लग्नाच्या सोहळ्याला कोरोनाची झळ

लग्नाच्या सोहळ्याला कोरोनाची झळ

कोविड-१९ या व्हायरसने सध्या भारतीय लग्न समारंभाच्या एकेकाळच्या वैभवी इंडस्ट्रीवर अगदी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. तिची सगळी चमकदमक, तिचा दिमाख आणि “आवाज” अगदी थंड केला आहे.

‘कणखर पंतप्रधान पुरेसा नाही’
लॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना
विंबल्डनविना जुलै महिना

कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचाव व्हावा म्हणून लॉकडाऊन जगभरातील अनेक देशांत करण्यात आले. त्याचे दूरगामी परिणाम जागतिक आणि देशातील अर्थव्यवस्था, व्यापार उदीम, मानवी व्यवहार आणि नातेसंबंधांवर झाले आहेत आणि होतात आहेत. यातील काही बदल मूलगामी आहेत, अनेक चांगले तर काही वाईटही आहेत. तसेच काही बदल तात्पुरते आहेत. जे परिस्थिती पालटली की पूर्ववत होतील.

सध्या तरी भारतीय लग्न समारंभ आणि इतर सण, कार्य, सोहळे हे पूर्णत: बदलले आहेत. याचे कारण २० पेक्षा अधिक जणांना एकत्र जमायची बंदी आहे. तसेच, संसर्गाची धास्ती सगळ्यांना आहे. त्यामुळे अगदी जवळचे नातेवाईक आणि स्नेही यांच्यासमवेत हे सोहळे पार पडतात आहेत. अनेक जण अगदी घरातल्या घरात कार्य पार पाडत आहेत. तर काही झूम किंवा फेसबुक लाईव्ह यांच्या लिंक्स इष्ट मित्र, स्नेही आणि नातेवाईकांना पाठवतात आहेत जेणे करून दुरून आणि व्हर्चुअली (Virtually) का होईना त्यांना सहभागी होता येईल आणि आयोजकांचा आनंद द्विगुणित होईल.

एरवी भारतीय लग्ने म्हणजे एकंदरीत जंगी कार्यक्रम आणि भरगच्च सोहळा. पूर्वी मध्यमवर्गीय लग्ने तशी साधेपणाने होत. पुढे आर्थिक उदारीकरण झाले, लोकांकडे पैसा खुळखुळू लागला. अनेक घरातील मुले-मुली परदेशात लठ्ठ पगारावर काम करणार. इकडे भारतातही आयटीचा फुगा होता. त्यामुळे लग्न समारंभ अतिशय दिमाखदार पद्धतीने होऊ लागले. त्यामुळे अशा लग्नांचे “Big Fat Indian Wedding” असे नामकरणही झालेले दिसले.

भरीतभर म्हणजे बॉलिवूडमधील अनेक यशस्वी चित्रपट हे मोठ्या थाटामाटाची लग्ने दाखवू लागले. पुढे त्यातील फक्त उत्तर भारतात असलेले सोहळे म्हणजे संगीत वगैरे मराठी लग्नात म्हणजे अगदी पत्रिकेत देखील मिरवू लागले. जी तरुण लग्नाळू मुले-मुली हॉलिवूडमधील चित्रपट किंवा मालिका बघतात, ते सगळे आता बॅचलर पार्टी सुद्धा साजरी करू लागले आहेत. पूर्वी अतिश्रीमंत आणि पंजाबी लग्नात असणारी कॉकटेल पार्टी आता मराठी लग्नातही दिसू लागली. डीजे आणणे आणि लग्नाच्या दिवशी किंवा रिसेप्शननंतर जोरदार नाच-गाणे-बजावणे हाही कार्यक्रम ठळकपणे होऊ लागला. साहजिकच लहान गावातील किंवा खेड्यातील लग्नात देखील डीजे, नाचगाणी वगैरे दिसू लागली.

लग्न आयुष्यात एकदाच होते त्यामुळे आई-वडील तसेच मुले-मुली यांना लग्न हे शक्य तितके मोठे, थाटामाटाचेच व्हायला हवे अशी वृत्ती बळावली. त्यामुळे हौसमौज करण्याकडे प्रचंड कल वाढला. त्यामुळे भारतीय लग्न समारंभ ही चक्क एक वेगळी इंडस्ट्री मानली जाऊ लागली.

