कोरोना आणि दक्षिण कोरीया

कोरोना आणि दक्षिण कोरीया

गेल्या काही दिवसांत वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे यांमध्ये ‘कोविड १९’ विरुद्धच्या दक्षिण कोरीया च्या मॉडेलबद्दल चर्चा सुरु आहे. जर्मनी, स्विडन आणि देशातल्या अनेक नेत्यांकडूनही दक्षिण कोरीयाच्या मॉडेलचे नाव पुढे आले आहे. ‘कोविड -१९’ साथीच्या विरोधात उपाययोजना करण्यासाठी युरोपिय महासंघ, ब्रिटन व इतर देशांनी कोरीया च्या सरकारशी सल्लामसलत केली असून, माहितीचे सहाय्य मागितले आहे. काय आहे, कोरीया चे मॉडेल?

दक्षिण कोरिया चाचणी मॉडेल

दक्षिण कोरिया चाचणी मॉडेल

दक्षिण कोरीया मध्ये ‘कोविड -१९’चा पहिला रुग्ण २० जानेवारीला आढळला आणि त्यानंतर तीन महिने झाले. या काळात रुग्णसंख्या १० हजार ६०० झाली मात्र मृत्यू २३० च्या (मृत्यूदर – २%) आसपास आहे. दक्षिण कोरीया त्या मोजक्या उदाहरणांपैकी एक आहे, ज्यांनी ‘कोव्हिड-१९’च्या साथीच्या आलेखाचे सपाटीकरण (flattening curve) केले आहे. आणि या काळामध्ये सामान्य जनजीवन सुरळीत ठेवण्यात आले आहे. याबाबत कारणमिमांसा करताना कोरीयाच्या सरकारच्याच शब्दात सांगायचे तर TRUST ही पध्दत वापरली गेली. TRUST म्हणजे पारर्दशकता,  मोठ्या पातळीवर जलद छाननी व विलगीकरण, नविन पण सर्वमान्य चाचणी, कडक नियंत्रण व उपचार. यामध्ये सरकारची धडाडीची पावले, अनुभव व त्याचा वापर, कल्पकता व महत्वाचं म्हणजे याप्रत्येक टप्प्यावर वेळेशी केलेला करार.

‘कोविड -१९’चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर दक्षिण कोरीया चे राष्ट्रपती मून जे-इन यांनी देशातील २० खाजगी औषध कंपन्यांची बैठक बोलावली आणि टेस्टींग कीट्स तयार करवून त्यांचे बहुउत्पादन करण्यास सांगितले. देशात स्पर्धा असल्याने प्रत्येक कंपन्या उत्तम टेस्ट कीट्स तयार करु लागल्या आणि त्यानंतर लगेच सरकारी आरोग्यसंस्था (KCDC ) त्यांचे परिक्षण करुन परवानगी देत होत्या. दुसऱ्याच आठवड्यात दर दिवशी १ लाख किट्स तयार होऊन दररोज १० हजार लोकांच्या चाचण्या सुरु झाल्या. सध्या दररोज ३.५ लाख किट्स तयार होत असून, ते १० लाखावर नेण्याचा कोरीयाचा मानस आहे.

मोठ्या प्रमाणावर समुह चाचण्या केल्याने, मध्यम लक्षणे दिसणारे वा अजिबात लक्षणे न दिसणारे रुग्ण सापडू लागले. पण ३१ वा रुग्ण सापडल्यानंतर मात्र कोरोनाचा उद्रेक झाला. नंतर मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले. ही रुग्ण म्हणजे एक पन्नाशीतील स्त्री होती. त्यांचा एक अपघात झाला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यास सांगितले आणि वेगळे राहण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी तो ऐकला नाही. त्यांनी  भेटीगाठी चालू ठेवल्या आणि समारंभास हजेरी लावली. कोरीया मध्ये वादग्रस्त असलेल्या शिनचोंगजी चर्चमध्ये भरलेल्या प्रार्थनासभेस हजेरी लावली. यावेळी तिथे सुमारे दहा हजार लोक उपस्थित होते. याच घटनेने कोरीयातील देगू शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. अशावेळी त्या व्यक्तीने केलेला प्रवास, ती सार्वजनीक ठिकाणे व लोक यांची माहिती असेल तर त्या मार्गातील लोकांना सुचित करुन प्रसारास पायबंद घालता येतो. या ठिकाणी कोरीयाला त्यांचा जुना अनुभव उपयोगाला आला.

२०१५ च्या सुमारास मध्य पुर्वेमध्ये विषाणूची साथ आली होती. त्यातील विषाणूला एमईआरएस (MERS) विषाणू म्हंटले गेले. त्या साथीदरम्यान बहारीनमधून आलेल्या एका कोरीयाई उद्योगपतीस त्याची लक्षणे होती. त्याने त्यावेळी तीन-चार वेगवेगळ्या रुग्णालयांत जाऊन नेहमीच्या आजारांवरचे उपचार घेतले. त्यावेळी डॉक्टरांनाही ‘एमईआरएस’ची माहिती नव्हती. अनेक चाचण्या झाल्यावर निदान झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्या रुग्णाच्या संपर्कात कोण आले होते, त्याचा प्रवास याबद्दल काहीच कळणारे नवहते. या साथीमुळे कोरीयामध्ये ३८ मृत्यू झाले. त्यातून धडा घेऊन त्यावेळी कोरीयाई सभागृहाने साथीच्या आजाराला पायबंद घालण्यासाठी  कायदा संमत केला. ज्याअन्वये सरकारला विलगीकरणातील व संक्रमीत रुग्णांचा प्रवास इतिहास व हालचाल समजण्यासाठी, त्याच्या डेबिटकार्डच्या वापराचा, जीपीएस (GPS) व मोबाईलच्या लोकेशनचा मागोवा घेण्याचा अधिकार मिळाला. यामुळे संक्रमीत रुग्णांचा गेल्या काही दिवसांतील प्रवासाचा इतिहास केसीडीसी (KCDC) सार्वजनिक करते व त्या त्या ठिकाणी जाऊन चाचणी करुन लोकांनाही सुचित केले जाते. याच सार्वजनिक माहितीचा (डाटा) वापर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी करुन एक ॲप बनवले. ज्यामध्ये सापडलेले रुग्ण व त्याच्या प्रवासाचा इतिहास समजतो. याचाही वापर करण्यात आला.

यानंतर कोरीया प्रशासनाने तातडीने त्या चर्चच्या सर्व २.५ लाख सदस्यांची माहिती मागवून संभावितांचे  विलगीकरण करुन छाननी सुरु केली व हा आकडा आठवड्याभरात ६ हजारवर पोहोचला. पण हे कठोर पाउल उचलल्यामुळे कोरीयामधील परिस्थिती आटोक्यात आली. याच दरम्यान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘इनचोन मेडिकल सेंटर’मधील डॅा. जीन योंग की यांनी कारमध्ये बसूनच दहा मिनिटांत चाचणी करण्याची संकंल्पना मांडली, जी लोकांना व रुग्णालये या दोघांना सुलभ व त्रास कमी करणारी होती. या चाचणीचा निकाल तुम्हाला मोबाईलवर सहा तासात मिळतो. कल्पकता व तंत्रज्ञान यांचा एकत्रीत उपयोग केलेली, हिच ती जगात आत्ता नावाजली जाणारी कोरीयाची (Drive through) पध्दत होय.

राष्ट्रपती मुन जे-इन

राष्ट्रपती मुन जे-इन

कोरीया  हा महाराष्ट्राच्या अर्ध्या भूभागा एवढा आहे आणि लोकसंख्या ५.१ कोटी आहे. सरकारने देशात सध्या ६०० चाचणी केंद्रे उघडली आहेत त्यामध्ये वैयक्तीक सुरक्षा साधनांसह (पीपीई) आरोग्यसेवक सुसज्ज आहेत.  कोरोनाोबाधीत रुग्णांना त्यांच्या घरातून रुग्णवाहिकेने आणण्यापासून ते रुग्णालयातील सर्व सेवा व खर्च सरकारद्वारे करण्यात येत आहे. मास्कची

आधिकृत मास्क विक्री केंद्रांची व तेथील उपलब्धतेची नकाशावर लोकांना मिळणारी माहिती.

आधिकृत मास्क विक्री केंद्रांची व तेथील उपलब्धतेची नकाशावर लोकांना मिळणारी माहिती.

साठेबाजी व बहुखरेदी टाळण्यासाठी सरकारने मार्चमध्येच ८० टक्के  मास्क खरेदी करुन त्यांची पोस्ट ॲाफीस व फार्मसीमध्ये योग्यदराने विक्री सुरु केली आहे. सर्वांना मास्कचे वाटप व्हावे, यासाठी व्यक्तीच्या जन्मवर्षानुसार आठवड्यातील पाच दिवसात दोन-दोन अंकांची विभागणी करुन एका व्यक्तीस आठवड्यास एकच मास्क घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे.

