव यांनी पुढे सांगितले, की सभागृहात गोंधळ झाला की, अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख बसतात. त्याच्यावर तोडगा काढतात. एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यावर मी व्यक्तिगत कुणाशीही कटुता ठेवलेली नाही. प्रत्येकाशी भेटतो आणि बोलतो. मी केवळ अधिवेशन चालविण्याकरीता तालिका अध्यक्ष आहे. मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रागात आले. ते इथेच चिडलेले होते. मी त्यांना बोललो या बसा. ते चिडलेले होते. चंद्रकांत दादा आले. मी त्यांना माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवले. इतर सदस्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना बोललो यातून मार्ग काढू. मात्र विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी या बाजूचे अनेक सदस्य आतमध्ये आले. मला आई बहिणीवरुन शिव्या देऊ लागले. घुसले तर घुसले, काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जसे गावगुंड असतात. तसे लोकप्रतिनिधी अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो यांना आवरा. पण त्यांना आवरत नव्हते. तुम्ही ५०-६० जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. ही स्थिती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.” असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली, की अशी कारवाई करू नका.  मात्र त्यानंतर १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. ठराव संमत झाल्यानंतर फडणवीस संतापले. ते म्हणाले, “याठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप सदस्यांनी सभात्याग केला.

विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पडल्याने सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून आमदरांना निलंबित केले आहे.”

फडणवीस म्हणाले, “ओबीसी आरक्षणासाठी १२ काय पूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही, संघर्ष करत राहू. भाजपा जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील. एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं. तरी आम्ही त्याची परवा करत नाही. आज सभागृहात जे पाहिलं, अनेक वेळा लोक यापूर्वी मंचावर चढले, कधीही कुणाला निलंबित करण्यात आलेलं नव्हतं. नेहमीच अध्यक्षांच्या दालनात बाचाबाची होते. पण कधीही कुणी निलंबित होत नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कुणी हक्कभंग आणला तरी मला परवा नाही. मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली, एकाही भाजपाच्या सदस्याने शिवी दिलेली नाही आणि कुणी शिवी दिली, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. शिवी देणारे तिथे कोण होते. मला ती शिवी देता येत नाही पण सगळ्यांनी बघितलं आहे आणि अशा परिस्थितीत शिवेसेनेचे सदस्य तिथे येऊन, त्यांनी धक्काबुक्की केली. त्याच्यावर भाजपाचे काही सदस्य आक्रमक झाले पण, तेही आम्ही होऊ दिलं नाही त्यांना आम्ही बाजूला केलं आणि जे काही थोडी धक्काबुक्की झाली त्या संदर्भात आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांना सांगितलं की सर्वांच्यावतीने मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली व तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमचे आमदार निलंबित करण्यासाठी ही स्टोरी तयार केली. कारण, ओबीसी संदर्भातही हे सरकार अपयशी ठरले आहे आणि मराठा आरक्षणा संदर्भातही हे आरक्षण अपयशी ठरले आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0