अतिडाव्याच्या मनातील परिवेदनेबाबत अंतर्दृष्टी देणारं  ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’

अतिडाव्याच्या मनातील परिवेदनेबाबत अंतर्दृष्टी देणारं ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’

कार्ल मार्क्स, जलालुद्दीन रूमी आणि झरतृष्ट, अशा विविध तत्ववेत्यांच्या प्रभाव घेऊन त्या परिप्रेक्ष्यात डाव्या चळवळीकडे पाहात चिंतनपर विचारांची मांडणी केल्याने, डाव्यांसाठी हे पुस्तक म्हणजे, विश्लेषण कमी, उपदेश जास्त, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही कोबाड यांच्यावर सुरू असलेले खटले आणि बरचसं लिखाण तुरुंगात केलं असल्याने तिथे येणाऱ्या मर्यादा अशा सर्व गोष्टी लक्षात घेता, लिखित शब्दांच्या पलीकडे जाऊनही काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात

‘नावा’तली स्त्रीमुक्ती
‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’
माझे ‘गांधीजीं’वरील प्रयोग(!)

१९८०च्या दशकातील गोष्ट असेल. एका अग्रणी मराठी लेखकासोबत चर्चा करत असताना कोबाड गांधी यांच्याबाबतचा विषय निघाला. आम्ही दोघेही नागरी स्वातंत्र्याच्या चळवळीशी निगडित असल्याने त्यांना ओळखत होतो. तेव्हा नुकतेच कोबाड गांधी आणि अनुराधा गांधी या दाम्पत्याने विदर्भात तळागाळातील लोकांमध्ये झोकून देऊन  काम करण्यास सुरुवात केली होती. कोबाड यांच्यासारख्या ‘डून स्कूल’मध्ये शिक्षण घेतलेल्या, लंडनमध्ये ‘चार्टर्ड अकाऊंटन्सी’चे धडे घेतलेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे एका संपन्न पारशी कुटुंबात राहिल्याने बालपणापासून सामान्यजनांपासून दूरच राहिलेल्या पस्तिशीतल्या व्यक्तीने अतिडाव्या चळवळीचा ध्येयासक्त होऊन मार्ग धरावा याबाबत मात्र आश्चर्य वाटत होतं. प्रश्न असा पडत होता, की अशा व्यक्तीला असा मार्ग धरण्यास उद्युक्त करण्यास कोणती प्रेरकशक्ती (ड्रायव्हिंग फोर्स) असावी? लंडनहून परत येऊन त्यांना दहाहून अधिक वर्ष होऊन गेली होती. नागरी स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचं चैतन्य दिसून आलेलं होतं. १९७०च्या दशकाच्या पूर्वार्धातील ‘प्रोयोम’च्या सान्निध्यामुळे असलेला अतिडाव्या विचारांकडील त्यांचा कल  कायम असल्याचंही जाणवत होतं. असं सर्व  लक्षात घेता समाजातील विषमता, अन्याय याबद्दलची अतीव परिवेदना (डीप अँग्स्ट) हीच त्या मागची प्रेरकशक्ती असावी, अशा अनुमानाप्रत येऊन आमची चर्चा थांबली. अनुमान असं म्हणण्याचं कारण हे, की कोबाड हे तसे अंतर्मुख होते आणि त्यांच्या तत्कालीन लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला समजून घ्यायचं तर ते अगदी अॅकॅडेमिक शिस्तीत लिहिणारे आणि जास्त करून अर्थकारण व राजकारणाच्या क्षेत्रातील विषयांवर – त्या विषयांतील संज्ञा आणि संदर्भ काटेकोरपणे वापर करून लिहिणारे – असेच होते. त्यामुळे विचारांपर्यंत पोहोचणं जरी शक्य होत असलं, तरी अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं फार सोपं वाटत नव्हतं. त्यांचा स्वभाव बाह्यतः अत्यंत मृदू वाटत असल्याने संवेदनशीलता जाणवायची, परंतु, मुळात अंतर्मुख असल्याने खूप मनापासून संवाद करतील याबाबत शाश्वती वाटायची नाही. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णतः तुटल्याने आणखी काही जाणून घेण्याची संधीही नंतर राहिली नव्हती.

जवळपास चार दशकांनी जेव्हा त्यांचं ‘रोली बुक्स’तर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे आत्मचिंतनपर इंग्रजी पुस्तक वाचनात आलं तेव्हा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची संधी प्राप्त झाल्यागत वाटलं – तेही आता त्यांच्या त्या जीवनप्रवासाच्या ते दुसऱ्या टोकावर असताना. नुकताच त्याच पुस्तकाचा अनघा लेले यांनी केलेला मराठी अनुवाद ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ याच नावाने ‘लोकवाड़्मय गृह’ प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आणि त्या निमित्ताने हा लेख.

नाट्यमय अटक

या पुस्तकाची सुरुवात २००९मध्ये झालेल्या नाट्यमय अटकेच्या घटनेच्या वर्णनाने होते. अटक झाल्यावर तीन दिवस ते गुप्तचर खात्याच्या ताब्यातच होते व त्यानंतर ‘स्पेशल सेल’च्या पोलिसांकडे सुपूर्द करून अधिकृत अटक झाल्याचं दर्शवण्यात आलं असा कोबाड यांचा दावा आहे. या कथनात दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात, ते म्हणजे पोलीसयंत्रणेची कार्यपद्धती आणि एप्रिल २००८मध्ये त्यांची पत्नी अनुराधा हिच्या अकाली निधनाबद्दल तेव्हा त्यांच्या मनात उमळून आलेल्या भावना. ज्यामुळे आंध्राचे गुप्तचर पोलीसही बहुधा हेलावून गेले. अटक झाल्याचा थर्रार पचवताना देखील, अनुच्या मृत्यूपेक्षा ही घटना भीषण असू शकत नाही, या विचाराने त्यांना सांत्वन लाभतं. अनुराधा याचं त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातही किती मोठं स्थान होतं, त्याची पहिली झलक इथे आपल्याला मिळते.  २००९मध्ये अटक झाली तेव्हा पोलीस व मीडियानेही ‘बिग कॅच’ हाती लागला असल्याचा गाजावाजा केला होता आणि त्यामुळे खूपच खळबळ उडाली होती. त्यानंतर माओवादी पक्षाचे उच्चपदस्थ नेते असल्याचे आणि अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप करून देशभरात म्हणजे, दिल्ली, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, गुजरात आणि झारखंड अशा पाच राज्यांत त्यांच्यावर विविध खटले भरण्यात आले.  ‘यूएपीए’सह भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदवण्यात आले होते.

तब्बल दहा वर्षे तुरुंगवास भोगून झाल्यावर म्हणजे ‘यूएपीए’च्या आरोपातून दोषमुक्त ठरवलं गेल्यावर २०१९मध्ये ते जामिनावर सुटले. त्यानंतरच्या जवळपास दीड वर्षांत त्यांनी आपल्या वाटचालीबद्दल, आपल्या तुरुंगातील अनुभवांबद्दल, तिथे संपर्कात आलेल्या व्यक्तींबद्दल आणि त्या काळात केलेल्या चिंतनाबद्दल सांगणारं  ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक लिहिलं. मराठी अनुवादित पुस्तकाच्या ‘ब्लर्ब’वर म्हटल्यानुसार ‘ही कहाणी आहे दोन टोकांवरच्या अनुभवांची – उच्चभ्रू जगातल्या संपन्नतेची आणि आत्यंतिक निराशेची. आपल्या काळातला घडामोडींची आणि बहुसंख्य लोक ज्यापासून दूरच राहतील अशा एका जीवनमार्गाची’. या कथनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे, की ते आत्मचिंतपर कथन असूनही ते सतत आणि जराही उद्विग्न न होता, सजगतेने भवतालाचा  आणि बदलणाऱ्या समाजमनाचा वेध घेताना दिसतं. नक्षलवादी म्हणजे, केवळ आपला चेहरा झाकून वावरणारे खूँखार बंदूकधारी अशी एक ‘लोकप्रिय’ प्रतिमा रूढ केली गेली आहे – त्यापलीकडे जाऊन अतिडाव्यांच्या मनोभूमिकेच्या अंतरंगात डोकावण्याची संधी हे पुस्तक निश्चितच वाचकांना देतं.

तीन विभागात रचना

या २७१ पानी पुस्तकाची तीन विभागात रचना केलेली आहे. पहिला विभाग – ‘कार्यामागची प्रेरणा आणि वाटचाल’; दुसरा, ‘भारतातील तुरुंगांमध्ये एक दशक’; आणि तिसरा, ‘चिंतन आणि औचित्याचा विचार’.

पहिल्या विभागात, म्हणजे कार्यामागची प्रेरणा आणि वाटचाल’ या विभागात ‘डून स्कूल’मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर आणि त्यानंतर मुंबईतून बी एस सी (रसायनशास्त्र)चे पदवी प्राप्त झाल्यावर कोबाड मोठ्या उमेदीने ‘चार्टर्ड अकाऊंटन्सी’चे शिक्षण घेण्यास लंडनमध्ये कसे गेले होते, तिथे त्यांनी कशी प्रगती केली होती त्याबाबत थोडक्यात कथन केलं आहे. पुढे लंडनमध्ये तेथील वर्णद्वेषी राजकारणाबाबत  आवाज उठवल्याने त्यांना कसा तुरुंगवास घडला आणि राष्ट्रप्रेमामुळे आणि त्याचप्रमाणे, व्हिएतनाम व चीनमधील सांस्कृतिक क्रांती यांनी प्रभावित झाल्यामुळे ते डाव्या विचारसरणीकडे कसे वळले आणि आपलं करीअर अर्धवट टाकून भारतातील डाव्या चळवळीत सहभागी होण्याचे ध्येय डोक्यात ठेवून मुंबईला कसे परतले, त्याचं सविस्तर विवेचन आहे.  १९७१मध्ये मुंबईत परत आल्यावर ते ‘प्रोयोम’सारख्या चारू मुजुमदार यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या युवकांच्या गटाच्या संपर्कात आले आणि मुंबईच्या मायानगरच्या झोपडपट्टीत कार्याला सुरुवात केली. याच काळात त्यांची विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेल्या अनुराधा गांधी यांचा परिचय झाला. दोघांनी एकत्र कार्य सुरू केलं, तेव्हा मुंबईत ‘दलित पँथर’ची चळवळही जोरात होती. परंतु, नंतर १९७५मध्ये ‘आणीबाणी’ लागू झाल्यावर त्यांच्या कार्याला एकप्रकारे खिळ बसली.

पुढे, आणीबाणी जाऊन जनता पक्षाचं सरकार आल्यावर जेरबंद केले गेलेल्या अनेक अतिडाव्या कार्यकर्त्यांची सुटका झाली आणि ते पुन्हा संघटीत होऊ लागले. कोबाड आणि अनुराधा गांधी हे दाम्पत्य आणीबाणीनंतर नागरी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय होते आणि त्यांनी ‘सीपीडीआर’ (कमिटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स’) या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. पुढे, चारू मुजुमदार यांच्या मूळ कार्यप्रणालीत सुधारणा करून असंसदीय मार्गानेच कम्युनिस्ट चळवळ पुढे नेऊ पाहणाऱ्या  ‘जनशक्ती’, ‘पीपल्स वॉर’ या गटांच्या संपर्कात आले आणि नंतर त्यांनी तळागाळातील लोकांमध्ये काम करण्यास सुरुवात करावी या विचाराने नागपूरला स्थलांतर केलं. आत्मस्तुती वा आत्मप्रशंसा यांना जराही जागा न देता अनुराधा यांच्यासोबतचा सर्व प्रवास कोबाड यांनी या पहिल्या विभागात प्रांजळपणे कथन केला आहे. त्याचप्रमाणे, या विभागातील अनुराधा गांधी यांचा २००८मध्ये ‘फॅल्सिपॅरम मलेरिया’ने अकाली मृत्यू झाल्यावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेली पोकळी याबाबत सांगून ‘अनुराधा असण्याचे महत्त्व’ या उप-विभागात अनुराधा  या कशा आदर्शवत सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या होत्या त्याबाबत सोदाहरण चर्चा केली आहे. अनुराधा यांच्या व्यक्तिमत्वात स्वतःपेक्षा व बहुतांश कार्यकर्त्यांपेक्षा असे कोणते वेगळे गुण होते, याची त्यांनी यासाठी सविस्तर चर्चा केली आहे.  अर्थात, संघटनेमध्ये उच्च मूल्ये पाळून कार्य करणं किती महत्त्वाचं असतं, हा मुद्दा पटवून देण्यासाठीच त्यांनी अनुराधा यांच्या व्यक्तीमत्वाची, स्वभाववैशिष्ट्यांची  व कार्यपद्धतीची – एक ‘मॉडेल कार्यकर्ता म्हणून –  जाणीवपूर्वक  सविस्तर चर्चा केली आहे – या उद्दिष्टाचा पुढे ‘चिंतन आणि औचित्याचा विचार’ या तिसऱ्या विभागात उलगडा होतो.

तुरुंगवासाबद्दलचा दुसरा विभाग

देशभरातील विविध राज्यात खटले सुरू असताना कोबाड गांधी  यांना ‘अंडर ट्रायल’ कैदी म्हणून दहा वर्षे विविध तुरुंगांमध्ये  ठेवण्यात आले होते – अतिडावे कम्युनिस्ट नेते मानून त्यांना ‘हाय रिस्क वॉर्ड’ मध्ये, अर्थात ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली गेली होती.  त्या दहा वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ७ वर्षांचा तुरुंगवास त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात घडला. पुढील तीन वर्षांदरम्यान त्यांना  हैदराबाद, विशाखापट्टणम, चेन्नई, रांची आणि पतियाळा येथील विविध तुरुंगांमध्ये ठेवण्यात आलं होतं.

तिहार तुरुंगातील आपले अनुभव अत्यंत वाईट कसे होते, ते त्यांनी सोदाहरण सांगितलं आहे. तुरुंगातील गैरप्रकारांसह येथील ‘डॉन’ना व मोठ्या राजकीय नेत्यांना कशी ‘व्हीआयपी’ वागणूक मिळते तेही सविस्तर सांगितलं आहे.  निर्भया प्रकरणातील एका आरोपी वा अन्य नीच मनोवृतीच्या आरोपींच्या सान्निध्यात होणाऱ्या कोंडमाऱ्याबाबतही ते लिहितात. त्याचप्रमाणे, एखाद्या म्झादाखाली, मोकळ्या मैदानात नेमाने योगासनं करणे, चिंतन करणे,  मुक्तपणे पळापळ करणाऱ्या खारींकडे पाहत राहणे आणि लिखाण करणे, यांद्वारे त्यांना मनःशांती लाभत होती आणि दीर्घकाळ तुरुंगवास भोगण्यासाठी आत्मबळही कसं लाभत होत ते त्यांनी नमूद केल आहे.

या विभागातील सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे अफझल गुरू या राजकीय कैद्याबाबत. तुरुंगातील धर्मांध इस्लामी, वहाबी दहशतवाद्यांपेक्षा तो वेगळा असल्याने त्याच्याशी आपला कसा संवाद होता, त्याचं त्यांनी विवेचन केलं आहे. त्याची धर्मावर नितांत श्रद्धा असली, तरी तो सुफी होता आणि सुशिक्षित होता. त्याला इंग्रजीही चांगलं अवगत होतं. अफझल याच्यामुळे कोबाड यांना सुफी संतकवी जलालुद्दीन रूमी याच्या साहित्याचा परिचय झाला. कोबाड त्यातील प्रेमाच्या संकल्पनेला केंद्रवर्ती मानून मांडलेल्या तत्त्वज्ञानाने विशेष प्रभावित झाले. त्याने प्रभावित होऊन त्यांनी आपली पत्नी अनुराधा हिच्यावर स्मृतीपर कविता केली.

कोबाड यांच्या वाचनात रुमी यांनी मित्राच्या निधनानंतर लिहिलेली ‘युअर फेस ही स्मृतीपर कविता आली होती. अनुवादित स्वरूपात त्याचा आशय खालीलप्रमाणे  –

तुझा चेहरा

तू निरोप घेत असशील. सगळा गोडवा घेऊन आत्मा या जगाचा निरोप घेतो तसा.

तू निघून जात असशील. पण लक्षात ठेव. इथे काही जिवलग आहेत. गवताइतके, वरच्या आभाळाएवढे एकनिष्ठ.

…….

ही आस आता मला वेढून आरपार जाते. आजवर अनेकदा वेदना अनुभवलीये. पण अशी नाही. या गाभ्यातून फुटणारा प्रेमाचा अंकुर वाहण्याचं काम माझं. तुझी अनन्य वेदना जप, तो एक रस्ता आहे. नियंत्यापर्यंत  पोचण्याचा.

मला ते प्रेम वाहून न्यायचंय, तुझ्या प्रेमासाठी आसुसलेल्यांना दिलासा द्यायचाय, ते तुझ्या वाटेवर चालू पाहतायत, धुळीतल्या तुझ्या पाऊलखुणा निरखत.

कोबाड यांनी यापासून प्रेरणा घेऊन ‘अनुराधा’वर लिहिलेली तिहार जेलमध्ये जी स्मृतीपर इंग्रजी कविता लिहिली त्याचा  भावार्थ खालीलप्रमाणे- 

मी आत्म्याविषयी काही जाणत नाही. पण, इतकं जाणतो, की तिचं आंतरिक तेज जीवित राहील,

दलित-शोषितांबद्दलच्या अतीव करुणेतून निपजलेल्या मानवी मूल्यांच्या संदेशाच्या रूपात.

अतीव दुःख तर आहेच, शंकाच नाही. पण, हृदयाच्या जखमा काळ भरून काढू शकतो,

मात्र, हे दुःख आता असा वन्ही चेतवण्याचं कार्य करेल, ज्यायोगे या अंधारमय जगात उजेड पसरेल, तिच्या जीवन-संदेशाकरवी.

अनुराधा जीवित राहील, मानवतेच्या पाकळ्यांवरील एखाद्या दवबिंदू सारखी.

अफझल गुरूच्या सानिध्यात झालेल्या संवादाबाबत सविस्तर सांगून नंतर अफझलला अचानक फाशी देण्याचा निर्णय झाला आणि पहाटे तडकाफडकी फाशी दिली गेली तेव्हाचे तुरुंगातील वातावरणही चित्रीत केलं आहे. त्यावेळीही अफझल कसा शांत-धीरोदात्त होता त्याचं वर्णन केलं आहे. आणि त्याचप्रमाणे सुफी तत्त्वज्ञानानुसार मृत्यूनंतर ‘जन्नत’ असल्याच्या धारणेवर श्रद्धा असल्यानेच बहुधा त्याला मानसिक बळ मिळाले असेल असं ते म्हणतात. त्याच्यावर अन्याय झाला आणि त्याला गुप्तचर खात्यातर्फे गोवण्यात आले असंही ते सूचित करतात. या विभागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक ‘डॉन्स’च्या संनिध्याबाबत सांगताना कुठेही भडक कथन नाही; उलट अत्यंत तटस्थपणे केलेली निरीक्षणं आढळतात. त्याचप्रमाणे, सुधींद्र कुलकर्णी (पूर्वी भाजप मध्ये असलेले) यांच्यासोबत त्यांचा झालेला संवादही रोचक असा आहे.

बहुस्तरीय कथन

या पुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे, की लेखक या पुस्तकाद्वारे समाजातील विविध गोष्टींचा, घटकांचा, भवतालाच्या संदर्भासह सतत चिंतनशील निरीक्षण करत असल्याने, वाचकाला विविध स्तरांवर प्रवास घडत राहतो आणि लेखक त्याला कुठलाही आग्रह न धरता विचारप्रवृत्त करत राहतो. त्याचप्रमाणे, अभिव्यक्तीमध्ये सतत मानवी ओलावा जाणवतो –  विशेषतः डाव्या वर्तुळातील ज्यांनी त्यांचे पूर्वीचे करकरीत अभ्यासकीय लेख वाचले असतील, त्यांना तर अशी अभिव्यक्ती निश्चितच वेगळी जाणवेल.

या पुस्तकातील तिसरा विभाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आधीच्या दोन विभागांत संवेदनशीलतेचं, आत्मपरीक्षणाचं आणि चिंतनशीलतेचं केवळ सूचन दिसून येतं, पण या विभागात त्याचं सारतत्त्व मांडलेलं आहे. किंबहुना हा विभाग त्यानी मूलतः तमाम डाव्या वर्तुळातील कॉम्रेड्नांच संबोधित केलेला आहे  – त्याच स्वरूपाचा असल्याचं जाणवतं.

आधीच्या विभागातील कवितेतून केवळ हळवेपणा जाणवत नाही, तर कमालीची संवेदनशीलता जाणवते. वास्तविक, तिसरा विभाग ‘औचित्याचे चिंतन’ हादेखील तीच संवेदना घेऊनच लिहिलेला आहे.  डाव्यांनी मुळापासून आत्मनिरीक्षण करावं या दृष्टीने त्यांचा प्रयत्न त्यातून दिसून येतो.

जर एका साम्यवादी ‘युटोपियन’ समाजाच्या स्वप्नांचा ध्यास घेत कार्य करत असाल, तर आपल्या संघटनेतही परस्पर सौहार्द, स्नेहभाव असावा, आनंददायी मूल्यांचा आग्रह असावा  – चढाओढीचे, क्लृप्तीबाजीचे डावपेचाचे वातातावरण नसावे. अशा नकारात्मक गोष्टी असल्या तर तुम्ही ज्यांना संघटीत करता त्यांच्यामध्येही नकारात्मक वृती, भाव निर्माण करता, अशी तत्वज्ञानात्म भूमिका त्यांनी घेतली आहे. अंतर्मुख होऊन परस्पर स्नेह्भावाचा विचार करताना या विभागातही त्यांनी पुन्हा रूमीच्या एका कवितेचा – ‘आय केम अलाइव्’ – दाखला दिला आहे. त्या कवितेचा भावार्थ असा –

मी होतो एक उद्धट गुलाम, गाढव-हाक्या, भुरटा चोर. प्रेमाने जादू केली.

एका उदार निःस्वार्थी माणसात माझं रुपांतर केलं. मी बनलो एक राजा, सरदार, आणि मुखिया.

….

(जीवनरूपी) बुद्धिबळाच्या पटावर शांतपणे चालत रहा, ‘त्या’ने आधीच नियत केल्यात तुझ्या क्षमता.

तुझी दिखाऊपणाची आणि अहंकाराची पुटं गळून पडतील, तेव्हा उरेल केवळ अपार आनंद. एक अमृतानुभव.

अर्थात यातील ‘त्या’चा (नियंत्याचा) उल्लेख त्यांना अभिप्रेत नसावा. मुळापासून आत्मपरीक्षणासाठी आवश्यक आहे, हेच त्यांना अभिप्रेत असावं.  कारण, त्यांनी, कार्ल मार्क्सच्या ‘थर्ड थेसिस ऑफ फोयरबाक’ ( ‘Third Thesis on Feurbach’)  यातील अवतरण या संदर्भात नमूद केलं आहे –

‘ऐतिहासिक भौतिकवाद जग समजून घेण्यास मदत करतो; सर्वहारा क्रांती हा जग बदलण्याचा मार्ग आहे. तसे करत असताना, सर्वहारा वर्ग जगाची पुनर्निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचेही जग निर्माण करेल. दुसऱ्या शब्दात, समाज अधिक चांगला होण्यासाठी त्याची बांधणी करत असताना, क्रांतिकारीसुद्धा स्वतःला अधिक चांगला मानव बनवत असतात.’

