किंग कोरोना वि. अमेरिकन स्पिरीट

किंग कोरोना वि. अमेरिकन स्पिरीट

कोरोना विषाणूच्या आपत्तीने अमेरिकन जनमानसात आणि त्यांच्या दृष्टिकोनात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणले आहे.

असामान्य व अतिसामान्य
ट्रम्प यांच्या जनगणनेच्या योजनेमध्ये डेटाच्या गैरवापराची भीती
ट्रम्प आणि ‘चौघीजणी’

सर्वत्र बोलबाला चालू असलेल्या विषयावर पुन्हा एखादा लेख लिहिणे हे निरर्थक वाटते. मी असे काय सांगणार जे यापूर्वी सांगितले वा लिहिले गेलेले नाही?

सध्याचे भयग्रस्त वातावरण आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा निर्धार यावर लक्ष केन्द्रित असल्यामुळे जे पूर्णपणे दुर्लक्षिले गेले आहे असे ते “काहीतरी” म्हणजे या कोरोना नावच्या आपत्तीने अमेरिकन जनमानसात आणि त्यांच्या दृष्टिकोनात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणले त्याबद्दल लिहिणे मला जरुरीचे वाटते.

या आपत्तीचा अमेरिकन जीवनशैलीवर प्रदीर्घ काळासाठी प्रभाव पडणार असून, फार मोठे आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तन घडून येईल असे मला वाटते.

पाश्चात्य जग, आपल्या नेहेमीच्या दुर्दम्य आशावादासह, या विषाणूला प्रतिकार करून त्याच्या विरूद्धच्या लढाईत, विजय मिळविण्यासाठी झटत आहे. मला खात्री आहे की अपेक्षेपेक्षा लवकर यात ते यशस्वी होतील. कदाचित अजून सहा महिन्यानंतर हा विषाणू एक कटू आठवण बनून जाईल व लोक या अतिरंजित (?) केल्या गेलेल्या आणि दर वर्षी येणार्‍या फ्लूच्या साथीपेक्षा फार वेगळ्या नसलेल्या गोष्टींबद्दल बोलणं ही विसरतील. अमेरिकेचा अशा आघाड्यांवरचा पवित्रा हा ‘आम्ही हे करूनच दाखवू’ असा असतो.

बहुतांश वेळा हे खरंही असते आणि तसेच याही वेळी त्यांना असा आत्मविश्वास आहे की, ते कोरोनावर नक्की मात करून जनजीवन पूर्वपदावर आणतील आणि त्यांची ‘खा, प्या, मजा करा’ ही जीवनशैली पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरू होईल. आजवर 9/11, स्वाइन फ्लू, देशातील आणि बाहेरील दहशतवादी हल्ले, पूर, वादळे, शाळांतील सामूहिक हत्या इत्यादी सर्व प्रकारच्या आपत्तींवर अमेरिकेने यशस्वीपणे मात केली आहे. वरीलपैकी कोणतीही आपत्ती अमेरिकन जनतेचा आशावादी दृष्टिकोन आणि धैर्य दुणावू शकली नाही. अगदी महिन्याभरापूर्वी, शेअर बाजाराने उच्चांक गाठला असताना, सर्व रेस्तराँ ओसंडून वाहात होती, लोक मनमुराद आनंद लुटत होते, पर्यटन करत होते, जगात कोणतीही काळजी वा दु:ख नसल्याप्रमाणे आनंद साजरा करून जीवनाचा आस्वाद घेत होते.

मात्र आज हे सर्व दूर, काळाच्या पडद्याआड गेल्याप्रमाणे भासत आहे. आजूबाजूला दिसत असलेले चिंतायुक्त आणि भयग्रस्त चेहरे आणि त्यांच्या डोळ्यातील भयचकित भाव, यावेळी काहीतरी भयंकर बदललेले आहे, असे सांगून जातात. शेअर बाजाराची घसरण आणि बेकारी हे केवळ हिमनगाचे टोक आहे; आतून सगळं ढासळलेलं आहे. धोक्याची पूर्व सूचना असतानाही, हा विषाणू प्रथम चीन आणि नंतर युरोपमार्गे अमेरिकेत येऊन थडकलाच. या विषाणूला कमी लेखण्याची ट्रम्पची खेळीही चालली नाही. अत्यंत आशावादी, चिंतामुक्त जगात वावरत असलेले अमेरिकन जणू एका रात्रीत पूर्ण बदलून, केवळ जगण्यासाठी धडपडू लागले.

सर्व प्रकारची सुबत्ता असलेल्या देशातील दुकानांमध्ये टॉयलेट पेपर, अन्नधान्य, खाद्य पदार्थांचा तुटवडा जाणवणे, आणि अगदी सुखवस्तू लोकांनाही त्याची कमतरता भासणे, ही एक आश्चर्यकारक बाब होती. अशा कसोटीच्या वेळेस अस्तित्वासाठीची धडपड माणसातील पशुवृत्ती जागी करते. टीव्हीवर दाखवण्यात येणारी डिपार्टमेंट स्टोरमधील दुधाच्या शेवटच्या कॅन आणि क्लोरेक्सच्या बाटलीसाठीची भांडणे व मारामार्‍या यामुळे लोकांमध्ये फक्त स्वत:चा विचार करण्याची प्रवृत्ती प्रबळ होताना दिसत होती.

मला खात्री आहे की हे लवकरच कमी होईल आणि एक नवी सामान्य जीवनपद्धती उदयास येईल ज्यामध्ये, अगदी काही महिन्यांसाठी का होईना, पण लोकं आपणहून स्वयंशिस्तीने वागून, अतिरिक्त खरेदी, चंगळवाद, पर्यटनाला आळा घालून, मौजमजेच्या जीवन शैलीत बदल घडवून आणतील. असे झाले तरच काही महिन्यातच हे ओसरून सर्व काही पूर्वपदाला येईल. या संभाव्यतेचे परिणाम मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेवर होतील. अर्थव्यवस्था निश्चितपणे मंदीकडे वाटचाल करेल, शेअर बाजारात मोठी घसरण होईल आणि आर्थिक घडामोडींची गती मंदावेल. त्यावर मात करण्यासाठी काही वर्षे लागतील; पण शेवटी, चक्र फिरेल. हा एक चांगलाच धडा मिळेल आणि तरुणवर्ग यापुढे काही काळ तरी शेअर बाजारपासून लांब राहील असे वाटते.

तथापि, अमेरिकन मानसिकतेमध्ये व सांस्कृतिक वर्तनामध्ये याच्याहीपेक्षा अधिक गंभीर व दीर्घकाळ टिकणारा बदल घडून येणार आहे. अमेरिकन मानस उध्वस्त झाले आहे कारण त्यातील आपण अजिंक्य आणि सुरक्षिततेची भावना हरपली आहे. लोकांना वाटणार्‍या असुरक्षितेतून एकमेकांबद्दल संशय निर्माण होत आहे व लोकं आपला आत्मविश्वास गमावत चालले आहेत. यामुळे लोक फक्त आता तग धरून टिकून कसे राहता येईल हेच पाहताहेत.

या विषाणूच्या “परकीय” असण्याचे ट्रम्प यांनी पुरेपूर भांडवल करून घेतले. आता त्यामुळे, सर्वच परकीय वस्तुंकडे अमेरिकन लोक संशयाच्या नजरेतून पाहतील आणि त्यांच्या एकूणच वागणुकीत लक्षणीय बदल घडून येतील अशी दाट शक्यता आहे.

त्यांच्या यादीतून परदेशवारीला काट मारली जाईल आणि परदेशातून – प्रामुख्याने आशियातून – आयात केलेल्या वस्तू संशयास्पद ठरतील. आपल्या घरातील महागड्या टीव्ही संचावर अख्खे जग सुखासिनपणे पाहता येत असतांना कंबोडिया अथवा कझाकिस्तान अशा दुर्गम व अनोळखी देशांमध्ये आपण प्रत्यक्ष जाऊन एखाद्या विचित्र विषाणूचा संसर्ग करून घेण्याची शक्यता कशाला ओढवून घ्या, असा प्रश्न अमेरिकन लोक स्वतःला विचारतील. हाच विचार दूरस्थ देशांमधील समुद्रसफरी व मोठ्या गटांनी करण्यात येणार्‍या सहली यांच्याबद्दलही केला जाईल. स्वतःला घरात डांबून घेणं ही कंटाळवाणी शिक्षा न वाटता आपल्या घराच्या चार भिंतींमध्ये असलेली सुरक्षा आता हवीहवीशी वाटू लागेल.

स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व ही अमेरिकन जीवनशैलीची बोधवाक्ये आहेत, जी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यावर कोरलेली आहेत. या बोधवाक्यांना ट्रम्प महाशयांनी आधीच नुकसान पोहोचवलेले आहे, परंतु यापुढे होऊ शकणार्‍या परस्परसंवादांना व संपर्कांना संशयामुळे नाकारणे ही प्रवृत्ती आता अमेरिकन जीवनप्रवाहाचा मुख्य भाग सहज बनून जाईल. याचे दूरगामी परिणाम जागतिकीकरण, जागतिक सहचर्य आणि जागतिक परस्परविश्वास यांवर होतील. सांस्कृतिक व आर्थिक संबंध देखील एका दशकाने मागे जातील. जगातल्या काही विशिष्ट ठराविक धंदेवाईक लोकांनी अतिशय धूर्तपणे भडकवलेल्या “आपण विरुद्ध ते” या कुटील विचारांना यामुळे अधिकच खतपाणी मिळेल. असा विचार करणार्‍या लोकांसहित सर्व जगासाठी हे खूपच हानिकारक आहे,

बरं, सर्वसामान्य कौटुंबिक स्तरावर काय? तर, इथेही मानसिकता बदललेली आहेच. अमेरिकी अर्थव्यवस्था ही नेहमीच पराकोटीचा चंगळवाद व वारेमाप उधळपट्टी यावर आधारलेली होती व आहे. आता, फक्त तग धरून जिवंत राहण्याची वेळ प्रथमच आल्यामुळे, लोक संयमी होऊन काटकसरीने जीवन जगण्याचा विचार करताहेत – जसे की घरचेच अन्न खाणे, कर्ज व सहा महिन्यांचे आगाऊ वेतन घेऊन ती रक्कम वायफळ गोष्टींवर न उधळणे, खर्चिक पर्यटन न करणे आणि केवळ घरी बसून राहणे इत्यादी.

या उत्पातानंतर परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे.

ही आता सामान्य जीवन जगण्याची नवीन जीवनशैली बनते आहे आणि लोकांना लवकरच याची सवयही होऊन जाईल. मोकळा वेळ भरून काढण्याकरिता टीव्ही व इतर करमणुकीची साधने उपयोगी पडतील. वाईटात चांगली गोष्ट अशी की या बदलामुळे कौटुंबिक संवाद व शेजार्‍यांतील संवाद वाढतील. इंटरनेट व घरगुती करमणूक करणार्‍या उद्योगांसाठी मात्र हे बदल सकारात्मक असणार आहेत. कामाच्या जागी प्रत्यक्ष न जाता दूरस्थपणे काम करण्याच्या तसेच संपर्क करण्याच्या नवनवीन व पर्यायी पद्धती शोधून काढल्या जातील.

पुढे काय? ही परिस्थिती कमीत कमी ६ महिने, किंवा त्याहूनही अधिक काळ, अशीच राहील. परिस्थिती पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया अत्यंत धीमी असणार आहे व त्यास अनेक वर्षे ही लागू शकतात, परंतु यात “अमेरिकेनत्त्व” कायमस्वरूपी बदलले जाणार आहे. ते जास्तच आत्मकेंद्रित बनतील तसेच परदेशी व्यक्तींकडे व एकमेकांकडे संशयाने पाहतील. त्यांच्यात सावधपणाचा अतिरेक व प्रत्येक वळणावर मागे वळून पाहण्याची वृत्ती बळावत जाईल. अज्ञाताचे भय व बरेच काही गमावण्याची भीती या दोन्ही गोष्टींचे हे स्फोटक मिश्रण असणार आहे व त्यातून लोकांमधल्या चांगुलपणापेक्षा लोकांतील दृष्ट प्रवृत्ती बाहेर येतील, हीच भीती आहे.

अमेरिकन हे नेहमीच खुल्या दिलाचे, मैत्री करण्यास उत्सुक, साहसी तसेच निडर म्हणून ओळखले जात होते. हेच अमेरिकन संस्कृतीचे/ जीवनाचे सार होते. अमेरिकेचे मनोधैर्य खच्ची करणे हेच कोरोना विषाणूने केलेले सर्वात मोठे नुकसान असेल.

 सुनील देशमुख, वॉल स्ट्रीट येथील कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी आहेत. “महाराष्ट्र फाउंडेशन अवॉर्डस फॉर लिटरेचर अँड सोशल वर्क” या प्रतिष्ठित संस्थेचे ते प्रणेते आहेत.

अनुवाद – यशवंत मराठे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0