लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी

लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. समाजातील प्रत्येक घटक या लॉकडाऊनने प्रभावित झाला आहे. यातील एक घटक म्हणजे शेती आणि  शेतकरी. राज्यातील एकंदरीत

१५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी
राज्यात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. समाजातील प्रत्येक घटक या लॉकडाऊनने प्रभावित झाला आहे. यातील एक घटक म्हणजे शेती आणि  शेतकरी. राज्यातील एकंदरीत शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती पाहिली तर शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, वातावरणातील बदल, वेळी अवेळी पडणारा पाऊस आणि बाजारातील होणारा चढउतार यामुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

१८ मार्च २०२० रोजी आमच्या बार्शी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याचा रात्री १०.३० वाजता फोन आला. त्याच्या ४ एकर जमिनीमध्ये त्याने द्राक्षाची लागवड केली होती.  द्राक्ष २ दिवसात काढून विक्रीसाठी निर्यात करणार होता. आदल्या दिवशी म्हणजे १७ मार्चला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना त्याने द्राक्ष खाण्यासाठी निमंत्रित केले होते.  यावर्षी चांगला माल तयार झाला आहे म्हणून योग्य मोबदला मिळेल या आनंदात होता.  पण दुसर्‍या दिवशी मुसळधार झालेल्या पावसामुळे काय करावे हे सुचत नव्हते.  ‘फोनवर म्हणाला,  ‘काही नाही फक्त पिकाकडं पाहत बसलोय सगळे’. ‘काहीही सुचेनास झालयं’. त्यादिवशी जवळपास २ तास पाऊस शेतात झाला होता. जसा पाऊस थांबला तसे त्याने आणि घरातील सगळ्यांनी मिळून हाताला दिसेल ती वस्तू घेत शेतातील पाणी काढायला सुरुवात केली होती. हीच परिस्थिती द्राक्ष, केळी, भाजीपाला उत्पादक आणि फळ उत्पादकांची आहे. कर्नाटकमधील गदगच्या शेतकर्‍याने स्वत:च कलिंगड शेतातून काढून टाकायला सुरुवात केली.  उन्हाळ्यातील सर्वात अधिक खपाचे पीक आहे म्हणून शेतकरी कलिंगड, खरबूज, काकडी यांचे पीक घेतो. पण कधी अवकाळी पाऊस तर कधी कमी बाजारभाव तर आता लॉकडाउनसारखे अनपेक्षित संकट ‘आ’ वासून शेतकर्‍यांच्या पाचवीला पूजले आहे.

राज्यातील साखर उद्योग आधीच अडचणीत सापडलेला असतांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साखरेची निर्यात जवळपास २० मार्चपासून बंद आहे. लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही राज्यातील साखर निर्यातीला बंदी आहे.  त्यामुळे साखर गोदामात जवळपास ९० टन साखर पडून आहे.  नाशिकप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातही द्राक्ष शेतकरी संख्या मोठी आहे. आधी अवकाळी पावसामुळे कमी भाव मिळाला आणि आता  लॉकडाऊनमुळे द्राक्ष निर्यात अनेक राज्यातील अनेक शेतकरी करू शकले नाहीत. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी मनुके/बेदाणे निर्मितीत जाण्याचे ठरवले आहे.

या बेदाणे निर्मिती करिता डीपिंग तेल वापरले जाते.  लॉकडाऊनच्या आधी रु. १००-२०० लीटर दराने विक्री होणारे तेलाने आता ४०० रुपयापर्यंत चढ्या दराने विक्री होताना आमचे शेतकरी सांगत आहेत.

