लखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून उ. प्रदेशात बरेली येथे पोहचलेल्या मजूरांना रस्त्यावर बसवून त्यांच्या अंगावर सॅनिटायझरने फवारणी करणारा एक
लखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून उ. प्रदेशात बरेली येथे पोहचलेल्या मजूरांना रस्त्यावर बसवून त्यांच्या अंगावर सॅनिटायझरने फवारणी करणारा एक व्हीडिओ व्हायरल झाल्याने आदित्य नाथ सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. रस्त्यावर बसलेल्यांमध्ये लहान मुले, महिलाही आहेत पण त्याची पर्वा न करता फायर ब्रिगेडमधील काही कर्मचारी आग विझवणार्या पाईपमधून मजूरांवर सॅनिटायझरची फवारणी करताना दिसत होते. आदित्य नाथ यांच्या सरकारचे कृत्य मानवतेला कलंक तर आहेच पण सामान्य माणसाच्या प्रतिष्ठेला सरकारकडून किंमत दिली जात नसल्याचे या व्हीडिओतून दिसून येते.
देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दरमजल करत हे सर्व मजूर दिल्ली, हरियाणा, नोएडा येथून आपल्या घराकडे परत आले होते. त्यांनी बरेली जिल्ह्यात प्रवेश करताच प्रशासनाच्या अधिकार्यांनी सर्व मजूरांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर क्लोरिन व पाण्याने बनवलेल्या सॅनिटायझरची मोठ्या पाईपद्वारे फवारणी केली. असे केल्याने कोरोनाचे विषाणू नाहीसे होतात, असा दावा काही कर्मचारी करत होते. पण मजूरांच्या जथ्यात बसलेल्या मुलांच्या डोळ्यात पाणी गेल्याने त्यांच्या डोळ्याची जळजळ झाली व डोळे लाल झाल्याचे दिसून आले. पण त्यांना इस्पितळात नेण्यात आले नाही. या फवारणीत अन्य कोणतेही रासायनिक द्रव्य नव्हते असे बरेलीतील कोविड-१९चे नोडल अधिकारी अशोक गौतम यांनी दावा केला आहे. मजूरांवर पाणी मारण्याअगोदर त्यांना डोळे बंद करायला सांगितले होते असेही गौतम म्हणाले.
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी नीतीश कुमार यांनी दोषींच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ आम्ही पाहिला व त्यासंदर्भात चौकशीही करण्यात आली. कोरोना संसर्ग रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बरेली नगरपालिका व फायर ब्रिगेडच्या टीमवर बाहेरून येणार्या बसेसचे सॅनिटायझेशन करण्याचे निर्देश दिले होते पण या टीमने अधिक सक्रीयता दाखवण्याच्या भरात असे कृत्य केल्याचे ट्विट नीतीश कुमार यांनी केले आहे.
हा प्रकार म्हणजे मानवतेला कलंक
बरेलीतील घटना उघडकीस आल्यानंतर आदित्य नाथ सरकारवर विरोधकांकडून कठोर शब्दांत टीका केली जात आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ही घटनाच अमानवीय असून अगोदर दुःख व समस्यांचा सामना करत असणार्या कष्टकर्यांवर भाजप सरकारने रसायनचे फवारे मारू नये, याने त्यांची प्रकृती बिघडेल, असे अमानवीय कृत्य अशा कठीण समयी करू नये, असे म्हटले आहे.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मजूरांवर केलेल्या फवारणीचा निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने अशी फवारणी करण्याचे निर्देश दिलेत का, या रसायनांमुळे होणार्या जळजळीवर काय इलाज आहेत, भिजलेले कपडे बदलण्याची व्यवस्था सरकारने केली आहे, मजूरांचे सामान भिजले असेल त्याची भरपाई प्रशासन देणार आहे का, असे सवाल अखिलेश यादव यांनी केले आहे.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनीही झालेला प्रकार क्रूर व अमानवीय असून त्याचा निषेध कराल तेवढा कमी असल्याची टीका केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS