नवी दिल्लीः कॉर्पोरेट कंपन्या व दानशूर व्यक्ती यांच्याकडून भाजपला अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ७५० कोटी रु.हून अधिक देणग्या २०१९-२० या आर्थिक वर्षांत मिळाल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या तुलनेत भाजपला पाचपट अधिक देणग्या मिळाल्या असून काँग्रेसला २०१९-२० या वर्षांत १३९ कोटी रु. देणगी स्वरुपात मिळाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी रु. तृणमूल काँग्रेसला ८ कोटी रु., माकपाला १९.६ टक्के व भाकपाला १.९ कोटी रु. देणगी स्वरुपात मिळाले आहेत.
कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर कॅपिटलने १५ कोटी रु. आयटीसी ग्रुपने ७६ कोटी रु, रियल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने (पूर्वीची लोढा डेव्हलपर्स) २१ कोटी रु., बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉनॉजीने ३५ कोटी रु., प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टने २१७.७५ कोटी रु. व जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टने ४५.९५ कोटी रु.च्या देणग्या भाजपला दिल्या आहेत.
प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टमध्ये भारती एंटरप्राइज, जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्स, डीएलएफ लिमिटेड या कंपन्या देणग्या देतात. तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपच्या कंपन्या देणग्या देतात.
२०१९मध्ये भाजपला बांधकाम उद्योजक सुधाकर शेट्टी यांच्या गुलमर्ग रियल्टर्सकडून तब्बल २० कोटी रु. देणगी मिळाली होती. त्यानंतर जानेवारी २०२०मध्ये शेट्टी यांच्या घरावर व कार्यालयांवर ईडीने छापे टाकले.
शैक्षणिक संस्थांकडूनही भाजपला देणग्या
भाजपला देशातल्या १४ शिक्षण संस्थांनीही देणग्या दिल्या आहेत. त्यात मेवाड विद्यापीठ, दिल्ली (२ कोटी रु.), कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग (१० लाख रु.), जीडी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, सूरत (२.५ लाख रु.), पठानिया पब्लिक स्कूल, रोहतक (२.५ लाख रु,), लिटिल हार्टस कॉन्व्हेंट स्कूल, भिवानी (२१ हजार रु.), एलन करियर, कोटा (२५ लाख रु.) यांचा समावेश आहे.
भाजपचे दाते
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ५ लाख रु., भाजप राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर २ कोटी रु., अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू १.१ कोटी रु., किरण खेर ६.८ लाख रु., मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष टीव्ही मोहनदास पै १५ लाख रु. यांनी भाजपला देणग्या दिल्या आहेत.
राजकीय पक्षांना देणग्या मिळाव्यात म्हणून भाजपने इलेक्टोरल बाँड योजना आणली. त्याचा आजपर्यत सर्वाधिक फायदा या पक्षाने उठवला आहे.
मूळ बातमी
COMMENTS