गेल्या वर्षी ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation - WHO) कोविड-१९ ही पृथ्वीवर पसरलेली महासाथ असल्याची घोषणा केली होती. कोविड-१
गेल्या वर्षी ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) कोविड-१९ ही पृथ्वीवर पसरलेली महासाथ असल्याची घोषणा केली होती. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग जगभर वेगाने पसरत असल्याने ही बाब चिंताजनक असून धोक्याची सूचना आम्ही देत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत होते. संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस ऍधनॉम घेब्रेयेसूस यांनी कोविड-१९ ही महासाथ असल्याचे घोषित केले होते. त्यावेळी आरोग्य संघटनेने ही महासाथ ११४ देशात पसरली असून त्याचे १ लाख १८ हजार रुग्ण असल्याची माहिती दिली होती. हे प्रमाण वाढत जाणार असल्याने सर्व देशांच्या आरोग्य व्यवस्थेने त्वरित कोरोना प्रतिबंधित उपाय योजना हाती घ्याव्यात असेही जागतिक आरोग्य संघटनेने सूचवले होते. टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी तर कोविड-१९ महासाथ हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा हल्ला नसून तो अर्थव्यवस्थेतल्या सर्व क्षेत्रांवरचा हल्ला असल्याचे सांगितले होते.
आता कोविड-१९ला महासाथ घोषित केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि ही महासाथ पूर्णपणे नियंत्रणात कोणत्याच देशाला आणता आलेली नाही. टेड्रोस घेब्रेयेसूस यांचे वर्षभरापूर्वीचे भाकीत खरे ठरले आहे. आज एक वर्षानंतर कोविड-१९चे जगभरातली एकूण रुग्णांची संख्या ११ कोटी ८० लाखाहून अधिक झाली असून कोरोना विषाणूमुळे सुमारे २० लाख ६० हजार मृत्यू झाले आहेत. कोविड-१९वर मात करणार्या काही लसी बाजारात आल्या आहेत, अनेक देशांमध्ये कोविड-१९ लसीकरण मोहिमा सुरू झाल्या आहेत. पण कोविड-१९वर निर्णायक मात करता आलेली नाही. कोविड-१९चे विषाणूंमध्ये नवे प्रकार या संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीत तयार झाले आहेत, त्यांना रोखण्याचे प्रयत्न वैद्यकीय क्षेत्राकडून सुरू आहेत. आता सापडत असलेले कोविड-१९चे विषाणू मानवी शरीराला पूर्वीपेक्षा कमी हानी पोहोचवणारे असले तरी त्यांचा धोका पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही.
अमेरिकेच्या आरोग्य खात्यानेही कोरोना संसर्गाची संख्या कमी वाटत असली तरी त्याचा धोका टळलेला नाही, असे सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार आठवड्याची सरासरी पाहता कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ४ लाख १६ हजार इतकी वाढली असून हा ११ फेब्रुवारीनंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. कोरोनाचे आकडे कमी येत नसल्यामुळे अनेक देश लॉकडाऊन पुकारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही देशांमध्ये मानवी वावरांवर निर्बंधही घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा ‘B.1.1.7’ हा नवा विषाणू हा काळजी करण्यासारखा असून हा या विषाणू इतक्या वेगाने वाढत आहे की, तो सार्स कोविड-२ पेक्षाही भयानक असल्याची भीती व्यक्त केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS