१० मजूर – ८०० किमी अंतर -६० तास प्रवास

१० मजूर – ८०० किमी अंतर -६० तास प्रवास

हरियाणातील वल्लभगडहून निघालेले १० मजूर ६० तासानंतर प्रचंड संघर्षानंतर उ. प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बघौचघाट येथे आपल्या घरी रविवारी सकाळी सुखरूप प

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
लॉकडाऊन : केंद्राचे पॅकेज आणि तृतीयपंथी समुदाय
‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीत दाखल

हरियाणातील वल्लभगडहून निघालेले १० मजूर ६० तासानंतर प्रचंड संघर्षानंतर उ. प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बघौचघाट येथे आपल्या घरी रविवारी सकाळी सुखरूप पोहचले.

सुमारे ८०० किमीच्या या प्रवासात हे मजूर कधी पायी, तर कधी ऑटोने, तर कधी पाण्याचे टँकर व ट्रकचा आधार घेत घरी परतले. या प्रवासादरम्यान या मजुरांनी सुमारे १०० किमीचे अंतर पायी कापले. प्रवासात अनेकदा त्यांना खायला अन्न मिळाले नाही पण घरी परतण्याची तीव्र इच्छा, आप्तांची ओढ यातून त्यांनी हा प्रवास केला, या प्रवासात त्यांचे घामाचे पैसे- प्रत्येकी १२०० रुपयेही खर्च झाले.

सुमारे ८०० किमीच्या प्रवासात प्रशासनाची दादागिरी तर कधी सहृदयता, पोलिसांचा जाच व प्रेम त्यांच्या अनुभवास आला. ही कहाणी केवळ १० मजुरांची नाही तर देशातील लाखो मजूरांची आहे, जे पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन पुकारल्यानंतर आपल्या घराकडे केव्हा पोहचतोय या बैचेनीत आहेत. या लोकांकडे जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. आपले जीवापाड कुटुंब, मुले, बायको यांच्या ओढीमुळे ते जीवाची पर्वा न करता आपल्या घरी परतत आहेत.

सोमवारी या मजुरांशी फोनवर संपर्क झाला तेव्हा प्रत्येकाने आपण घरी जिवंत व सुखरूप पोहचल्याचे सांगितले. प्रवासाचे ते ६० तास म्हणजे एक भयानक स्वप्न होते, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

आशुतोष यादव, संतोष राजभर, शैलेश राजभर, मनोज राजभर, अर्जुन राजभर, अर्जुन गौंड, जैनुद्दीन अन्सारी, बिट्टू प्रसाद व अन्य दोघे होळी आटोपल्यानंतर हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगडनजीक सिकडी गावांत एका बांधकाम वर्कशॉपमध्ये कामाला गेले होते. या वर्कशॉपमध्ये बिल्डिंगला लागणार्या कॉलमचे काम त्यांच्याकडे होते. या वर्कशॉपमध्ये त्यांनी पूर्वीही काम केले होते. गावात एका घरात भाड्याने राहणारे हे १० जण एकत्र स्वयंपाक करून जेवत होते.

मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर वर्कशॉपच्या ठेकेदाराने त्यांच्या हाती प्रत्येकी एक हजार रुपये टेकवले व स्वतःही तो बेपत्ता झाला. त्यामुळे या १० जणांकडे घरी परतवण्यापलीकडे पर्याय नव्हता. या मजुरांबरोबर बिहारमधील मोतीहार जिल्ह्यातील एक मजूर उज्ज्वल दुबेही होते. सर्वांनी मिळून घरी जाण्याचा निर्णय घेतला.

गेल्या आठवड्यात गुरुवारी दुपारी चार वाजता ते घरातून निघाले, त्यावेळी त्यांना एकही वाहन मिळाले नाही. मग पायी चालत त्यांचा प्रवास सुरू झाला. २४ किमी चालल्यानंतर पलवल या गावानजीक त्यांना एक बस मिळाली. या बसमधून ते मथुराच्या अलीकडे तीन किमी अंतरावर उतरणार होते पण बस चालकाने त्यांना त्या अगोदर कोसिकला येथे मध्येच उतरवले. ती रात्र या मजुरांनी एका भाजी मंडईत काढली. या मंडईत दिल्ली, हरयाणा व अन्य राज्यातून आलेले व आपल्या गावाकडे जाणारे सुमारे हजाराहून अधिक मजूर, कष्टकरी होते.

शुक्रवारी सकाळी सर्व मजूर बसची वाट पाहात होते. झाशीकडे जाणार्या तीन सरकारी बस आल्या त्यातून काही जण गेले पण या बस नंतर पुन्हा परत आल्या. सरकारने मोफत प्रवास होईल असे सांगितले होते पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे घेण्यात येत होते. बसचालक व वाहकाने आमच्यापर्यत मोफत प्रवासाचे काही आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे बसमध्ये वाद होऊन या बस परत आल्या.

