गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला

गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला

नवी दिल्लीः प. बंगालमधल्या प्रत्येक जिल्ह्यात बॉम्ब निर्मितीचे कारखाने असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान केंद्रीय गृहखात्याने एका माहित

काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे
अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव

नवी दिल्लीः प. बंगालमधल्या प्रत्येक जिल्ह्यात बॉम्ब निर्मितीचे कारखाने असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान केंद्रीय गृहखात्याने एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना खोडून काढले. प. बंगालमध्ये अमित शहा दावा करतात असा कोणताही बॉम्ब निर्मितीचा कारखाना आढळला नाही असे गृहखात्याने माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या अर्जावर उत्तर दिले.

अमित शहा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना प. बंगालमध्ये प्रत्येक जिल्ह्यात बॉम्ब निर्मितीचे कारखाने असल्याचे विधान केले होते. या विधानाची नंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी री ओढली होती व तसा प्रचार भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू केला होता.

शहा यांच्या अशा दाव्याची शहानिशा करण्यासाठी साकेत गोखले यांनी गृहखात्याकडे माहितीचा अर्ज करून सरकारने प्रत्येक जिल्हावार बॉम्बनिर्मिती कारखान्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती. शहा यांचे विधान त्यांच्याकडे असलेल्या माहिती आहे का, ती असल्यास प. बंगाल पोलिसांकडे ही माहिती द्यावी असेही त्यांनी आपल्या अर्जात म्हटले होते.

३ मार्च २०२१ रोजी गोखले यांनी एक ट्विट करून गृहखात्यानेच प. बंगालमध्ये जिल्हावार बॉम्बनिर्मितीच्या कारखान्याची आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले. उलट गृहखात्याने आमच्याकडे माहिती घेण्याऐवजी प. बंगाल पोलिसांकडे ही माहिती मागवावी व हा विषय राज्य सूचीतला असल्याने तेच योग्य माहिती देऊ शकतात, असे उत्तर दिले होते.

वास्तविक गोखले यांना पहिल्यांदा गृहखात्याने माहिती उघड करण्यास असमर्थता दर्शवली होती. गृहखात्यातील एका अधिकार्याने आम्हाला माहिती न देण्यास सांगितल्याचे गोखले यांना उत्तर दिले होते.

अशी माहिती न देणे हे चित्र ‘नव भारता’चे उदाहरण असल्याचे ट्विट गोखले यांनी नंतर केले होते. गोखले यांनी आपल्याला मिळालेले गृहखात्याचे उत्तर बंगाली वृत्तवाहिन्यांनी बंगाली भाषेत भाषांतरीत करून प्रसिद्ध करावे, अशीही विनंती केली होती.

ट्विटरवर गदारोळ

गोखले यांच्या या ट्विटवरून बराच गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपकडून प. बंगालची प्रतिमा कलंकित केली जात असल्याचा आरोप केला होता.

भाजपचा आक्रमक प्रचार

अमित शहा यांच्या बॉम्ब निर्मिती संदर्भातील विधानानंतर प बंगालमधील अनेक भाजप नेत्यांनी तृणमूल सरकारवर टीका सुरू केली होती. नोव्हेंबर २०२०मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगालमध्ये केवळ बॉम्बनिर्मितीचे कारखाने तयार होत नसून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प. बंगाल राज्य ‘दुसरे काश्मीर’ केल्याचा आरोप केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: