श्रीनगरः शनिवारची सकाळ काश्मीर प्रेस क्लबच्या इतिहासात दुर्दैवी अशी ठरली. सकाळी स्वयंचलित बंदुका घेतलेले सुमारे डझनभर पोलिस व निमलष्करी दलाचे जवान श्र
श्रीनगरः शनिवारची सकाळ काश्मीर प्रेस क्लबच्या इतिहासात दुर्दैवी अशी ठरली. सकाळी स्वयंचलित बंदुका घेतलेले सुमारे डझनभर पोलिस व निमलष्करी दलाचे जवान श्रीनगरस्थित पोलोव्ह्यू मार्गावरील काश्मीर प्रेस क्लबच्या कार्यालयात अचानक घुसले. कार्यालयात एकाएकी एवढ्या संख्येने सशस्त्र सैनिक पाहून उपस्थित पत्रकार व अन्य नागरिकांमध्ये घबराट उडाली. या सैनिकांनी प्रेस क्लबच्या मुख्य ऑफिसमध्ये घुसून उपस्थित कर्मचाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे, संगणक व अन्य साहित्य ताब्यात घेतले. साधारण पावणे दोनच्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार सलीम पंडित पोलिस संरक्षणात कार्यालयात हजर झाले. त्यांच्या सोबत काश्मीरमधील काही वृत्तपत्रांचे मालकही होते. त्यांनी काही मोजक्याच पत्रकारांची प्रेस क्लबच्या कार्यालयातल्या कॉन्फरन्स रुममध्ये एक बैठक घेतली आणि काही वेळाने नवी कार्यकारिणी जाहीर केली.
अशा रितीने कोणतीही निवडणूक न होता काश्मीर प्रेस क्लबची कार्यकारिणी रद्द करून पोलिसांच्या दादागिरीत, बंदुकांच्या धाकात सलीम पंडित यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम कार्यकारिणी स्थापन झाली व जुनी कार्यकारिणी कोणतेही कारण न देता बरखास्त करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीतील बहुतांश पत्रकार भाजप पक्षाला धार्जिणे असून या सर्वांना प्रशासनाने जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० कलम रद्द झाल्यानंतर पोलिस संरक्षण दिले होते.
शनिवारच्या घटनेनंतर काश्मीरच्या पत्रकारिता विश्वात खळबळ उडाली. काश्मीर प्रेस क्लबमध्ये बंड झाले. २०१८चा जम्मू-काश्मीर सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा गुंडाळण्यात आला. लोकशाही हक्कांसाठी लढणाऱ्या प्रसार माध्यमांवर सरकारने स्वतःचा अंकुश आणला, अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या.
या बंडावर द एडिटर्स गिल्डने तीव्र नाराजी व्यक्त करत सशस्त्र दलाच्या साहाय्याने प्रेस क्लबची कार्यकारिणी ताब्यात घेत, स्वतःची नवी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला. प्रसार माध्यमांची ही मुस्कटदाबी करण्याचा सरकारचा हा थेट प्रयत्न असून कोणतेही वॉरंट वा कागदपत्रे न दाखवता पोलिसांनी बेकायदा प्रेस क्लबच्या इमारतीत प्रवेश केला व बंडाला साह्य केले, असा आरोपही द एडिटर्स गिल्डने केला आहे.
या एकूण घटनेवर द प्रेस क्लब ऑफ इंडियानेही चिंता व्यक्त करत काश्मीर प्रेस क्लबची नवी कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
सलीम पंडित यांनी आरोप फेटाळले
बंड करून काश्मीर प्रेस क्लबचे अध्यक्षपद मिळवलेले सलीम पंडित हे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आहेत. त्यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आऱोप फेटाळले आहेत. मी काश्मीर प्रेस क्लबचा संस्थापक सदस्य आहे. या प्रेस क्लबची कार्यकारिणी व्यवस्थित चालावी अशी आपली इच्छा आहे. सरकारने नव्या नोंदणीस नकार दिला आहे. सरकारपुढे आम्ही नोंदणीसाठी प्रयत्न करणार असून लवकरच प्रेस क्लबच्या निवडणुका घेतल्या जातील अशी प्रतिक्रिया त्यांनी द वायरला दिली.
