भारतात बनावट ‘एन-95’ मास्कचा सुळसुळाट

भारतात बनावट ‘एन-95’ मास्कचा सुळसुळाट

अर्णब भट्टाचार्य स्वत:ला गमतीने मास्क-योद्धा म्हणतात. दोन महिन्यांपूर्वी, कोविड-१९ साथ देशभरात वेगाने पसरत असताना त्यांच्या प्रयोगशाळेने ‘एन-95’  रेस्

लीलाताईंची शाळा…
झिरो आकलन व झिरो विचार शेती….
‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’

अर्णब भट्टाचार्य स्वत:ला गमतीने मास्क-योद्धा म्हणतात. दोन महिन्यांपूर्वी, कोविड-१९ साथ देशभरात वेगाने पसरत असताना त्यांच्या प्रयोगशाळेने एन-95’  रेस्पिरेटर्सचा दर्जा तपासणे सुरू केले. एन-95’  रेस्पिरेटर हा मास्कचा असा प्रकार आहे, जो घालणाऱ्याला हवेतून येणाऱ्या कोरोनाविषाणूयुक्त सुक्ष्म थेंबांपासून (ड्रॉपलेट्स) संरक्षण पुरवतो. भट्टाचार्य टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये फिजिसिस्ट आहेत. साथीच्या प्रसाराला सुरुवात झाली तेव्हा थ्रीएम ही अमेरिकी फर्म किंवा मुंबईची मॅग्नम हेल्थ अँड सेफ्टी अशा प्रस्थापित उत्पादकांनी तयार केलेल्या ‘एन-95’  रेस्पिरेटर्सचा तुटवडा भासू लागल्याने नवीन उत्पादकांचे मास्क वापरण्याचा विचार सुरू झाला आणि येथूनच भट्टाचार्य यांचे काम सुरू झाले. नवीन उत्पादकांचे रेस्पिरेटर्स त्यांच्या दाव्यानुसार काम करत आहे की नाही हे तपासण्यास टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलने भट्टाचार्य यांना सांगितले. ‘एन-95’  मास्कद्वारे ०.३ मायक्रोन्सहून मोठे सूक्ष्म कण ९५ टक्के फिल्टर केले जाणे अपेक्षित असते. नवीन कंपन्यांचे मास्क अपेक्षित काम करत आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी भट्टाचार्य यांच्यावर आली. टीएसआयसारख्या कंपन्यांच्या तयार मास्क-टेस्टर्सची किंमत लाखांच्या घरात असते आणि ते सहज उपलब्धही नसतात. म्हणून भट्टाचार्य यांच्या टीमने वायू प्रदूषण मॉनिटर वापरून चाचण्या सुरू केल्या. त्यांनी हे उपकरण मॅग्नमसारख्या प्रस्थापित उत्पादकांच्या ‘एन-95’ वर वापरून बघितले आणि ते खात्रीशीर असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, नवीन कंपन्यांचे मास्क तपासायला सुरुवात केली, तेव्हा त्यातील काही ‘एन-95’ च्या जवळपासही जाणारे नाहीत, असे भट्टाचार्य यांच्या टीमच्या लक्षात आले. हे निकृष्ट दर्जाचे मास्क ०.३ मायक्रॉनहून मोठ्या सूक्ष्मकणांपैकी केवळ ६०-८० टक्केच फिल्टर करू शकतात आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा वापर धोक्याचा आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

‘एन-95’ चे लेबल असलेले काही मास्क केवळ जीवाणू फिल्टर करत होते, विषाणूंवर त्यांतून आत शिरत होते. काही ‘एन-95’ रेस्पिरेटर्स वॉशेबल असल्याचा दावा उत्पादकांनी केला होता. मात्र, ‘एन-95’ च्या बाबतीत हे शक्यच नाही, कारण, त्यात छोटे कण अडकावेत म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज वापरलेला असतो. मास्क धुतला तर तो नाहीसा होतो. एकंदर बनावट ‘एन-95’  मास्कचे प्रमाण बघून धक्का बसल्याचे भट्टाचार्य सांगतात.

त्यानंतर त्यांनी आरोग्यसेवा कर्मचारी व तज्ज्ञ नसलेल्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक वेबिनार्स घेतले. मात्र, निकृष्ट मास्कची समस्या टाटा मेमोरियल किंवा मुंबईपुरती मर्यादित नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘एन-95’ रेस्पिरेटर्सची मागणी वाढल्याने तुटपुंजा अनुभव असलेले अनेक नवीन उत्पादक ही उत्पादने तयार करू लागले आहेत. मात्र, त्यातील फार थोडे प्रभावी मास्क तयार करू शकत आहेत. गेल्या तीन महिन्यांत सुमारे १५० नवीन उत्पादक आले आहेत आणि त्यातील काहींचे ब्रॅण्ड्स पूर्णपणे बनावट आहेत, असे प्रिव्हेंटिव वेअर मॅन्युफॅक्चुअरर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजीव रेल्हन यांनी सांगितले.

कोविड साथीमुळे एचएलएल लाइफकेअरसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने केवळ सरकारी वापरासाठी ६ लाख मास्ककरता मार्च २०२० मध्ये निविदा जारी केली होती.

बनावट मास्क प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे निकृष्ट माल पुरवणाऱ्यांवर चाप बसवणे व अस्सल उत्पादने उपलब्ध करून देणे या दोन आघाड्यांवर काम आवश्यक आहे.  यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रणे संस्थेने (सीडीएससीओ) सदोष मास्क उत्पादकांवर कारवाई केली पाहिजे, असे रेल्हन म्हणाले. त्यानंतर सीडीएससीओ उत्पादकांना दर्जा मानकांची पूर्तता करण्यास सांगू शकते, असे दर्जा प्रमाणन प्रणालीतील तज्ज्ञ अनिल जौहरी म्हणाले. मात्र, सीडीएससीओ याबद्दल काय कारवाई करणार आहे असा प्रश्न ‘वायर सायन्स’ने भारताचे औषध महानियंत्रक व्ही. जी. सोमाणी यांना विचारला असता, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

अर्थात ‘एन-95’ रेस्पिरेटर्सच्या उत्पादनाचे नियमन केल्याने समस्या सुटणार नाही. आयएसओ मानकांची पूर्तता करण्यासाठी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या चाचण्या करवून घेण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि कोविडपूर्व काळात ‘एन-95’ साठी फारशी मागणीच नसल्याने चाचण्यांच्या सुविधेसाठी फारशी गुंतवणूकच केलेली नाही, असे जौहरी यांनी स्पष्ट केले. छोट्या उत्पादकांना स्वत:च्या प्रयोगशाळा विकसित करणे परवडण्याजोगे नाही. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा बीआयएसनेच पुढाकार घ्यावा, असे आवाहन रेल्हन आणि जौहरी यांनी केले.

दर्जा का महत्त्वाचा?

‘एन-95’  मास्क अनेक प्रकारे अपयशी ठरू शकतो. उदाहरणार्थ, आयएस: ९४७३ आणि तत्सम अमेरिकी मानकांनुसार, ‘एन-95’ ची सूक्ष्मकण फिल्टर करण्याची किमान क्षमता ९५ टक्के हवी; मास्कमधून श्वासोच्छवास नीट सुरू राहिला पाहिजे; मास्क व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती घट्ट बसला पाहिजे, जेणेकरून, न गाळलेली हवा आत जाऊ शकणार नाही; आणि तो अग्निरोधक असावा तसेच तापमानातील चढउतारांत त्याची परिणामकारकता टिकून राहिली पाहिजे. हे सगळे निकष पूर्ण झाले तरच मास्क कोरोनाविषाणूपासून संरक्षण पुरवू शकेल. जगभरात हे निकष पूर्ण करणाऱ्या मास्कनाच प्रमाणित केले जाते. यापैकी अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ही संस्थाच ‘एन-95’  ही संज्ञा वापरते. तेव्हा केवळ एनआयओएसएच प्रमाणित मास्कच ‘एन-95’ असल्याचा दावा करू शकतात. प्रत्यक्षात मात्र एफएफपीटू मास्कनाही ‘एन-95’  असे म्हटले जाते. याशिवाय के‘एन-95’ चीनमधील मानकांची पूर्तता करतात, पीटू ऑस्ट्रेलियातील मानकांची पूर्तता करतात, तर डीटू जपानमधील मानकांची पूर्तता करतात.

भारतात कोविडची साथ आल्यानंतर प्रभावी ‘एन-95’ मास्कची मागणी बघता, बीआयएसखेरीज कोइंबतूरस्थित साउथ इंडियन टेक्स्टाइल रिसर्च एजन्सी (सिट्रा) आणि डीआरडीओचे ग्वाल्हेरमधील आस्थापन या अन्य दोन सरकारी यंत्रणांनी चाचण्या सुरू केल्या. मात्र, त्यांनी केवळ एकदा वन-टाइम चाचणीची सुविधा देऊ केली आणि यातील कोणीही प्रमाणन एजन्सी नाही. शिवाय दोन्ही एजन्सी आयएस: ९४७३च्या केवळ तीन निकषांवर चाचणी करतात- सुक्ष्मकण गाळण कार्यक्षमता, श्वासोच्छवास अनुकूलता आणि ज्वलनरोधन. गळतीसारख्या अनेक निकषांवर येथे तपासणीच होत नाही.  मात्र, सिट्री व डीआरडीओद्वारे तपासले गेलेले मास्क प्रमाणित आहेत, असा दावा आज अनेक भारतीय कंपन्या करत आहेत, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. बेधडक दावे करू नका, असा इशारा डीआरडीओ आणि सिट्राने देऊनही कंपन्या सिट्रा आणि डीआरडीओचे लोगो वापरून त्यांचे मास्क आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या गळ्यात मारत आहेत.

