भारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण

भारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची लागण झालेले दिल्ली व तेलंगणात प्रत्येकी रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. दिल्लीतील कोरोनाची लागण झालेला रुग्णाला तो इटालीत असताना लागण झाली होती तर दुसऱ्या रुग्णाला दुबईत लागण झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. या दोन रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर देखरेख केली जात आहे.

कोरोनाचा फैलाव पाहता सरकारने चीन, दक्षिण कोरिया, जपान, इटली, इराण, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया व नेपाळ या देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या प्रत्येक प्रवाशाचा पत्ता व मोबाइल क्रमांकांची नोंद ठेवली जाणार आहे. तशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व विमानतळांना दिल्या आहेत.

दरम्यान, जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे रविवारी चीनमध्ये आणखी ४२ जणांना मृत्यू झाला असून चीनमधील एकूण मृतांची संख्या २,९१२ इतकी झाली आहे. तर जगभरात या विषाणूचे तीन हजाराहून अधिक बळी ठरले आहेत. जगभरात या विषाणूचे संक्रमण झालेल्यांची संख्या ८८ हजार झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोना विषाणू लागण झालेले २०२ नवे रुग्ण आढळले त्यामुळे एकट्या चीनमध्ये या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८०,०२६ इतकी झाली आहे. रविवारी मृत्युमुखी पडलेले ४२ रुग्ण हुबई प्रांतातले आहेत.

हाँगकाँगमध्ये रविवारी ९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले असून तेथे दोन मृत्यू झाले तर मकाऊमध्ये १० व तैवानमध्ये ४० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.

द. कोरियात कोरोनाची ५०० प्रकरणे उघडकीस आली आहेत त्यामुळे या देशात कोरोना विषाणूचे ४ हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

आखाती देशातल्या इजिप्तमध्ये कोरानोच्या आणखी एका रुग्णाची नोंद झाली आहे. या अगोदर १४ फेब्रुवारीला एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे इजिप्तमधून येणाऱ्या प्रवाशांना आखाती देशातील सर्व देशांनी प्रवेशास बंदी घातली आहे. कुवेतने इजिप्त सोडून अन्य देशांच्या नागरिकांना प्रवेश दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS