भानू अथैय्या

भानू अथैय्या

जगप्रसिद्ध वेशभूषाकार व भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथय्या यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वावर ‘चेहरे’ या आपल्या पुस्तकात दिवंगत प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी लेख लिहिला होता. ‘जीवनगाणी’ प्रकाशित पुस्तकातील भानू अथय्या यांच्यावरचा हा प्रस्तुत लेख...

सत्यजित रेंना जागतिक सिनेमासाठीच्या त्यांच्या योगदानासाठी ऑनररी ‘ऑस्कर’ देण्यात आलं होतं. पण खरंखुरं ‘पहिलं ऑस्कर’ मिळालेली एक व्यक्ती आपल्यात आहे. आणि त्या आहेत आपल्या महाराष्ट्रीय महिला, भानू अथैय्या.

‘ऑस्कर’ घेताना त्यांनी केलेलं छोटंस भाषण तुम्हाला आठवतेय? त्या म्हणाल्या होत्या, ‘मी अकॅडमीचे आभार मानते आणि भारताकडे सगळ्यांचं लक्ष वेधल्याबद्दल मी रिचर्ड अटेनबरोंचे आभार मानते.’ एवढंच बोलून आकाशी निळ्या रंगाची साडी नेसलेली ही बाई स्टेजवरून खाली उतरली होती. आजही झर्क्सेस भाथेना, नीता लुल्ला, अना सिंग, मनीष मल्होत्रा ही मंडळी अभिमानाने आणि आवर्जून सांगतात, ‘भारताला जे पहिलं ‘ऑस्कर’ मिळालं, ते आमच्या विभागाकडून आलेलं आहे. कोणाही अभिनेत्याने, दिग्दर्शकाने किंवा निर्मात्याने ते मिळवलेलं नाही.’

खरंच, त्या वर्षी अतिशय तगडी स्पर्धा असतानाही ‘गांधी’ चित्रपटासाठी भानूताईंनी केलेल्या, अत्यंत खर्या वाटणार्या वेशभूषेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. आज इतिहास बदलला, तरी एक गोष्ट मात्र नक्की ही शांत, हळुवार बाई बदललेली नाही. आणि योगायोग पाहा ‘गांधी’ आणि ‘ऑस्कर’साठी नामांकन मिळालेल्या ‘लगान’मध्ये एक समान धागा आहे, तो आहे भानू अथैय्या हा!

मी भानूताईंना गेली कित्येक वर्षे ओळखतोय. काही काही वेळा एखाद्या सिनेमाच्या सेटवर आमची गाठ पडलेली आहे. आम्ही एकत्र काम केलंय. आणि छोट्या छोट्या गोष्टींची माहिती करून घेणं, रंगांवर लक्ष देणं, वेशभूषा खरी वाटावी यासाठी प्रयत्नशील असणं, कला आणि जबाबदारीची जाण असणं, या त्यांच्या गुणांचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

‘‘गांधी’ म्हणजे माझ्यासाठी एक मोठी परीक्षा होती’, भानूताई म्हणाल्या. ‘मी रिचर्ड अटेनबरोंना जुलै महिन्याच्या मध्यावर भेटले. भारतीय डिझायनर असावी असं त्यांना आवर्जून वाटत होतं. जेमतेम १५ मिनिटं आमची चर्चा झाली आणि त्यांनी मला हे काम दिलं, एक सप्टेंबरला युनिटमध्ये सामील व्हायला सांगितलं आणि २७ सप्टेंबरपासून शूटिंग सुरू होणार असल्याचं म्हटलं. तयारी करायला मला किती वेळ मिळणार होता, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण माझ्या हातात संपूर्ण पटकथा होती. तेव्हा सिनेमाचा काळ कुठला आणि किती आहे, हे मला माहीत होतं. आता भारतात आमच्या रिमंच्या रिमं लिखित इतिहास सापडतो, पण त्या काळातली दृष्यं फार कमी असतात. त्यामुळे आमच्यापाशी संदर्भासाठी फार कमी साहित्य असतं. जुने कपडे माणसं विकून तरी टाकतात किंवा फेकून तरी देतात. पण कपड्यांचं डॉक्युमेंटेशन कोणी करत नाही. पण लंडनच्या म्युझियममधून मला जे काही पाहिजे होतं, ते जवळपास सगळं मिळालं. मग येत शिवण आणि माप. परदेशांत वेशभूषाकार जो असतो, तो वेशभूषेची चित्रं काढतो, त्याच वेषभूषेसाठी लागणारी कापडं कुठून आणायची ते सांगतो. रंगसंगती काय असणार ते सुचवतो आणि मग कट्स, त्या त्या काळातील लांबी वगैरेसारखी माहिती देऊन खास टेलर्सकडून ते कपडे शिवून घेतले जातात. नंतरची जबाबदारी असते शिवणार्याची. इथे आम्हालाच सगळं करावं लागतं. तेव्हा ते काम मला द्यावं, अशी अनेक लोकांची इच्छा नव्हती, हे स्वाभाविकच होतं. मला वाटतं, ही ‘बॉक्सवाला’ संस्कृती. कॉन्व्हेंट आणि पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या मंडळींना माझ्यासारखी कोल्हापुरात जन्म घेतलेली, मराठीत शिक्षण झालेली भारतीय कलाकार सॉफिस्टिकेटेड असू शकते, यावर विश्वासच नव्हता. मला असं वाटतं, की तुम्ही तुमच्या संस्कृतीच्या, मुळांच्या जितके जवळ असता, तेवढं त्या संस्कृतीशी अधिक घट्ट नातं निर्माण होतं. रिचर्ड ते समजू शकत होते. ‘ऑस्कर’ समारंभात नामांकन मिळालेले सर्व ते समजू शकत होते. ते सर्वजण (आणि यात मोठमोठी नावं होती, झेफेरेल्लीचा ‘त्राव्हियाता’, ब्लेक एडवर्डचा ‘व्हिक्टर व्हिक्टोरिया’, मेरिल स्ट्रीपचा ‘सोफीज चॉईस’) म्हणतं होते, की मी जिंकेन. कारण या सिनेमाचा कॅनव्हास मोठा होता आणि त्यातला खरेपणा माझ्या पारड्यात मत टाकणारा होता. ‘डॉ. झिवॅगो’ची डिझायनर पॉलीन डाल्टन भारतात आली होती, तेव्हा मला म्हणाली, ‘तुझे कपडे कुठे उठूनच आले नाहीत, ते जणू त्यात मिसळून गेले होते.’ आता हे कौतुक आहे आणि इकडे भारतात लोक म्हणाले, ‘तू असं वेगळं काय केलंस?’ सगळ्यांनी त्या त्या वेळचे नॉर्मल कपडे घातले’. पण तेच तर माझं काम होतं. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी काही तरी झगमग करण्यात अर्थ नसतो, ते कपडे कथेबरोबर, कथेतल्या काळाबरोबर, व्यक्तिरेखांच्या आर्थिक स्तराबरोबर मिसळून जायला हवेत.’