चाचण्या आणि प्रमाणन

एप्रिलमध्ये पंजाब सरकारने प्रथमच मास्कचे उत्पादन करणाऱ्या लुधियानातील शिवा टेक्सफॅब्ज लिमिटेड नावाच्या कंपनीकडून ‘एन-95’  मास्क खरेदी केली.  कोविड चाचण्या करणाऱ्या लुधियाना जिल्हा रुग्णालयात या कंपनीचे मास्क वापरले जात होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपैकी तिघांना कोविडची लागण झाली, तेव्हा सर्वांना खडबडून जाग आली. मात्र, ही कंपनी अजूनही त्यांच्या जाहिरातीत डीआरडीओचा हवाला देऊन मास्क ‘एन-95’ असल्याचा दावा करत आहे. बीआयएसची वेबसाइट बघितली असता असे लक्षात येते की, या कंपनीने केवळ प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि त्यांचा पहिला नमुना चाचणीत अनुत्तीर्ण झाला आहे.  अनेक कंपन्या चाचणी व प्रमाणन यांच्यात गल्लत करत आहेत. मात्र, प्रमाणन ही अधिक उत्क्रांत प्रक्रिया आहे, असे रेल्हन यांनी सांगितले.

उत्पादन प्रक्रियेतील किरकोळ बदलांमुळेही मास्क निरुपयोगी ठरू शकतात, असे अनेक उत्पादकांनी सांगितले. मास्कसाठी येणाऱ्या कापडातही गठ्ठा बदलला की बदल होतो.

एनआयओएसएच आणि बीएसआय अशा दोन्ही एजन्सींनी प्रमाणित केलेल्या मास्कचे उत्पादन करणाऱ्या मॅग्नम मेडिकेअरचे संचालक राकेश भगत म्हणाले की, ‘एन-95’ मास्कच्या शिवणी अल्ट्रासोनिक लहरींद्वारे सील केल्या जातात. या लहरींची वारंवारता कायम राखली नाही, तर वस्त्राला छिद्रे पडू शकतात आणि मास्कची गाळणक्षमता कमी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिशाभूल करणाऱ्या सूचना

एवढा गोंधळ असूनही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप काहीच स्पष्ट केलेले नाही. मार्चमध्ये मंत्रालयाने पीपीई वापराबाबत सूचना जारी केल्या. मात्र, यांमध्ये अनेक कच्चे दुवे आहेत. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘एन-95’ मास्कमध्ये उच्छवास झडपा (एक्झॅलेशन व्हॉल्व) असाव्यात असे नमूद आहे. असे मास्क कोळशाच्या खाणींत वापरले जातात, कारण, या ठिकाणी मास्कच्या आत गेलेली हवा बाहेर टाकणे गरजेचे असते. मात्र, रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना कोविडचे संक्रमण होऊ नये म्हणून घातल्या जाणाऱ्या मास्कमध्ये उच्छवास झडप ठेवणे घातक आहे, असे भट्टाचार्य म्हणाले. अमेरिकेत अशा मास्कना रुग्णालयात प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारच्या सूचनांमुळे एचएलएल लाइफकेअरसारख्या कंपन्यांनी झडपा असलेल्या मास्कसाठी निविदा जारी केल्या आहेत. मास्क बांधण्यासाठीच्या इयर लूप्सबद्दलही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट सांगितलेले नाही. एनआयओएसएच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या मास्कमध्ये इयर लूप्सना परवानगी देत नाही, कारण, ते घट्ट करता येत नाहीत. त्यामुळे केवळ हेड स्ट्रॅप्सना परवानगी दिली जाते. इयर लूप्सवाल्या मास्कमधून ९० टक्के वेळा बाहेरील हवा आत जाते, असे भगत यांनी स्पष्ट केले.

बनावट प्रमाणपत्रे

भट्टाचार्य यांच्या लॅबमध्ये येणाऱ्या अनेक मास्कसाठी घेतलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळले आहे. बेंगळुरूच्या एका कंपनीकडून आलेले ‘इकोपांडा नाइंटीफाइव्ह’ अशा लेबलखाली आलेले दोन मास्क आत्तापर्यंतचे सर्वांत निकृष्ट मास्क होते, असे त्यांनी नमूद केले. यामध्ये शिवणी सील करण्यासाठी अल्ट्रासोनिक लहरी किंवा उष्णतेचा वापर करण्याऐवजी ते केवळ शिवलेले होते. शिवाय ‘एन-95’  मास्कमध्ये साधारणपणे कापडाचे पाच स्तर असतात, तर या मास्कमध्ये केवळ दोन स्तर होते. या कंपनीने सादर केलेली सर्व प्रमाणपत्रे बनावट असल्याचे तपासात दिसून आले आहे.

कुटिरोद्योगात बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला आहे आणि ती ओळखणे रुग्णालयांसाठी कठीण झाले आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

भारतीय दर्जा परिषदेसारख्या संस्थेने त्यांच्या वेबसाइटवरून प्रमाणपत्रे पडताळण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते खूप उपयुक्त ठरेल, अशी सूचना रेल्हन यांनी केली आहे.

यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वापरकर्त्यांमधील जागरूकता वाढवणे. ‘एन-95’  मास्क्स आणि त्याच्या तपशिलांबद्दल अद्याप पूर्णपणे गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करणे गरजेचे आहे, कारण, कोविड रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडलेल्या भारतात पुढील बराच काळ मास्क वापरणे आवश्यक ठरणार आहे.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: