सरकारसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु

सरकारसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेनेने सोमवारी संध्याकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी अधिकृत संपर्क केल्याचे स्पष्ट झाले आहे. या

अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र
आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेनेने सोमवारी संध्याकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी अधिकृत संपर्क केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपर्काला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते अहमद पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत दुजोरा दिला.

शिवसेनेच्या या अधिकृत संपर्काने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे नवे समीकरण पाहावयास मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे व अन्य ज्येष्ठ नेते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल व अन्य नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेने सोमवारी सत्ता स्थापन करण्याबाबत आमच्याशी पहिल्यांदा अधिकृतरित्या संपर्क साधला पण काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जो पर्यंत सविस्तर चर्चा होत नाही. धोरणांची आखणी होत नाही, मतभेदांवर तोडगे निघत नाहीत तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत पावले उचलली जाणार नाही. आमच्यात धोरणांविषयी, किमान समान कार्यक्रमांविषयी एकमत झाल्यास मगच शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. या पक्षाशी चर्चा करणे आम्हाला गरजेचे होते त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

अहमद पटेल यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा देत काँग्रेस सोबत आम्ही विविध मुद्द्यावर चर्चा सुरू केल्याचे सांगितले. पवारांनी सत्तेतील भागीदारीचा मुद्दा या चर्चेत नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेसोबत जायचे की नाही येथून विविध धोरणांवर आम्हाला आमच्यामध्ये सहमती हवी आहे. हे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर त्यामध्ये विसंवाद निर्माण होणार नाही. ते सहजपणे चालले पाहिजे याबाबत अगोदर चर्चा होणे आमच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी राज्यात लावलेल्या राष्ट्रपती राजवटीवर राज्यपालांना कोपरखळी मारली. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेऊन आम्हा सर्वांना अधिक वेळ मिळाला असे ते म्हणाले. तर अहमद पटेल यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावरही टीका करत  भाजपने लोकशाही व राज्य घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप केला. गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये भाजपने असले प्रयोग पहिले केले होते त्याचीच पुनरावृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस- राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याची शिवसेनेची कबुली

मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेविषयी निर्माण झालेल्या अनेक तर्कवितर्कांना उत्तरे देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्घव ठाकरे यांनी सोमवारी आपण काँग्रेस श्रेष्ठींशी व राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याचे सांगितले. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आहे पण हिंदुत्वापासून अनेक मुद्द्यांवर आम्हाला पहिले एकमेकांशी चर्चा करावी लागणार आहे. महाराष्ट्राची सत्ता हा पोरखेळ नाही तो अत्यंत गंभीरपणे आम्हाला घ्यायचा आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका कायम आहे पण हे राज्य रामराज्यासारखे चालले पाहिजे अशी आमची अपेक्षा असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या राष्ट्रपती राजवटीवरही तिरकस शैलीत टीका केली. एवढे उदार राज्यपाल या देशाला, राज्याला मिळाले असून, त्याने देशाचे भले होईल असे ते म्हणाले. आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती त्यांनी सहा महिन्यांची दिली असाही टोला त्यांनी मारला.

भाजपसोबत आपण जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपची संबंध मी तोडलेले नाहीत, त्यांनी ते तोडले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला २१० पर्यंत जागा मिळतील असे वातावरण असताना त्या अंधारात आम्ही त्यांच्यासोबत युती केली व मी स्वत: त्यात पुढाकार घेतला होता, याची आठवण करून दिली. भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हाला नव्या आघाडीसोबतच्या शुभेच्छा दिल्या होत्या यावरून त्यांना काय हवे होते हे स्पष्टच आहे, असे ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा दररोज तीन वेळा काँग्रेस व राष्ट्रवादीशी संपर्क होत असतो असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण  शिवसेनेने पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क साधला असे त्याच पक्षांनी मंगळवारी स्वत:हून सांगितले. त्यावरून या आरोपात किती तथ्य आहे ते तुम्हीच पाहा असे ठाकरे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0