१० वाजता देवरियाला राहणारे काही मजूर कानपूरला जाणार्या बसमध्ये बसले. या बसमध्ये मधल्या ठिकाणी उतरणारे काही मजूर बसले होते. बसमध्ये बसल्यावर वाहकाने कानपूरला जाण्यासाठी ६०० रुपये लागतील असे सांगितले. काहींनी पर्याय नाही म्हणून पैसे देण्याची तयारी दाखवली. पण बस दुपारी अडीचपर्यंत बस स्थानकातच राहिली. नंतर बस कानपूरला जाणार नाही असे सांगण्यात आले. बसमधून सर्व मजूरांना जबरदस्तीने उतरवण्यात आले त्याचबरोबर त्यांनी बाहेर पडू नये म्हणून मंडई परिसराचे गेटही बंद करण्यात आले.

आशुतोष यादव व त्याचे काही सहकारी काही तास तिथे थांबले पण नंतर त्यांनी तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. त्यांना रस्त्यावर एक ऑटो मिळाली त्यातून ते मथुरापर्यंत पोहचले. मथुरा पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती.

मथुरात पोहचल्यानंतर एका हवालदाराने त्यांच्यावर दया दाखवत त्यांना आग्र्याकडे जाणार्या एका ट्रकमध्ये बसवले. मथुर्यात हजारो मजूर आपल्या गावाकडे जाण्यासाठी जमा झाले होते, त्यांना एकही वाहन मिळत नव्हते.

ट्रकमधून प्रवास करत हे ११ मजूर रात्री १०.३०च्या सुमारास आग्रात पोहोचले. तेथे एका पाण्याच्या टँकर त्यांना मिळाला. त्यातून प्रवास करत ते शनिवारी पहाटे ३.३० कानपूरमध्ये पोहचले.

कानपुरात पोहचल्यावर तेथेही हजारो मजूर वाहनांच्या प्रतिक्षेत होते. अनेक मजूर पायी चालत गावाकडे जात होते. या ११ जणांनी ३५ किमी चालत नापी व उन्नाव दरम्यान दही गाव गाठले. त्यावेळी सकाळचे १०.३० वाजले होते. तेथे काही काळ आराम केल्यानंतर हे सर्व दुपारी १२ वाजता पुन्हा चालत निघाले. सुमारे १५ किमी अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक ट्रक मिळाला. या ट्रकने ते लखनौ बायपासजवळ उतरले. तेथून पायी चालते हे सर्वजण दुपारी १२च्या सुमारास चारबाग स्टेशनमध्ये पोहचले. तेथे त्यांचे स्क्रिनिंग झाले. प्रशासनाच्या तयारीचा पहिला अनुभव त्यांना मिळाला, त्यांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. तेथे त्यांना गोरखपूरला जाणार्या बसमध्ये बसवण्यात आले. ही बस रात्री १० वाजता गोरखपूरला पोहचली. या बसमध्ये त्यांना प्रत्येकी ३७० रु. मोजावे लागले.

गोरखपूरमध्ये उतरल्यावर त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. एक तासाने त्यांना देवरियाकडे जाणारी बस मिळाली. तेथे उज्ज्वल दुबे व त्याचे काही सहकारी उतरले कारण त्यांना बिहारमध्ये मोतिहारी जिल्ह्यात जायचे होते.

देवरियाकडे निघालेली बस चौरीचौरा येथे थांबली. एक तास झाला तरी ती पुढे जात नव्हती. बसमधल्या प्रवाशांना त्याची माहिती दिली जात नव्हती. अखेर बस निघाली. पहाटे अडीच वाजता देवरियाला बस पोहचली. देवरियात सर्व प्रवाशांची नावे व पत्ते लिहून घेण्यात आले.

हा प्रवास येथे संपला नाही. १० जणांना आपले गाव बघौचघाट गाठायचे होते. पण तेथे जाण्यास एकही वाहन नव्हते. तेव्हा त्यांना एका चौकात बघौचघाटमध्ये राहणारा एक पोलिस शिपाई दिसला. या मजुरांनी आपली सर्व दर्दभरी कहाणी त्याला सांगितली. या पोलिसाने त्यांच्यासाठी एका ऑटोची सोय केली. त्यांना पथरदेवा नावाच्या एका गावाजवळ सोडण्यात आले. तेथून ८ किमी चालत रविवारी सकाळी ७ वाजता हे सर्व १० मजूर आपल्या घरी पोहचले.

या प्रवासात फक्त आशुतोष व जैनुद्दीन अन्सारीकडे मोबाइल होता. पण मथुरा येथे पोहचताच दोघांच्या मोबाइलमधील बॅटरी संपली. त्यामुळे या सर्वांचा घराशी संपर्क तुटला होता. जेव्हा रविवारी सकाळी हे आपल्या घरी परतले तेव्हा घरातल्यांच्या जीवात जीव आला.

प्रत्येकाचे पाय जबर सुजले होते. असा पायी प्रवास या अगोदर एकानेही केला नव्हता. गावात हे मजूर आल्याचे कळाल्यानंतर सरपंचाने त्यांची चौकशी केली.

या सर्वांचे बरेचसे सामान वल्लभपूरमध्ये आहे. जेव्हा परिस्थिती निवळेल तेव्हा परत तेथे जाईन असे हे सर्वजण म्हणत आहेत.

लेखक गोरखपूर न्यूजलाइन वेबसाइटचे संपादक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0