लेनिन आणि लंडन

लेनिन आणि लंडन

‘द स्पार्क दॅट लिट द रिव्हॉल्युशन’ फार गमतिशीर पुस्तक आहे. लेनिनचा लंडनमधील मुक्काम असा पुस्तकाचा विषय आहे.

मोगलीचे युद्धगीत
पीटर ब्रूकः जगाला महाभारताची ओळख करून देणारा अवलिया
पाकिस्तानचे काश्मीर धोरण कल्पनेच्या नंदनवनातले

‘द स्पार्क दॅट लिट द रिव्हॉल्युशन’ फार गमतिशीर पुस्तक आहे. लेनिनचा लंडनमधील मुक्काम असा पुस्तकाचा विषय आहे.

झारशाहीविरोधात बंड करणाऱ्या क्रांतीकारकांचा नेता लेनिन. झारनं त्याला सैबेरियात विजनवासात हाकललं. विजनवास संपल्यावर लेनिन जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड अशी मजल दर मजल करत लंडनमधे गेला, १९०२ साली. त्यानंतर १९११ पर्यंत लेनिन जगात इतरत्र जात असे आणि पुन्हा लंडनमधे येत असे. एकूण सहा मुक्काम लंडनमधे झाले, निरनिराळ्या घरांत. इक्रा नावाचं एक नियतकालिक चालवणं, पुस्तक लिखाण, जाहिरनामे आणि भाषणांचं लिखाण, मार्क्स आणि एंगल्सच्या तत्वज्ञानाचा अभ्यास, कांट व इतर तत्वज्ञांचा अभ्यास यासाठी लेनिन ब्रिटीश म्युझियमच्या वाचक दालनात बसत असे.

भव्य ब्रिटीश म्युझियममधे एक ओपन शेल्फ जागा होती, तिथून मुक्तपणे पुस्तकं घेता येत असत. त्या कपाटांच्या समोर खुर्च्या आणि टेबलं ठेवलेली असत. लेनिन तिथं मुक्काम करून असे.

लेनिन म्युझियम उघडायच्या आधीच दरवाजापाशी पोचत असे. दिवसभर वाचत असे. लेनिन या वाचनालयावर जाम खुष होता. कोणतंही पुस्तक मागवलं की कर्मचारी  त्वरित ते आणून देत असत. दुपारी जेवण करण्यासाठी लेनिन बाहेर पडे तेव्हां आपले कागद बॅगमधे भरून घेऊन जात असे. पण पुस्तकं मात्र टेबल आणि खुर्चीवर ठेवून जात असे, ती जागा दुसऱ्या कोणी घेऊ नये यासाठी.

जेव्हां वाचत नसे तेव्हा समाजवादी पक्षाच्या सभा, परिषदा, कार्यकर्ते बैठका इत्यादीत लेनिन गुंतलेला असे. हाईडपार्कमधे जाऊन भाषणं ऐकणं त्याला आवडे. इंग्रजी वाचावं लागत असे, लिहावं लागत असे, पण त्या भाषेत त्याचं प्राविण्य नव्हतं. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन लेनिननं एक इंग्रजी जाणकार दिमतीला घेतला.

लेनिन आणि अनेक रशियन क्रांतीकारक लंडनमध्ये आश्रयाला आले होते. रशियन वाचनालयं त्यांनी स्थापन केली होती. लंडनमध्ये वाचनालयं फार म्हणजे फार होती. ही वाचनालयं म्हणजे कार्यकर्ते वगैरेंचे अड्डे असत. लंडनमध्ये एकूणच बौद्धिक उद्योग फार चालत आणि वाचनालयं, ग्रंथालयं ही त्यांची केंद्रं असत.

वाचनालयं कशी असत? मोठ्ठं दालन, दरवाजातून प्रवेश केला की थेट वाचनालय. खुर्च्या टेबलं नसत. भिंतीला लागून रॅक असत आणि त्यावर वर्तमानपत्रं ठेवलेली असत. माणसं गर्दी करून उभ्या उभ्या पेपर वाचत. खच्चून गर्दी असे.

हे १९०२ साल होतं. साऱ्या युरोपभर क्रांतिकारक खटपटी चालल्या होत्या. दुनियाभरचे चळवळे लंडनमध्ये असत. त्यामुळं देशोदेशीचे गुप्तहेर आणि गुप्तपोलीस त्यांच्या आसपास घोंघावत असत. सर्व वाचनालयं आणि ब्रिटीश म्युझियममध्येही पोलीस असत. लेनिन हा क्रांतीकारक असल्यानं त्याच्या भोवती फ्रेंच, ब्रिटीश, रशियन पोलीस घिरट्या घालत असत. आपली ओळख उघड होऊ नये म्हणून जेकब रिश्टर या नावानं लेनिननं वाचनालयाचं सदस्यत्व घेतलं होतं. पण ओळख लपवण्याचा हा उद्योग विनोदीच होता. दुनिया लेनीनला ओळखत होती.

लेनीनची कार्यकर्त्यांना भेटण्याची जागा म्हणा पक्षाचं ऑफिस म्हणा, तेही एक वाचनालयंच असल्यासारखं होतं. दालनभर वर्तमानपत्रं, पत्रकं, पुस्तकं यांचे गठ्ठे रचलेले होते. प्रचंड धूळ असे. दालनभर सिगरेटची थोटकं पसरलेली असत. पुस्तकं, पेपर यांच्यातल्या मजकुरावर बोट ठेवून माणसं तावातावानं बोलत असत.

गंमतीच गंमती.

लेनिन प्रत्येक वेळी नव्या घरात रहात असे. घर साधंच असे कारण लेनिनकडं पैसे नसत.

लेनिन आपल्या घराच्या खिडक्यांचे पडदे बंद करत नसे. असली “भांडवलशाही”  सवय त्याला नव्हती, त्याचा सारा उघड मामला. त्यामुळं त्याची घरमालकीण त्याच्यावर रागवत असे, त्याला हाकलण्याच्या प्रयत्नात असे.

लेनिनची पत्नी क्रपस्काया लग्नाची खूण मानली जाणारी अंगठी बोटात घालत नसे. समाजवादी संस्कार. घर मालकिणीला त्याचा राग असे, तिचं खरोखरच लग्न झालंय की नाही की, ती अशीच लेनिन या माणसाबरोबर रहातेय असा नैतिकतेचा प्रश्न तिला पडत असे. लेनिनबरोबर लग्न झाल्याचं सर्टिफिकेट वगैरे दाखवल्यावरच तिनं क्रपस्कायाला परवानगी दिली.

मॅक्झीम गॉर्की हा सुप्रसिद्ध लेखक लेनिनचा जानी दोस्त. तो लंडनमधे मुक्कामाला असला की दिवसभर लेनिनबरोबर असे. लेनिनपेक्षा गॉर्कीच जास्त लोकप्रीय होता. ते दोघं ज्या खाणावळीत बसत त्या खाणावळीच्या मालकानं गॉर्कीच्या तिथं असण्याचा उपयोग करून खाणावळीची गिऱ्हाईकं वाढवायचं ठरवलं, गॉर्कीचं पेंटिंग भिंतीवर लावायचं ठरवलं. लेनिन रागावला. मार्केटिंग वगैरे भांडवलशाही वागण्याला त्यानं कडाडून विरोध केला.

गंमत कशी पहा. २००० साली लंडनच्या रिजेंट चौकातली एक इमारत मालकानं लिलावात काढली. जुनाट इमारतीची बोली लावली ६.३ लाख पाऊंडाची. कां तर त्या इमारतीत १९०३ साली लेनिन रहात होता. या भांडवलशाही वागण्याला विरोध करायला लेनिन जिवंत नव्हता.

लेखक रॉबर्ट हेंडर्सन ब्रिटीश म्युझियममधे अनेक वर्ष रशियन विभागाचे क्युरेटर होते. जवळपास ३० वर्षं त्यांनी कसून संशोधन करून लेनिनबद्दलचे सर्व संदर्भ गोळा करून हे पुस्तक लिहिलं.

म्युझियमधे वाचायला जाण्यासाठी सदस्यत्व घ्यावं लागत असे. स्थानिक माणसाचं ओळखपत्र-शिफारसपत्र लागत असे. हेंडर्सन यांनी ती सारी शिफारसपत्रं शोधली. अनेक शिफारशी म्युझियमनं नाकारल्या होत्या. एक शिफारसपत्र नाकारलं कारण  त्यावर ” हा माणूस म्युझियमचा योग्य वापर करेल याची हमी देतो ” असं वाक्य लिहिलं नव्हतं.

कशी गंमत असते पहा.

हेंडर्सननी पुस्तकात लिहिलं की लेनीन एल१३ या खुर्चीवर बसत असत. फिझपॅट्रिक या संशोधक बाईनी खुर्चीच्या नेमकेपणाबद्दल संशय व्यक्त करणारं पत्र लंडन रिव्ह्यूला लिहिलं. हे पत्र Ingolfer Gislason या आईसलँड विश्वशाळेतल्या एका माणसानं वाचलं. त्यानं जोन स्टीफन्सन या माणसानं १९४९ साली लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला. लेनिन एल१३ वर बसत आणि जोन स्टीफन्सन लेनीनच्या शेजारच्या एल१४ या खुर्चीवर बसत.

पत्रलेखकानं आणखी एक तपशील दिला.  एकदा लेनिन दुपारच्या जेवणासाठी निघाले असताना त्यांचा कागद जमिनीवर पडला, जोननी तो त्यांना उचलून दिला. लेनिन थँक यू म्हणाले. जोननी लिहिलं होतं की त्यांचा थँक्सचा उच्चार जर्मन धाटणीचा होता.

तपशीलाचा अचूकपणा टिकवण्यासाठी किती खटपट चालते पहा.

२९० पानांच्या पुस्तकात लेनीन आणि मैत्रिण याबुकोवा यांच्या संबंधांचे बरेच उल्लेख आहेत. क्रपस्कायाशी लग्न होण्याआधी लेनीन याबुकोवाच्या प्रेमात होते, त्यांची लग्नाची विनंती याबुकोवानी अव्हेरली होती. याबुकोवा, तिचा पती, लेनीनची पत्नी क्रपस्काया हे सारे क्रांतीकार्यातले सहकारी होते. लेनीनच्या मागेपुढं याबुकोवाही लंडनमधे होती, त्यांच्या भरपूर गाठीभेटी होत, लेनीनच्या पत्नीला ते आवडत नसे.

लेनीनचे अभ्यासक म्हणतात की लेनीनच्या या प्रेमसंबंधांबाबत फारसं लिहिलं गेलेलं नाहीये, या पुस्तकात ते प्रथमच आलेलं आहे. पण पुस्तकाचं मुख्य सूत्र लेनिनचा लंडनमधला मुक्काम आणि तिथला वावर हे आहे आणि त्यात याबुकोवाचे उल्लेख हा एक लहानसा अंश आहे, हे पुस्तक म्हणजे सनसनाटी प्रेमप्रकरण आहे अशी समजूत करायला जागा नाही अशाच रीतीनं तो मजकूर पुस्तकात आला आहे.

लेनीन ट्रेन

पुस्तकात लेनीन ट्रेन असा उल्लेख आहे. क्रांतीच्या काही दिवस आधी लेनिन स्वित्झर्लंडमधून एका ट्रेननं निघाला आणि रशियात पोचला. लेनीननं ट्रेनच्या बाहेर पडू नये, आपल्या देशात त्यानं क्रांतीबिंतीची आग लावू नये म्हणून ती ट्रेन सील केली होती, सील्ड ट्रेन असंच त्या ट्रेनचं नाव पडलं. परिणामी लेनीन आणि ट्रेनमधले सहकारी यांची फार आबाळही झाली. लेनिन रशियात पोचला आणि क्रांती झाली.

लेनिन ट्रेन या नावाची एक फिल्मही यू ट्यूबवर पहायला मिळते. १९८८ साली केलेली ही ब्लॅक अँड व्हाईट फिल्म पहाताना चॅप्लीनच्या फिल्मची आठवण होते. त्यात लेनिनचं काम केलं होतं बेन किंग्जले यानं. १९८२ साली बेन किंग्जलेनं अटेनबरोच्या फिल्ममधे गांधी केला होता.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

The Spark That Lit the Revolution
Lenin in London and the Politics that Changed the World
Robert Henderson
Bloomsbury Publishing


COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0