कोरीया चे परराष्ट्रमंत्री कांग क्यूंग व्हा यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World economic forum) बोलताना सांगितले, की सुरवातीच्या काळात टास्क फोर्स तयार करुन उपाययोजना करताना अध्यक्षांनी सर्व प्रांतांचे, महानगराचे प्रमुख व विविध मंत्रालयांची एकत्रीत टिम केली आणि त्यात उपाययोजना तयार करण्यात आली. एका प्रांतात उद्रेक झाला, तर कमी प्रादुर्भाव क्षेत्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा उपयोग करण्यात आला. सर्वांचा निर्णयप्रक्रिया राबविताना सहभाग घेण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे कोरीयाने हे सगळे टाळेबंदी न करता, केवळ सतर्कता व गतिमान निर्णप्रकियेद्वारे घडवून आणले. टाळेबंदी करणे हे कोणत्याच देशास हितकारक पाऊल नाही. पण जगातील इतर देशांनी योग्य वेळेस पावले न उचलल्याने चीनने तयार केलेल्या या टाळेबंदीच्या पध्दतीचा जगाने अपरिहार्यपणे अंगिकार केला. पण कोरीयाने आपला वेगळा मार्ग चोखाळला. याचा फायदा हा झाला, की संभाव्य मंदीतून आर्थव्यवस्थेस सावरण्यास धोरणे ठरवण्यामध्ये कोरीया ला उसंत मिळाली. आत्तापर्यंत निर्यातदार, लघुउद्योजक व भांडवल बाजार सावरण्यासाठी सरकारने ८० अब्ज अमेरिकी डॅालर्सच्या उपाययोजना आखल्या. तसेच ४ सदस्यांच्यापेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या १.५ कोटी घरांना प्रतीकुटुंब ६० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य घोषीत केले. ज्याचा लाभ ७० टक्के  म्हणजे ३.५ कोटी लोकांना पोहचेल. बहुतांश जनतेस यात सहभागी करुन घ्यावे, म्हणून या मदतनिधी बाबत कोरीयामध्ये वादविवादही होत आहेतच.

कोरोनाबाधीत रुग्णांचा प्रवास ईतिहास दर्शवणारी माहिती.

कोरोनाबाधीत रुग्णांचा प्रवास ईतिहास दर्शवणारी माहिती.

पण ही प्रक्रिया नेहमीच आश्वासक होती असे नव्हे. सुरवातीच्या काळात राष्ट्रपती मुन जे-इन यांनी चीनचे जास्त प्रभावित भाग वगळता इतर भागांतून येणारी विमानसेवा बंद केली नव्हती. फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यावर त्यांच्या विरुध्दचा रोष वाढला. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून १४ लाख लोकांनी सह्या करून एक याचिका तयार केली. मात्र त्याच वेळी राष्ट्रपती योग्य कामकाज करत आहेत, अशा आशयाची स्वाक्षरी मोहीमही तेवढ्याच लोकांनी चालविली. दक्षिण कोरीया वर या काळात ७० देशांनी प्रवासबंदी केली होती. आता मात्र जगातील ११७ देश मास्क व टेस्टींग कीट्सच्या बाबत कोरीया शी चर्चा करत आहेत.

एका लोकशाही सरकारने या महामारीच्या संकंटास योग्य पध्दत व उपाययोजनाद्वारे अटकाव करुन सर्व जग स्तब्ध असताना आपला लोकशाहीचा उत्सव थांबवू दिला नाही. त्यामुळेच नियोजीत वेळेनुसार १५ एप्रिलला दक्षिण कोरीयामध्ये सार्वत्रीक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये सोशल डीस्टन्सिग, मास्क आणि हातमोजे यांचा वापर करण्यात आला आणि मतदान सुरळीतपणे पार पडले. या निवडणुकीत लिबरल राष्ट्रपती मुन जे-इन यांच्या ‘डेमोक्रेटीक पार्टी ॲाफ कोरीया’ने नॅशनल असेंब्लीच्या ३०० पैकी १८० जागा जिंकल्या आहेत. एक प्रकारे कोरीयन जनतेने त्यांना त्यांच्या कामगिरीची पोचपावती दिल्यासारखेच झाले आहे.

विजय पाटील, हे दक्षिण कोरीयामध्ये मटेरीयल सायन्स या शाखेमध्ये पीएचडी करीत असून, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.

COMMENTS