“लगान’च्या बाबतीतही सगळं काही जसं असायला हवं तसं होतं. आशुतोष गोवारीकर माझ्याकडे आला, तो संपूर्ण पटकथा घेऊन. शिवाय कोल्हापूरशी आमचं दोघांचंही नात. मी आमिरला विचारलं, ‘तुला सिनेमा कोणासाठी बनवायचाय? भारतीय प्रेक्षकांसाठी की परदेशी प्रेक्षकांसाठी?’ त्याने उत्तर दिलं, ‘मला चांगला सिनेमा बनवायचाय.’ निर्माता आणि दिग्दर्शकाला आपल्याला काय हवंय, ते नेमकं माहीत असायला हवं. त्या दोघांनी सगळं काही माझ्यावर सोपवलं. मी माझा गृहपाठ करायला सुरूवात केली आणि माझ्या लक्षात आलं, की सिनेमातला काळ हा १८९०चा आहे आणि त्या काळाचा इतिहास सांगतो, की तेव्हा व्हिक्टोरियन काळाच्या अखेरीस कपडे फार नीरस आणि गडद होते. मी हा काळ १८९३ करावा असं सुचवलं, कारण तेव्हा फॅशन्स थोड्या बदलल्या होत्या. कपड्यांचा रंग फिका आणि पांढरा झाला होता. माझी सूचना मान्य झाली. आमिर म्हणाला, की सर्व ब्रिटिश व्यक्तिरेखा या लंडनच्या आहेत, तेव्हा मी तिथे जावं, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचं माप घ्यावं आणि मग कामाला सुरूवात करावी. मी पूर्ण तयारी करून तिथे गेले. सिनेमात २२ व्यक्तिरेखा होत्या आणि नायिका एलिझाबेथसाठी (रेचेल शेली) २४ निरनिराळ्या वेशभूषा होत्या. रेचेलने मुंबईत फिटिंग्जसाठी केवळ एकचं दिवस यावं, एवढाच माझा आग्रह होता. माझ्या कामावर मी खूष आहे. कारण मी त्या काळानुसार वेशभूषा केली हे तर खरंच. पण मी कुठेही चंदेरी झालरी वापरल्या नाहीत, की पंजाबी निर्मात्यांना हवे असतात तसे भडक रंग वापरले नाहीत. माझे कपडे सिनेमाच्या वातावरणामध्ये मिसळून गेले होते. खरंच, आशुतोषने पटकथा इतकी तपशीलवार लिहिलेली होती, की मला त्याचं कौतुक करायलाच हवं. त्यातला एक शब्दही बदलावा लागला नाही, बदलला नाही. या युनिटमध्ये मला अगदी घरच्यासारखं वाटलं, फार ठिकाणी तसं वाटत नाही. भूजमधील व्यवस्था अगदी आदर्श होती. पूर्ण झालेल्या सिनेमात या सगळ्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं.’

भानूताई ब्रीच कँडीजवळच्या एका इमारतीत राहतात. त्या सहाव्या मजल्यावर राहतात आणि त्यांचं ऑफिस व वर्कशॉप आहे तळमजल्यावर. तिथे केवळ एकच टेलिफोन आहे. त्या लोकांमध्ये फार मिसळत नाहीत. पार्ट्यांना जात नाहीत. प्रसिद्धीपासून दूर राहतात आणि लोकांच्या नजरांपासूनही. त्यांना केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर कोलॅबरेशन करून होणार्या सिनेमांसाठी काम करायचंय, जिथे त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या संशोधनला मान्यता मिळू शकेल. भानूताई बोलतात तेव्हा असं वाटतं, की जणू काही आपल्या कलेशी प्रामाणिक राहणं यावर त्यांचं आयुष्य आणि आत्मा अवलंबून आहे. दुसरं काही महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं नसणार आहे.

आजसुद्धा त्या अशा चित्रपटांच्या शोधात आहेत, ज्यात त्यांना त्यांचं इतिहासाचं ज्ञान वापरता येईल आणि त्या जगाला सांगू शकतील, की आपल्या चार हजार वर्ष जुन्या संस्कृतीमध्ये केवढा खजिना दडलाय. आणि विसरू नका, कोल्हापूरला ‘कलापूर’ म्हणणार्या या मराठी बाईला आपल्या संस्कृतीचा अतिशय अभिमान आहे!

साभार: जीवनगाणी प्रकाशित, गौतम राजाध्यक्ष लिखित ‘चेहरे’ पुस्तकातून साभार.

COMMENTS