जागतिक स्तरावर कोविड १९ मुळे जग महामंदीच्या वाटेवर उभे आहे असे तज्ज्ञ मंडळीचे म्हणणे आहे. बार्शी तालुक्यातील काही तरुण  शेतकर्‍यांसोबत फोनवर बोलतं होतो, हे सगळे तरुण शेतकरी शिकलेले आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. यातील एक दोघाजणांनी जे वाक्य बोलले ते शेतकर्‍यांच्या स्थितीबद्दल खूप काही सांगून जाते; ते वाक्य होते, ‘आपला शेतकरी दरवर्षी महामंदीच्या वाटेवरच शेती करतो. तुम्हीच पहा गेल्या वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे पहिलं पीक उगवलचं नाही. यावर्षी चांगला पाऊस पडला हा आनंद मिळायच्या आत अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. जो काही माल उरला तो लॉकडाऊनमुळे अडकून पडला. फळे, भाजीपाला हा नाशवंत माल आहे, मग काय मिळेल त्या भावात देऊन टाकायचा. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुन्हा कर्जाचा हप्ता थकीत करून चक्रवाढ व्याज वाढत राहणार!’ ही शेतकर्‍यासाठी महामंदीचं नाही का?  यापरिस्थितीपुढे  मी निरुत्तर होतो.

लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद आहे.  दोन तास सकाळी भाजीपाला विक्री ठेवली तर त्याठिकाणी होणारी प्रचंड गर्दी पाहता सरकारने त्यावर बंदी घातली. सरकारची भूमिकाही योग्यच आहे. पण या कोरोनामुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे हेही वास्तव आहे.  गेल्या वर्षीचा म्हणजे वर्ष २०१९-२०चा जीडीपी दर पाहिला तर तिसर्‍या तिमाहीत सहा वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. लॉकडाऊनमुळे हा परिणाम अजून तीव्र होऊ शकतो. केपीएमजीने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ‘पोटेन्शियल इपॅक्ट ऑफ कोविड १९ ऑन द इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालात कोविड १९मुळे जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे.  कोरोनामुळे पुरवठा आणि मागणीला सर्वाधिक फटका बसत आहे. आधी २०१९मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. आता कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आंतरराष्ट्रीय घडामोडीना मर्यादा आल्या आहेत. या स्थितीत लवकर मात केली नाही तर महामंदी दारात उभी आहे.

आशिया खंडातील कांदा खरेदी विक्रीचे केंद्र असलेल्या लासलगाव मंडी येथे ६ एप्रिल २०२० रोजी या वर्षीच्या सीझनमधील अत्यंत कमी किंवा नगण्य दर म्हणणे योग्य ठरेल तो म्हणजे प्रती किलो ३ रुपये इतका होता तर निर्यात केल्या जाणार्‍या कांद्याला ९ रुपये प्रती किलो इतका दर मिळाला. येथील मार्केट यार्डच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे कांद्याची आवक जरी होत असली तरी निर्यात होत नाहीये.  मंडीतील ४० % कांदा हा हॉटेल्समध्ये सप्लाय होत असतो पण लॉकडाऊन सगळच बंद असल्यामुळे कांदा तसाच पडून आहे. अशीच अवस्था केळी, कलिंगड, खरबूज, भाजीपाला, काकडी  उत्पादकांची आहे.

कोविड १९ वाढता प्रसार आणि शेती, शेतकरी आणि अन्न धान्य उत्पादन यांची स्थिती पाहता येणार्‍या काळात जागतिक स्तरावर अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याचा धोका संयुक्त राष्ट्र अन्न आणि सुरक्षा प्रमुखांनी म्हटले आहे. शेती, शेतकरी यांचे काम सुरू लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यासाठी २९ मार्च २०२० रोजी केंद्राचे आदेश दिले. शेतीतील कामे सुरू असली तरी मालाला भाव नसेल मागणी आणि पुरवठ्यात तफावत असेल तर शेतकर्‍याने जगायचे कसे हा प्रश्न पुन्हा लॉकडाऊनमुळे  ऐरणीवर आला आहे.

सुरेश शेळके, FIAN International  या आंतरराष्ट्रीय फूड नेटवर्कचे सदस्य आहेत.

संदर्भ-

  1. https://home.kpmg/content/dam/kpmg/in/pdf/2020/04/potential-impact-of-covid19-on-the-indian-economy.pdf
  2. https://www.theguardian.com/global-development/2020/mar/26/coronavirus-measures-could-cause-global-food-shortage-un-warns?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0