गेल्या दोन -तीन दशकात हळूहळू प्रस्थापित झालेली ही इंडस्ट्री इतकी प्रचंड वाढली आहे की त्यातील होणारी उलाढाल ही ४० ते ५० अब्ज डॉलर्स इतकी आहे. एका वर्षात आपल्या देशात साधारण १ कोटीच्या आसपास लग्ने होतात. त्यासाठी लॉंन्स, हॉल्स, मंगल कार्यालये, तारांकित किंवा बिनतारांकित हॉटेल्स, केटरिंग, मांडववाले, सजावट करणारे, हार, फुलांच्या माळा व सजावटी करणारे; फटाके पुरवणारे, बॅंडवाले, सनई चौघडा वाजवणारे, पौरोहित्य करणारे, ब्युटी पार्लर्स किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या सेवा देणारे, मेंदी, इवेंट मॅनेजमेंटवाले, अगदी नृत्य शिकवणारे किंवा नृत्य दिग्दर्शक अशा सगळ्यांच्या सेवा लागतात.

लग्नासाठी आणखीन दोनतीन मोठ्या इंडस्ट्रीची जोड लागते ती म्हणजे कपडे, वस्त्रे, प्रावरणे आणि दागदागिने. कपडे म्हणजे लग्नाचा बस्ता ज्यात साड्या, पुरूषांचे कपडे तसेच फॅशननुसार अनेक प्रकारचे जुन्या-नव्या पद्धतीचे पोशाख आणि परिधाने येतात. दागदागिन्यातील वैविध्य तर विचारू नका इतके आहे. तिसरी संलग्न इंडस्ट्री म्हणजे प्रवासी सेवा आणि पर्यटन – ट्रॅवल आणि टूरिझम!

गेल्या एक दोन वर्षांपर्यंत ही इंडस्ट्री मंदीपासून पूर्ण सुरक्षित अशी मानली जात असे. मात्र देशभरात दिसू लागलेल्या आर्थिक चणचणीचा, वाढत्या बेरोजगारीचा आणि नोकर कपातीचा परिणाम या इंडस्ट्रीवर दिसू लागला होता. त्यामुळे मंदी जिला कधी शिवू शकत नाही असे ज्या इंडस्ट्रीविषयी बोलले जात होते ती देखील मंदीसदृश स्थितीची बळी होऊ लागली होती. त्यातच कोविड-१९ या व्हायरसने सध्या भारतीय लग्न समारंभाच्या एकेकाळच्या वैभवी इंडस्ट्रीवर अगदी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. तिची सगळी चमकदमक, तिचा दिमाख आणि “आवाज” अगदी थंड केला आहे.

लग्न समारंभ या इंडस्ट्रीतील वर उल्लेखलेले सगळे व्यावसायिक आणि सेवा देणारे आता आर्थिक संकटाचा सामना करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नाभिकांनी जसे आंदोलन केले. तसे आंदोलन करण्याची वेळ यातील अनेकांवर येणार अशी लक्षणे आहेत.

सोनारांची दुकाने आता सुरू झाली आहेत. तसेच कापड उद्योग आणि विक्रीही सुरू झाली आहे. प्रवास आणि पर्यटन या क्षेत्रातील मंदी काही काळ तशीच राहणार दुर्दैवाने.

कोरोंनाच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे दुर्दैवाने आर्थिक दाणादाण उडाली या इंडस्ट्री आणि त्यातील सेवा पुरवणार्‍यांची. सामाजिकदृष्ट्या बघितले तर फारच रंजक चित्र दिसू लागले आहे.

लहान गावात किंवा खेड्यात गेल्या दोन महिन्यात हजारो लग्ने झाली. ही सगळी लग्ने अतिशय साधेपणाने झाली. मुलगा आणि मुलगी यांच्याकडील मंडळींना अतिशय कमी किंवा अगदी माफक पैशात लग्ने करता आली. त्यामुळे खेड्यापाड्यात अतिशय समाधान आणि आनंद व्यक्त केला जातो आहे. श्रमिकांतील अनेक जण आता सांगतात की कोरोंनामुळे लग्न खर्च खूपच वाचतो आहे आणि त्यांचा फार आनंद या मंडळींना आहे. यात अधोरेखित करण्याचा मुद्दा हा आहे की, पुढेही लग्ने अशीच अगदी माफक खर्चात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व्हावीत असे अनेकांना वाटू लागले आहे. गावागावातून असा सूर उमटत असेल तर ही क्रांतीच म्हणायला हवी. अर्थात विचार आणि कृतीतील हा बदल कोरोंनामुळे आलेल्या लॉकडाऊन आणि जमावबंदीमुळे आहे. हा कायम स्वरूपी असेलच असे नाही. मात्र या निमित्ताने अगदी साधे, अगदीच  बिनखर्ची म्हणता येईल असे लग्न खेड्यापाड्यात, लहान गावातील अनेकांनी अनुभवले आहे. त्यातील आर्थिक भाग हा मोठा आहेच. त्याच बरोबर फार फाफटपसारा नसणे, विधी वगैरेंचे फारसे अवडंबर नसणे याही गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. हा लक्षणीय बदल श्रमिक किंवा कष्टकरी वर्गात दिसून आला.

