काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

प्रभारी अध्यक्ष, प्रभारी खजिनदार असा सगळा केवळ भार वाहून नेण्याचा ‘प्रभारी’ कारभार काँग्रेस पक्षात सध्या सुरू आहे.

प्रियंकांना नोटीस; अडवाणी-जोशी नियमाला अपवाद
बरे झाले, मोदी आले…
महाराष्ट्रानंतर झारखंडही भाजपच्या हातातून गेले

२०१९ची लोकसभा निवडणूक होऊन आता दीड वर्षे झालेलं आहे. पण काँग्रेस पक्ष अजूनही जैसे थे अवस्थेतच आहे. पक्षाला अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. गेल्या दीड वर्षांपासून सोनिया गांधी यांच्याकडेच प्रभारी अध्यक्षपद आहे. अहमद पटेल यांच्या अकाली निधनानंतर खजिनदारपद कोणाकडे सोपवायचं हा प्रश्न पक्षासमोर होता. तिथेही प्रभारी खजिनदार म्हणून पवन बन्सल यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला आहे. प्रभारी अध्यक्ष, प्रभारी खजिनदार असा सगळा केवळ भार वाहून नेण्याचा ‘प्रभारी’ कारभार पक्षात सध्या सुरू आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, दिल्ली, बिहार या पाच राज्यांच्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणात काँग्रेसनं त्यातल्या त्यात बरी कामगिरी केली. यातल्या महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस युतीत लढत होती. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार हटवण्यात मित्रपक्षांचीच कामगिरी मोलाची होती. काँग्रेस तिथे सहाय्यकाच्या भूमिकेत होती. ज्या हरियाणात खरंतर गेल्या पाच वर्षात खट्टर यांच्याविरोधात प्रचंड आंदोलनं उभी राहिली होती तिथे मात्र काँग्रेस काहीशी कमी पडली. खट्टर यांच्या विरोधात ज्यांनी आक्रमकपणे प्रचार केला ते दुष्यंत चौटाला हेच नंतर भाजपच्या सोबत सत्तेत जाऊन बसले. त्यामुळे खट्टर यांची खुर्ची कशीबशी टिकली. बिहारमध्येही काँग्रेस सहाय्यक अभिनेत्याच्याच भूमिकेत होती, पण तरीही अपयशाची चर्चा काँग्रेसचीच खूप झाली. त्यात या निवडणुकीच्या आधीच पक्षातल्या २३ नेत्यांनी काँग्रेसच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारं एक पत्र सोनिया गांधींना लिहिलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत परवा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक सोनिया गांधींनी बोलावली होती. त्यातून आता पुढची दिशा पक्षाला सापडणार का याची चर्चा सुरु आहे.

का महत्त्वाची होती ही बैठक? ऑगस्ट महिन्यात या नेत्यांनी हे पत्र लिहिलं, त्यानंतर पहिल्यांदाच सोनिया गांधींनी त्याबाबत सविस्तर चर्चेसाठी वेळ दिला. ही बैठक केवळ पत्र लिहिणाऱ्या नेत्यांची नव्हती. पण पत्र लिहिणाऱ्या काही नेत्यांना या बैठकीत बोलावण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यात पत्र माध्यमांमध्ये फुटल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एक बैठक झाली होती. पण त्या बैठकीत उलट पत्र लिहिणाऱ्यांवरच सगळी आगपाखड झाली होती. पत्राच्या आशयावर त्यात चर्चाच झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. जवळपास पाच तास बैठक ही बैठक झाली. एकूण १५ नेते या बैठकीत उपस्थित होते. पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैकी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी या गटानं लावून धरली. ती किती मान्य होते हे लवकरच कळेल. शिवाय काँग्रेसच्या गेल्या दीड वर्षातल्या कुठल्याही बैठकीप्रमाणे याही बैठकीत काही नेत्यांनी राहुल गांधींकडे अध्यक्षपद द्यायला हवं अशी मागणी केली. बैठक संपताना राहुल गांधींनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला आपण तयार असल्याचं सांगितलं अशाही बातम्या सूत्राच्या हवाल्यानं बाहेर आल्या. पण याही बातम्यांच्या बाबतीत एका गटाची स्पष्ट नाराजी नंतर खासगीत बोलताना जाणवत होती. त्यांच्या मते राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारे पुन्हा पद स्वीकारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली नव्हती. शिवाय जे काही व्हायचं ते निवडणुकीच्या माध्यमातूनच व्हावं, पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा आहे या गोष्टीबाबतची त्यांची ठाम मतंही ते सांगत होते. या बैठकीमुळे पक्षाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल चिंतनाला सुरुवात तर झाली आहे. अर्थात हे चिंतन काही इतक्यात संपणारं नाही. कारण पंचमढी, शिमला इथे जशी चिंतन शिबिरं झाली होती, तसं एखादं चिंतन शिबीर लवकरच घेण्यात यावं यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदाबद्दलची निवडणूक प्रक्रिया जानेवारी- फेब्रुवारीत पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे चिंतन शिबीर नेमकं कधी होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मुळात गांधी की बिगर गांधी? या संभ्रमावस्थेत काँग्रेस अडकली आहे. येत्या २८ डिसेंबरला पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस साजरा होईल. पण या प्रवासात इतकी दयनीय अवस्था आणि ती देखील इतक्या प्रदीर्घ काळासाठी काँग्रेसच्या वाट्याला प्रथमच आली असावी. राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदावर येणार असतील तर मग त्यांनी हे अध्यक्षपद सोडलं कशासाठी होतं, गेल्या दीड वर्षात त्यांनी असं काय करून दाखवलं की ज्यामुळे पक्षाला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास वाटावा असे अनेक प्रश्न त्यातून उपस्थित होतात. नव्या अध्यक्षाबाबत निवडणूक होणार असं गृहीत धरलं तरी राहुल गांधीच उमेदवार असल्यास समोर कुणी उभं राहणार का हा प्रश्न आहे. आणि जर कुणी राहिलंच तर ही निवडणूक लुटूपुटूचीच ठरणार नाही का? दुसरी शक्यता ही आहे की राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले आणि जर त्यांनी हे ठरवलं की गांधी घराण्यातला कुणी अध्यक्ष नको (त्यांनी तडकाफडकी राजीनामा ज्या बैठकीत दिला त्या बैठकीत त्यांचं हेच मत होतं) तर मग त्यांचा उमेदवार कोण असणार, आणि केवळ राहुल गांधींनी दिलेला उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी सगळे उभे राहणार? की खरंच पक्षात या पदासाठी मग अंतर्गत स्पर्धा रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

आधीच पक्षाच्या दृष्टीनं खडतर काळ सुरू असताना अवघ्या महिनाभराच्या आत अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा हे दोन एकनिष्ठ चेहरे पक्षानं गमावले आहेत. त्यापैकी अहमद पटेल यांच्या जाण्याचा धक्का अधिक. अहमद पटेल यांची जागा आता कोण घेणार याचीही चर्चा आहे. ही जागा घेणं म्हणजे एकाचवेळी पक्ष आणि तिजोरी दोन्ही सांभाळणं. सध्याच्या घडीला ज्या लोकांकडे ही क्षमता आहे त्यापैकी कमलनाथ एक आहेत. परवा कथित नाराज नेत्यांसोबत सोनिया गांधींची भेट घडवून आणण्यातही कमलनाथ यांचाच पुढाकार होता. त्यामुळे ते आता या रोलमध्ये येणार का याचीही कुजबूज सुरू होती. दुसरीकडे अशोक गहलोत यांनाही दिल्लीत आणण्याची चर्चा सुरू आहे. त्या निमित्तानं राजस्थानमधलं सत्तासंतुलनही साधता येऊ शकतं.

एकीकडे बिहारमध्ये एनडीएचं सरकार शाबूत ठेवल्यानंतर भाजपनं मिशन बंगाल जोरात सुरू केलं आहे. प.बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या महत्त्वाच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यात होणार आहेत. यात केरळमध्ये काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे. त्यात राहुल गांधी ही सध्या याच केरळमधून खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला नवा अध्यक्ष आता कुठल्या टप्प्यावर मिळतो आणि पक्ष प्रभारी अवस्थेतून बाहेर पडत खऱ्या अर्थानं २०२४ च्या तयारीला कधी लागतो हा पाहावं लागेल.

प्रशांत कदम, हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित प्रतिनिधी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0