वास्तविक सलीम पंडित यांचे क्लबचे सदस्यत्व नोव्हेंबर २०१९मध्येच रद्द करण्यात आले होते. त्याला कारण त्यांनी १९ जुलै २०१९मध्ये लिहिलेल्या एका वृत्तांकनात एका लोकप्रिय इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकांचे लष्कर-ए-तयब्बा या दहशतवादी संघटनेशी असल्याचा आरोप केला होता. या वर्तमानपत्रात ‘जिहादी पत्रकार’ काम करतात अशीही त्यांनी टिप्पण्णी केली होती. या प्रकारामुळे सलीम पंडित यांचे पत्रकारितेचा अवमान केल्याबद्दल प्रेस क्लबचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
नाट्यमय घटना
काश्मीर प्रेस क्लबच्या इतिहासात शनिवारी घडलेली घटना नाट्यमय होती. सध्या प्रेस क्लबची नवी कार्यकारिणी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर व नंतरच्या कोविडच्या महासाथीमुळे प्रेस क्लबच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यात जुनी कार्यकारिणीची मुदत १४ जुलैला संपुष्टात आली होती.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू व काश्मीर प्रशासनाने ३७० कलम रद्द झाल्याने जम्मू व काश्मीर सोसायटी रजिस्ट्रेशन कायदाही रद्द झाल्याचे सांगितले होते. त्याला उत्तर देत गेल्या आठवड्यात काश्मीर प्रेस क्लबच्या कार्यकारिणी समितीने आमच्या संस्थेच्या नोंदणीचे नूतनीकरण सरकारने मंजूर केल्याचे सांगितले होते. १४ जानेवारीला या कार्यकारिणीने लवकरच निवडणुका घेऊन आम्ही नवी कार्यकारिणी स्थापन करू असे जाहीर केले होते.
पण घडले असे की काश्मीर प्रेस क्लबच्या नोंदणीचे नूतनीकरण रद्द झाल्याचे एसएसपी सीआयडी (मुख्यालय)च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याला दुजोरा काश्मीर प्रेस क्लबच्या नोंदणीचे नूतनीकरण रद्द केल्याचे रजिस्ट्रार ऑफ सोसायटीचे महमूद अहमद शहा यांनी दिला.
एसएसपी सीआयडी या तपास यंत्रणेकडून काश्मीरमधील दहशतवादाचा तपास केला जातो. त्यांच्या मार्फत प्रेस क्लबला नोंदणीचे नूतनीकरण रद्द झाल्याचे कळवण्यात आले.
शनिवारच्या घटनेबद्दल काश्मीर प्रेस क्लबचे मॅनेजर सजाद अहमद यांनी द वायरला सांगितले की, काही पत्रकार कार्यालयात शनिवारी दुपारी पोलिस-निमलष्करी दलाच्या जवानांच्या संरक्षणात आले व त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत कम्प्युटर, स्टेशनरी व अन्य कागदपत्रे ताब्यात घेतले. या लोकांना तुम्ही कोण असे विचारले असता त्यांनी आम्ही अंतरिम कार्यकारिणीचे सदस्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
या पैकी एकाने नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष सलीम पंडित असून जनरल सेक्रेटरी झुल्फिकार माजिद (‘डेक्कन हेराल्ड’चे वार्ताहर), खजानीस अर्शीद रसूल (‘दैनिक गद्याल’चे संपादक) असल्याची आपल्याला माहिती दिली असे अहमद यांनी सांगितले.
या सगळ्या गदारोळात शनिवारी संध्याकाळी सलीम पंडित यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून काश्मीर खोऱ्यातील सर्व पत्रकार संघटनांना नवी कार्यकारिणी स्थापन करण्याची इच्छा होती. आम्ही ती स्थापन केली असून नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली काश्मीर प्रेस क्लब नव्या उत्साहात काम करेल व पत्रकारांचे प्रश्न सुटतील असे म्हटले आहे. पंडित यांनी या निवेदनात खोऱ्यातील कोणत्या पत्रकार संघटनांना आपले समर्थन आहे, याचा खुलासा मात्र केलेला नाही.
COMMENTS