कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत

कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत

मुंबई: कोरोना महासाथीत कर्तव्यावर असताना मरण पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण

कोरोना निर्बंध शिथील; धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच
कोरोना व जगाचे बदलले जाणारे अर्थकारण : भाग १
कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे महासंकट

मुंबई: कोरोना महासाथीत कर्तव्यावर असताना मरण पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली. त्या शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीने ७४ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा मंगळवारी, १ जून २०२१ रोजी ७३ वा वर्धापनदिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच अनिल परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ३० जून २०२१ पर्यंत वाढविला आहे. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहिर केले.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतूकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी सुमारे चार हजार चालक व वाहक रस्त्यावर उतरले होते. या सेवेच्या माध्यमातून महामंडळाला प्रतिदिन १ कोटी रूपयांचा महसूल मिळत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्यांतच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून एसटी बसेस काढून घेण्यात आल्याचे ॲड. परब यांनी सांगितले.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश ॲड. अनिल परब यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

महाकार्गोच्या चालकांना १५० रूपये भत्ता

कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा ॲड. परब यांनी केली. त्यामुळे या चालकांची ओढाताण होणार नाही, याची काळजी महामंडळ आजपासून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: