नवी दिल्ली/वॉशिंग्टन/बीजिंग : भारतामध्ये रविवारी एकाच दिवशी २० हजार कोरोनाचे रुग्ण आढळले असून जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीहून अधिक झाली आहे.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन/बीजिंग : भारतामध्ये रविवारी एकाच दिवशी २० हजार कोरोनाचे रुग्ण आढळले असून जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीहून अधिक झाली आहे. भारतात गेल्या २४ जून ते २८ जून या ५ दिवसांत रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड वाढ झाली असून देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ५,२८,८५९ इतका झाला आहे. तर मृतांचा आकडा १६,०९५ इतका झाला आहे.
२७ जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारच्या पुढे होती तर २६ जूनला ती १७ हजारच्या पुढे आणि २५ जूनला १६ हजारचा आकडा पार केला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार १ जूनपासून कोरोना रुग्णांची संख्या ३,३८,३२४ इतकी झाली आहे. देशात कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या २,०३,०५१ इतकी असून ३,०९,७१२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन ते खडखडीत बरे होण्याचे प्रमाण ५८.५६ टक्के आहे.
महाराष्ट्रात २४ तासात सुमारे साडेपाच हजार रुग्णांची नोंद
महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून रविवारी राज्यात ५ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले तर २, ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. रविवारी राज्यात कोरोनामुळे १६७ रुग्ण दगावले.
राज्यात आतापर्यंत ९ लाख २३ हजार ५०२ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील १ लाख ६४ हजार ६२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण१७.८२ टक्के इतके आहे. सध्या ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असून एकूण ६० हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.
जगात कोरोनाच्या बळींचा आकडा ५ लाखाच्या आसपास
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा ४,९९,२९६ इतका झाला असून अमेरिकेत मृतांचा आकडा १,२५,५३९ तर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २५,१०,३२३ इतका झाला आहे. तर जगभरात कोरोना लागण झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा १ कोटी ४ हजार ६४३ इतका झाला आहे.
अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक १,३१,३६६७ इतकी तर मृतांचा आकडा ५७,०७० इतका झाला आहे.
अमेरिकेच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव
अमेरिकेच्या शहरी भागात पसरलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागाकडे पसरू लागला असून टेक्सास व फ्लोरिडा राज्यात त्याचे प्रमाण अधिक दिसू लागले आहे. या दोन राज्यांशिवाय कान्सासमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
जॉन हॉपकिन्सने दिलेल्या माहितीनुसार १९ जूनपासून कॅलिफोर्निया, अर्कांन्सस, मिसुरी, कान्सास, टेक्सास, फ्लोरिडा या राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
पाकिस्तानात कोरोनाचे २ लाख रुग्ण
पाकिस्तानात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४,०७२ रुग्ण आढळले असून या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाखाहून अधिक तर मृतांची एकूण संख्या ४,११८ इतकी झाली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब, खैबर पख्तुनवा, इस्लामाबाद, बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टीस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
मूळ बातमी
COMMENTS