कोबाड म्हणतात, आपली चेतना आणि बाहेरचे जग हे द्वंद्वात्मक नात्यामध्ये असतात, दोन्ही एकमेकांवर कार्य करतात आणि त्यांना प्रभावित करतात. मूल्ये पोकळीमध्ये बदलत नाहीत, त्यांच्या इतरांवरील परिणामांमधून ती प्रतिबिंबित होतात, असं ठाम प्रतिपादन करून कोबाड डाव्या चळवळीशी निगडित सर्वाना कार्य करताना नवीन मूल्यसंच विकसित करण्याचा आग्रह धरतात. ते म्हणतात, ‘मानवी स्वभाव बदलणे अशक्य आहे आणि कम्युनिस्टसुद्धा जेव्हा सत्तेवर येतील, तेव्हा ते इतरांसारखेच वागतील असे अनेकजण म्हणतात. दुर्दैवाने, तसे घडलेही आहे, पण त्याचा अर्थ केवळ कार्यकर्त्यांनी आपल्या मूल्यांकडे आणखी खूप लक्ष देणे गरजेचे आहे इतकाच आहे.’ या संदर्भात त्यांनी असंही म्हटलं आहे, की ‘शेवटी, खरे स्वातंत्र्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या आतल्या चांगुलपणाशी जोडल्या गेल्या पाहिजेत. चांगुलपणा हा घटक अत्यावश्यक आहे, कारण कुणाचेही वैयक्तिक स्वातंत्र्य हे इतरांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी किंवा त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यासाठी उपयोगात येता कामा नये… आपल्यामधला चांगुलपणा हा आपल्या दृष्टिकोनातील विविध नीतिमूल्यामधून येतो. आजूबाजूची कीड पाहता ही उत्तम मूल्ये उत्क्रांत होण्यासाठी वेळ लागू शकतो, पण ती कुणावर जबरदस्तीने थोपवता येत नाहीत. ती स्व-जाणीव आणि जागृती या प्रक्रियेमधून विकसित व्हायला हवीत.’

‘पैसा आणि सत्तेमुळे होणारा विध्वंस’ या उप-शीर्षकाखाली केलेल्या चर्चेत ते अंस सूचित करतात, की झारखंड मधील काही पूर्वाश्रमीचे अतिडावे कार्यकर्ते तेथील खाणींच्या पार्श्वभूमीमुळे ‘पैशाच्या’  मागे लागले. कोबाड पुढे असंही म्हणतात, की सत्ताकारणाबाबत व सत्तेचं वर्चस्व व त्याची काळी बाजू याबाबत बरंच लिखाण झालेलं असलं, तरी ’पैसा मिळवण’ या मूल्याबाबत खोल चिंतन-लेखन झाल्याचं आढळत नाही. या संदर्भात तुरुंगातील अनुभवांच्या आधारे ते म्हणतात, “बाहेरच्या ‘मुक्त’ जगाचे जसे एक विश्व असते, तसे तुरुंगाच्या आतही एक विश्व असते. त्या विश्वात एकच देव असतो आणि तो म्हणजे पैसा. मी आधी म्हटले तसे, पैशावर चालणाऱ्या बाहेरच्या जगात स्वातंत्र्यावर घाला घालणारे असे जे घटक असतात ते म्हणजे, सत्ता आणि हाव. तुरुंगात ते आणखी ओबडधोबड स्वरूपात असतात.”

पैसा ही एक अशी शक्ती आहे, जी सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांचा विध्वंस करते, असं म्हणून ते कार्ल मार्क्सच्या ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स’ मधील अवतरणाचा दाखला देतात –

‘पैसा म्हणजे माणसाच्या ‘सर्व मानवी आणि नैसर्गिक गुणांना गोंधळात टाकणारे स्वरूप देणारी आणि त्यांना उलटसुलट करणारी शक्ती आहे; असंगत अशा गोष्टींमध्ये सख्य साधणारी शक्ती आहे – पैशाची दिव्य शक्ती –ती माणसाला स्वतःपासून दुरावते, परात्मता निर्माण करते. पैसा ही मानवजातीची परात्मशक्ती आहे.’ 