मध्यम आणि उच्चमध्यमवर्गात देखील शेकडो लग्ने अगदी साध्या पद्धतीने घरी झाली. मात्र या वर्गात अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लग्नात पाचपेक्षा कमी माणसे होती. काहींनी घरच्या घरी लग्न केले आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपण झूम किंवा फेसबुकवरून केले.

या वर्गात मात्र साधेपणाने लग्न करणे हेच योग्य असा सूर फारसा उमटताना दिसत नाही आहे. यातील अनेक जोडपी म्हणतात की परिस्थिती बदलली की आम्ही थाटामाटात रिसेप्शन करणार आहोत. फार मोजकी जोडपी मात्र म्हणाली की, लॉकडाऊनमुळे अगदी साधेपणाने लग्न केले ते फार छान झाले. एरवी लग्नात होणारी धावपळ, नातेवाईक यांची सरबराई, रूसवे फुगवे आणि मानापमान वगैरे गोष्टी घडल्याच नाहीत. यामुळे लग्न हे शांतपणे, कुठलाही गोंधळ किंवा गडबड किंवा समज गैरसमज न होताही पार पडू शकते यावर अनेकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते सुटसुटीत अशा लग्नामुळे एक वेगळीच जवळीक आणि भावनिक बंध झाले जे वाजतगाजत, गजबटात होणार्‍या लग्नात तयार व्हायला बराच अवधी लागतो.

लग्नसोहळे आणि इतर मंगलकार्ये, समारंभ यांच्यावरील कोरोंनामुळे झालेला आर्थिक आणि सामाजिक परिणाम किती काळ टिकेल हे सांगता येऊ शकत नाही. मात्र त्यानिमित्ताने झालेले अनेक सामाजिक बदल हे टिकतील असे वाटते आहे. याचे कारण या लॉकडाऊन कोरोंनामुळे जशी आर्थिक कोंडी आणि मंदी आली आहे. तसेच सामाजिकदृष्ट्या घुसळण होऊ लागलेली दिसते आहे.

या काळात सगळयांना विचार करायला वेळ मिळाला आहे. आपण आजवर काय केले, कशासाठी केले किंवा इतकी पळापळ आपण का केली याचा धांडोळा बहुतेकांनी घेतला. चुकांची खंत वाटू लागली. आयुष्याची नश्वरता कळून आली. अनेकांना आपली खरी आवड कळली, काहींनी जुने छंद जोपासायला सुरुवात केली. अनेकांना कुटुंबियांसाठी भरपूर वेळ देता आला आणि त्यातील गंमत, हसतखेळत एकत्र घालवलेला वेळ याचा आनंद यात समाधान आहे. त्यात भांड्याला भांडं लागत वाद, भांडणे झाली. मात्र त्यांची परिणिती एकमेकांना समजून घेण्यात झाली. भावनिकदृष्ट्या अनेक जण पुन्हा जवळ आले. अनेक घरात मात्र पराकोटीचे वाद आणि कुठे मारझोडही दिसून आली.

या काळात आणखीन महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे बहुतेकांचे पगार २०, ३०, ४० किंवा ५० टक्क्यांनी कमी झाले. त्याचा ताण आलाच. मात्र खर्च आटोक्यात आला. कारण घरीच जेवणे आणि सगळे वायफळ खर्च बंद झाले.

कोरोंनाने जगभरात अनेक ठिकाणी मृत्यूचे तांडव दिसले तसेच बरे होऊन घरी परतणार्‍याची संख्याही लक्षणीय दिसून आली.

एकंदरीत कोरोंना हा शाप म्हणायचा की नैसर्गिक आपत्ती की अनेक चांगले सामाजिक, कौटुंबिक आणि निसर्गातील बदल अगदी बेमालूमपणे घडवून आणणारा एक निर्जीव मात्र क्रांतिकारी समाज प्रबोधक म्हणायचे हे ठरवायला अजून बराच अवधी जावा लागेल.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रतिनिधीक स्वरूपाचे)

गायत्री चंदावरकर, या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0