उ. प्रदेशात ग्रामीण भागात कोविडचा उद्रेक

उ. प्रदेशात ग्रामीण भागात कोविडचा उद्रेक

गोरखपूर: कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेने उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात उग्र स्वरूप धारण केले आहे. ताप, खोकला व श्वसनातील समस्यांमुळे अनेकांचे मृत्यू हो

‘पैसे द्या अन्यथा १५ हजार गायी रस्त्यावर सोडू’
उ. प्रदेशात निवडणुका ८० विरुद्ध २० होतील : आदित्य नाथ
आझादीचे नारे दिसल्यास देशद्रोहाचा गुन्हा – आदित्यनाथांची धमकी

गोरखपूर: कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेने उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात उग्र स्वरूप धारण केले आहे. ताप, खोकला व श्वसनातील समस्यांमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. मात्र, या रुग्णांची कोविड चाचणीच न झाल्याने त्यांच्या मृत्यूंची नोंद कोविड मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीत केली जाऊ शकत नाही. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून गावांमध्ये जसे प्रचंड संख्येने मृत्यू होत आहेत, तसे आपल्या आयुष्यात कधीही बघितले नाहीत, असे वयस्कर लोक सांगत आहेत.

गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांमधील गावांत एकाच कुटुंबातील तीन-तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्धांपासून अगदी तरुण व्यक्तींचाही समावेश आहे. अनेक गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक थांबावा म्हणून सामूहिक पूजापठणे सुरू झाली आहेत.

गोरखपूरच्या सरदारनगर गटातील एका १३,००० लोकवस्तीच्या गावांत १५ दिवसांत २० जणांचा मृत्यू झाल्याचे यादव गौनर यांनी सांगितले. यातील बहुतेकांचे मृत्यू ताप, खोकला व श्वसनविकारांनी झाले आहेत, असे ते म्हणाले.

सरदारनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने या मृत्यूंची माहिती प्रशासनाला दिली आहे आणि गावांमध्ये निर्जंतुकीकरणाची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप काहीही झालेले नाही, असे गौनर यांनी सांगितले.

रोशन प्रताप सिंह या आणखी एका गावकऱ्याच्या मते, लोक भीतीमुळे कोविड चाचणी करवून घेत नाही आहेत. ही चाचणी पॉझिटिव आली तर रुग्णालयात दाखल केले जाईल आणि  रुग्णालयातून कोणी जिवंत बाहेर येत नाही असा समज गावकऱ्यांचा आहे. त्यामुळे लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपचार करत आहेत किंवा भोंदूंकडे जात आहेत.

ग्रामीण भागात अद्याप कोणीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आदी नियमांचे पालन करत नाही, असेही सिंह यांनी सांगितले. पोलिसांना याची माहिती दिली असता, त्यांच्याकडूनही काहीच प्रतिसाद मिळत नाही, असे ते म्हणाले.

‘द वायर’ने आरोग्यसेवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सरदारपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. हरिओम पांडेय यांनी फोनच उचलला नाही, तर ब्रह्मपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख डॉ. इश्वर लाल स्वत:च कोविड संक्रमित आहेत व सध्या घरीच विलगीकरणात आहेत, असे समजले.

बैदा नावाच्या एका गावात आठवडाभरात १० जणांचा मृत्यू झाला पण कोणाचीही कोविड चाचणीच झाली नव्हती, असे समूह आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कुमार यादव यांनी सांगितले. मात्र, आता लोक चाचणीसाठी येऊ लागले आहेत आणि लॉकडाउन लागू केल्यामुळे कोविडचा प्रसारही आटोक्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

एकंदर उत्तर प्रदेशातील कोविडच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात करोना संसर्ग व मृत्यू होत आहेत. स्मशाने व दफनभूमींवर येणाऱ्या मृतदेहांच्या संख्येत चार ते पाच पटींनी वाढ झाली आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे.

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधीक स्वरूपाचे. )

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0