भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’

भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’

नवी दिल्ली/डेहराडूनः कोरोनाच्या विरोधात मजबूत लढा द्यायचा असल्याने हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभ मेळा हा प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरें

‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक
काँग्रेस हरली – बरं झालं!
‘अर्थव्यवस्थेतील समस्या दूर करण्याआधी त्यांची माहिती हवी’

नवी दिल्ली/डेहराडूनः कोरोनाच्या विरोधात मजबूत लढा द्यायचा असल्याने हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभ मेळा हा प्रतीकात्मक ठेवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर केले.

दर १२ वर्षांनी होणार्या हरिद्वार येथील कुंभ मेळ्याला देशभरातून लाखो भाविक आल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. त्यावर देशभर टीका झाली. भाजपचे उत्तराखंडचे सरकार व केंद्रीय स्तरावरील भाजपचे नेते या टीकेतून सुटले नाही. या पार्श्वभूमीवर मोदींनी एक ट्विट करून कुंभ मेळ्याची शाही स्नान झाले आहे, त्यामुळे कोरोनाचे संकट लक्षात घेता हा सोहळा प्रतीकात्मक ठेवावा व कोरोना संकटावर मात देण्याच्या प्रयत्न करावा असे आवाहन केले.

मोदींनी हे आवाहन करताना जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व कुंभ मेळ्यात उपस्थित संत-साधूंच्या प्रकृतीची विचारणा केली. उपस्थित संतसमुदाय प्रशासनाला मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गेल्या सोमवारच्या दुसर्या शाही स्नानात २८ लाख भाविक आले होते. हरिद्वार रेल्वे स्थानक ते हर की पौडी व अन्य नदी घाटांच्या सुमारे १० किमी परिसरात कुठेही थर्मल स्क्रीनिंग नव्हते. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे मास्क न घालणार्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले गेले व त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांकडून झालेली नव्हती.

मुख्यमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य

कुंभ मेळ्यात कोरोना बाधित भाविक सापडल्याने उत्तराखंड सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली होती. गेल्या वर्षी दिल्लीत निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सामील झाल्यानंतर त्यात काही जणांना कोविड-१९ची बाधा झाली होती. त्या वेळी देशभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांना कोरोना संसर्गाला जबाबदार धरले होते. आता कुंभ मेळ्यात जमलेल्या लाखो हिंदू भाविकांनी कोरोनाची नियमावली उधळून लावल्याने भाजप व उत्तराखंड सरकावर टीका सुरू झालीच या टीकेला उत्तर देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हरिद्वारमध्ये सुरू असलेला कुंभ मेळा व गेल्या वर्षी दिल्लीत झालेला निजामुद्दीन मरकजचा कार्यक्रम यांच्यात तुलना करता येणार नाही, असे वक्तव्य मंगळवारी केले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या साप्ताहिक टॉक शोमध्ये ते बोलत होते.

रावत यांच्यावर कुंभमेळ्याला जमलेल्या लाखो भाविकांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यानंतर व एक हजाराहून अधिक भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर देशभरातून टीका होत असताना त्यांनी मरकज व कुंभमेळा यांच्यात तुलना कशी होऊ शकते असा उलटा सवाल केला आहे.

मरकजचा कार्यक्रम एका बंद खोलीत झाला होता. पण कुंभ मेळा हा अत्यंत मोठ्या अवकाशात, विशाल पद्धतीने खुलेपणाने साजरा होत असताना या दोन धार्मिक कार्यक्रमांची तुलना करता येत नाही असे ते म्हणाले होते.

रावत पुढे असेही म्हणाले होते की, कुंभ मेळ्यासाठी परदेशातून नव्हे तर देशातून भाविक आले आहेत पण मरकजमध्ये परदेशातून श्रद्धाळू आले होते. मरकज झाला तेव्हा कोरोना विषयी कुणाला फारशी माहिती नव्हती, मार्गदर्शक तत्वे नव्हती. मरकजसाठी एका खोलीत किती माणसे किती काळ बंद होती, याची माहिती कुणाला नव्हती. आता कोविड-१९ विषयी सर्वांना माहिती आहे, लोकांमध्ये जागरुकपणा आहे व त्याच्यापासून वाचण्यासाठी दिशानिर्देशही दिले आहेत. कुंभ मेळा दर १२ वर्षांनी एकदाच येतो व धार्मिक सोहळा लोकांच्या श्रद्धा व भावनांशी अधिक संबंधित आहे. कोविड-१९ची आव्हाने पाळून हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे रावत म्हणाले होते.

उत्तराखंड सरकार हरिद्वारमध्ये येणार्या सर्व भाविकांच्या कोरोना चाचण्यांचे रिपोर्ट पाहात आहे, भाविकांच्या रँडम चाचण्याही घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याचे सर्व नियम पाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा बचावही रावत यांनी केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0