देशात २१ हजार शिबिरात साडे सहा लाख स्थलांतरित

देशात २१ हजार शिबिरात साडे सहा लाख स्थलांतरित

नवी दिल्ली  : देशात २१ हजार निवारा शिबिरे असून त्यात साडेसहा लाखाहून अधिक स्थलांतरित, गरजू नागरिक राहात आहेत. त्याशिवाय अन्य शिबिरे व ठिकाणी २३ लाखाहून अधिक नागरिकांना जेवण पुरवले जात आहे, असे सरकारने स्पष्ट केले. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्व नागरिक फसले आहेत. पण केंद्र व राज्यातल्या समन्वयामुळे परिस्थिती समाधानकारक असल्याचा सरकारचा दावा आहे.

निवारा शिबिरात राहणारे गरीब, निराश्रित व फसलेले मजूर, कष्टकरी असून या नागरिकांना केवळ जेवणाची गरज आहे. तसेच काही नागरिक त्यांच्या गावात, शहरात पोहचले आहेत पण त्यांना विलगीकरणात ठेवले आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने स्थलांतरित मजुरांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणाने सबुरीचे, समजुतीचे व प्रबोधनाचा दृष्टिकोन ठेवावे असे निर्देश दिले आहेत. या लाखो स्थलांतरितांचे विलगीकरणाबाबत स्थानिक नेतृत्व, आरोग्य सेवक, स्वयंसेवक, समुपदेशकांकडून प्रबोधन करण्यात यावे. त्यात पोलिसांनाही सहभागी करून घ्यावे, त्यांच्या उपस्थितीत असे प्रयत्न करावे, त्यांच्या व्यथा, प्रश्न समजून घ्यावेत, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी उ. प्रदेशात अग्निशमन दलाने स्थलांतरित मजुरांवर सॅनिटायझरचे फवारे मारल्याची घटना उघडकीस आल्याने देशभर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते, त्यानंतर आरोग्य खात्याने स्थलांतरिताबाबत अनुकंपत्वाची भूमिका घ्यावी, असे पत्रक काढले.

COMMENTS