अनेक सांस्कृतिक क्रांत्यांची आवशकता

अखेरीस, आनंददायी मूल्यसंच्याचा आपला आग्रह कायम ठेवत ते म्हणतात, की  ‘पैसा आणि सत्ता यांच्या प्रभावाला परिणामकारकतेने विरोध करायचा असेल, तर सर्वोच्च आनंद साध्य करण्याच्या एकंदर ध्येयासह चांगली मूल्ये आणि स्वातंत्र्य/लोकशाही असणे ही पूर्वअट ठरते. जर ही चेतना असेल तर नकारात्मक परिणाम पूर्ण नाहीसा झाला नाही तरी कमी होऊ शकतो. ही एकदाच करून संपणारी गोष्ट नाही. असे सातत्याने करावे लागेल आणि तो स्वतःच्या आत व बाहेर चालू असणारा सततचा संघर्ष असेल. एका नव्या माणसाची निर्मिती करण्यासाठी हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या लागतील. तर आणि तरच एक न्याय्य आणि स्थिर नवीन व्यवस्था निर्माण होऊ शकेल; स्वप्नातला युटोपिया वास्तवात येऊ शकेल.’ असं सांगून पुन्हा ते रूमीच्या अवतरणाचा आधार घेत समारोप करतात- ‘झाडासारखे बना आणि मृत पाने गळून जाऊ द्या.

कार्ल मार्क्स, जलालुद्दीन रूमी आणि झरतृष्ट, अशा विविध तत्ववेत्यांच्या प्रभाव घेऊन त्या परिप्रेक्ष्यात डाव्या चळवळीकडे पाहात चिंतनपर विचारांची मांडणी केल्याने, डाव्यांसाठी हे पुस्तक म्हणजे, विश्लेषण कमी, उपदेश जास्त, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही कोबाड यांच्यावर सुरू असलेले खटले आणि बरचसं लिखाण तुरुंगात केलं असल्याने तिथे येणाऱ्या मर्यादा अशा सर्व गोष्टी लक्षात घेता, लिखित शब्दांच्या पलीकडे जाऊनही काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तरीदेखील सामान्य वाचकांच्या मनातील ‘बंदुकधारी, बुराखाधारी’ अशा एकेरी प्रतिमांचा विचार करता, अतिडाव्या विचारसरणी असलेल्यांबाबतच्या मिथकांना छेद देत हे पुस्तक वास्तवाबाबत बरीच आगळी अंतर्दृष्टी देऊ शकेल, असं वाटतं.

या लेखाच्या सुरुवातीला, अन्यायाबद्दलाच्या  ‘अतीव परिवेदने’चा, अगतिकतेच्या भावनेचा उल्लेख केला होता- जी कोबाड यांना कार्यप्रवृत्त करण्यास प्रेरक शक्ती ठरत होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर आता त्या वेदनेकडे सुजाणपणे पहाण्याचा प्रयत्न त्यांच्या या पुस्तकातून दिसून येतो, इतकं निश्चित.

बहुस्तरीय पुस्तकाचा अनुवाद

वास्तविक, इतक्या वेगवेगळ्या स्तरावर प्रवास घडवणाऱ्या, विविध संदर्भांची सतत आवक-जावक असलेल्या, कधी जिवंत प्रसंगाचं वर्णन, तर कधी सूक्ष्म निरीक्षणं मांडणाऱ्या, कधी तात्विक चर्चा करणारं कथन तर कधी काव्यांद्वारे आपला मुद्दा पटवून ज्ञाचा प्रयत्न – अशा बहुस्तरीय पुस्तकाचा अनुवाद करणं, हे एक मोठंच आव्हान होतं. परंतु, अनघा लेले यांनी या पुस्तकातील सर्व छटा समजून घेऊन अत्यंत संयततेने अनुवाद केल्याचं दिसून येतं. काही इंग्रजी शब्दांसाठी त्यानी योजलेल्या शब्दांची निवड खूपच कौतुकास्पद आहे. मराठी वाचकांच्या दृष्टीने या पुस्तकाच्या रूपाने एक मोठा आवाका असलेला व जाणिवांच्या कक्षा वाढवणारं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. ‘लोकवाड़्मय गृह’ प्रकाशना’नेही सुरुवातीच्या उद्देश-टिप्पणीत  ‘मानवाधिकार सतत कसे नाकारले जात्तात त्याचे समर्थपणे वर्णन करणारे’ आणि डाव्यांच्या संघर्षाबाबत ‘आत्मपरिक्षणाची गरज’ परिणामकारकतेने  मांडणारे पुस्तक म्हणून प्रकाशित करत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे.

मिलिंद चंपानेरकर, हे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0