कोरोनाचा इशारा

कोरोनाचा इशारा

सतत आजूबाजूला ऐकू येतंय.  लॉकडाउन वाढवा. काय मूर्ख लोक आहेत? कशाला रस्त्यावर येतायेत? भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या, मुंबई, पुणे, ठाणे. कानावर

लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी
वेश्या व्यवसायातील महिलांसाठी शासनाचा मदतीचा हात
चार भिंतीच्या आत दडलेला ‘विषाणू’

सतत आजूबाजूला ऐकू येतंय.  लॉकडाउन वाढवा. काय मूर्ख लोक आहेत? कशाला रस्त्यावर येतायेत? भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या, मुंबई, पुणे, ठाणे. कानावर दुसरं काही पडत नाहीये. सोशल मीडिया आणि ‘व्हाट्सअप’वर रोजची नवीन चॅलेंजस आणि वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो. तर दुसरीकडे दैनंदिन रोजगारावर काम करणाऱ्या आणि लॉकडाऊनमुळे उपासमारी ओढवलेल्या मजुरांचे फोटो.

वाटलं होतं कोरोना या दोन टोकाच्या जगांना एकत्र आणेल. किमान त्यातली दरी तरी कमी करेल, पण तसं मात्र झालेलं नाही. उलट कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी म्हणून जाहीर केलेल्या लॉकडाउनचे समाजात वेगवेगळे परिणाम बघायला मिळत आहेत.  एक वर्ग आहे ज्यासाठी लॉकडाऊन ही एक सुट्टी आहे. मग सामान्यतः सुट्टीमध्ये आपण जे करतो, तसे वेगवेगळे पदार्थ बनवणे, पत्ते, कॅरम खेळणे, सिनेमे बघणे इत्यादी गोष्टी करण्यात हा वर्ग गुंतला आहे. त्यातलाच एक वर्ग आहे. जो गावी गेला आहे. एरवी आज्या आणि मामाला शंभर वेळा कामाची वेगवेगळी कारणं देणारे आता अगदी आपुलकीने गावी गेले आहेत. गावची हवा, गावचा मेवा, गावची शांतता असं सगळं एन्जॉय करणं चालू आहे. अशाप्रकारे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी एक वर्ग असा आहे, जो आत्ता तरी लॉकडाउन साजरा करतोय. हा तोच वर्ग आहे ज्यांनी मागच्या रविवारी पणत्या लावून फटाके फोडून दिवाळी साजरी केली. दुसरीकडे या लॉकडाउनने आपल्याच समाजातील एका वर्गाचे अक्षरशः जगणेच बंद केले आहे आणि दुर्दैवाने आपल्या देशातील बहुसंख्य जवळजवळ ८० टक्के लोक या वर्गातील आहेत. यामध्ये मुद्दा हा असंवेदनशील असण्याचा आहे.

गेल्या काही दशकात ज्या माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाला आपले आयुष्य सुकर होईल असे वाटले होते, त्यानेच माणसाला आज गुलाम बनवले आहे. मिडिया तर प्रामुख्याने आपल्याला मूळ प्रश्नांपासून लांब नेण्याचीच भूमिका बजावताना दिसत आहे. साडी, फोटो अशा गोष्टींमध्ये माणसे अडकलेली आहेत. देशासमोर नव्हे, तर जगासमोर विविध प्रश्न आ वासून उभे असताना आमच्या वाहिन्या सेलिब्रिटी लॉकडाउनमध्ये कशी मजा करत वेळ घालवत आहेत, कसे जेवण बनवत आहेत, केस कापत आहेत, हे दाखवण्यात मश्गुल आहेत. मध्यम वर्गातून तर रस्त्यावर येणाऱ्या माणसांना कशाप्रकारे मारलं पाहिजे, कोणत्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांवर याचं खापर फोडायचं याचं ‘व्हाट्सअप’ ग्रुप्सवर जोरदार प्लांनिंग चालू आहे.

संपूर्ण देशातील सर्व व्यवहार एक महिना बंद राहणे, ही अपवादात्मक आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतात कोट्यवधी लोक गेल्या महिन्याभरात बेरोजगार झाले आहेत. आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात पण ह्याचे परिणाम इतके दूरगामी आणि गंभीर आहेत की आज विचार केला नाही तर आपण सगळे म्हणजे सर्व मानवी समाजच जात्यात भरडला जाणार आहोत यात शंका नाही.

महामारीला एक इतिहास आहे. इतिहासात बघितले तर आर्थिक मंदी आणि महामारी यामध्ये एक परस्परसंबंध असलेला आढळून येतो. कोरोनाला आज दुसऱ्या महायुध्दानंतरचे जगावरील सर्वात मोठे संकट म्हंटले जात आहे. उद्या कदाचित कोरोनावर लस येईलही, पण त्यामुळे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. जो पर्यंत आपण त्या मूलभूत प्रश्नांना भिडत नाही, तो पर्यंत ते वेगवेगळ्या स्वरूपात परत येत राहणार. त्यातून सुटका नाही.

काय आहेत हे प्रश्न? माणूस आणि निसर्ग यांचे नाते काय आणि कसे असावे? माणसमाणसांचे एकमेकांशी नाते कसे असावे? मानवी समाजांचा पाया काय? विकास म्हणजे नक्की काय? केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास का? भांडवली चंगळवादी विकासाच्या भस्मासुराला थोपवायचे कसे? तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःच्या फायदयासाठी निसर्गाचे आणि इतर प्राणिमात्रांचे अधिकाधिक शोषण करणे, ह्याला माणूस विकास समजत आला आहे. आज कोरोनाने आपल्या विकासाच्या या मॉडेलला चपराक मारली आहे. आपल्या विकासाचे मॉडेल हे भांडवली विकासाचे मॉडेल आहे. यामुळेच समाजातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागवणे आपल्या विकासात येत नाही. सर्वांना किमान आरोग्याच्या सुविधा, रोजगार ह्याला आपल्या विकासाच्या या मॉडेलमध्ये स्थान नाही. काही मूठभर श्रीमंत लोकांच्या तालावर माणसाला निसर्गाच्या आणि माणसाच्या विरोधात उभे करणारे, असे हे स्पर्धात्मक आणि आत्मघातकी भांडवली विकासाचे मॉडेल आहे. ज्यामध्ये भांडवलदारांचा अधिकाधिक फायदा कसा होईल, या एकमात्र गोष्टीला सर्वाधिक महत्व दिले जाते. परंतु, आज कोरोना मुळे आपली आयुष्यं किती वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांशी जोडली गेली आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

भारतात परदेश प्रवास करणाऱ्या (उच्च वर्गाकडून) आलेला हा रोग आज झोपडपट्टयांपर्यत पोहोचला आहे. त्यामुळे आज जर आपल्याला वाटत असेल की आपण घरात आहोत म्हणजे सुरक्षित आहोत, तर ही सुरक्षा औट घटकेची आहे. पंधरा-वीस दिवस लॉकडाऊन सेलिब्रेट करणारा वर्ग किती काळ घरकाम करणाऱ्या बायका, कचरावेचक कामगार, सफाई कर्मचारी यांच्याशिवाय जगू शकतो? किती काळ तो वास्तवाकडे कानाडोळा करू शकतो? या रस्त्यावर येणाऱ्या कामगारांना अक्कल नाही का? असे घरात टीव्हीवर न्यूज बघत रोगाच्या प्रसाराला ‘या’ कामगार वर्गाला जबाबदार ठरवून मोकळ्या होणाऱ्या किती लोकांना लॉकडाऊनमध्ये होणाऱ्या कामगारांच्या उपासमारीची जाणीव आहे? अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या नर्सेसच्या समस्यांची जाणीव आहे?  आज लॉकडाऊन मुळे जर भारतातील ८० टक्के जनतेवर उपासमारीची वेळ येत असेल, तर त्याला आपल्या समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमताच कारणीभूत आहे, हे किती जणांच्या लक्षात येते? सोयीस्कररीत्या या विषमतेकडे डोळेझाक करून आणि नुसते अन्नवाटप करून हे प्रश्न सुटणार नाहीत (अन्नवाटप करणाऱ्या सर्वांबद्दल आदर आहे परंतु मुद्दा हा कि तो कायमचा उपाय असू शकत नाही).

आपल्याकडे आर्थिक साधने आहेत म्हणजे आपण फार स्वयंभू आहोत, असे कोणत्याच वर्गाने समजू नये. आज गरीब, कामगार, शेतकरी वर्गाच्या जीवावर हा वरचा सगळा डोलारा उभा आहे. आणि म्हणूनच समाजातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागवणे, हे कोणत्याही समाजाच्या विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी आवश्यक आहे. कोरोना हा एक विषाणू आहे. त्याला जात, वर्ग कळत नाही आणि म्हणूनच तो ब्रिटनसारख्या देशाच्या पंतप्रधानाला ही होतो आणि धारावी मधल्या गरिबालाही होतो. चांगल्या सार्वजनिक आरोग्याच्या सोयीची गरज आणि महत्व या महामारीने अधोरेखित केले आहे. पण आपल्या विकासाच्या मॉडेलमध्ये सर्वांच्या मूलभूत गरजांचा समावेश नाही तर बुलेट ट्रेनचा समावेश आहे.

उलरिच बेक नावाचे समाजशास्त्रज्ञ आधुनिक समाजांचे वर्णन रिस्क सोसायटी असे करतात. यात ते म्हणतात पुढील काळात मानवी समाजात येणाऱ्या आपत्ती या नैसर्गिक नसून मानवनिर्मितच असणार आहेत. ‘कोरोना’सारख्या आपत्तीची मानव म्हणून आपण जबाबदारी घेणार, की त्यात पण आपण मानवनिर्मित एखादी जात, धर्म, देश शोधून त्यावर या सगळ्याचं खापर फोडणार यावर सगळे अवलंबून आहे. एखाद्या घटनेची सामूहिक जबाबदारी घेणे नेहमीच अवघड असते. कारण अशा जबाबदारीत मूलभूत प्रश्नांना भिडणे अनिवार्य असते.

कोरोना फक्त माणूस बघतो आणि म्ह्णूनच माणसाला त्या विषाणूचे इतके भय वाटत आहे. हा विषाणू जर विशिष्ट वर्ग, जात, धर्म मानत असता, तर माणसाचे काम सोपे झाले असते. परंतु यातूनच आपल्याला मानवनिर्मित विषमता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव होण्याची एक शेवटची संधी आहे. मात्र अजूनही देशातील नेतृत्व भावनिक आव्हाने करणे आणि जनता कोरोनाबाधितांचा धर्म शोधणे, ताट-वाट्यांचा गजर करणे यापलीकडे जाताना दिसत नाही.

मधुरा जोशी, सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0