आयुष सिक्स्टीफोर परिणामकारक नाही

आयुष सिक्स्टीफोर परिणामकारक नाही

बेंगळुरू: सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-१९ आजारावरील प्रभावी उपचार म्हणून केंद्र सरकार वारंवार ज्या आयुष सिक्स्टीफोर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनचा पुरस्कार करत होते, ते औषध कोविडवर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे एका नवीन अभ्यासातून पुढे आले आहे. मेडआरक्सिव रेपोझिटरीचा प्रसिद्धीपूर्व दस्तावेज म्हणून या अभ्यासाचा अहवाल १७ ऑगस्ट, २०२१ रोजी अपलोड करण्यात आला.

आयुष मंत्रालय भारतातील ‘पर्यायी’ उपचार पद्धतींच्या नियमनावर आणि प्रसारावर देखरेख ठेवण्याचे काम करते. या पर्यायी उपचार पद्धतींमध्ये आयुर्वेद व होमिओपॅथी यांचाही समावेश होतो. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेसने (सीसीआरएएस) विकसित केलेला आयुष सिक्स्टीफोर हे पोली-हर्बल फॉर्म्युलेशन लक्षणे नसलेल्या, सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-१९ प्रादुर्भावांवर, नियमित काळजीच्या (स्टॅण्डर्ड केअर) स्वरूपात, उपचार करू शकते, असे आयुष मंत्रालयाने २९ एप्रिल, २०२१ मध्ये जाहीर केले होते. यामध्ये ‘स्टॅण्डर्ड केअर’ याचा अर्थ डॉक्टर पूर्वीपासून या आजारासाठी देत असलेले ‘सर्वोत्तम उपलब्ध उपचार’ होय. कोविड-१९ आजार सौम्य स्वरूपात झाल्यास, आरोग्य मंत्रालयाने फिजिकल डिस्टन्सिंग, इनडोअर मास्किंग, हाताची स्वच्छता व औषधे यांच्या मदतीने लक्षणांचे व्यवस्थापन करण्याची सूचना दिली होती (२४ मे, २०२१).

त्याच बरोबर सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-१९चे रोगनिदान होणे म्हणजे आजारातून बरे होण्यासारखेच असल्याने आयुषसारख्या संलग्न उपचारांचा उपयोग नियमित उपचारांच्या पलीकडे जातो आहे का, हे सिद्ध होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे यात रुग्णाच्या रोगप्रतिकारक्षमतेचाही मुद्दा महत्त्वाचा असतो.

कोविड-१९सारख्या विषाणूजन्य आजारामध्ये अतिरिक्त उपचारांमुळे सुक्ष्म विषाणू अधिक वेगाने नष्ट होऊ शकतात का, यामुळे लक्षणे (ताप  आणि श्वसनाच्या समस्या) नाहीशी किंवा कमी होतात का, अन्य उपचार अधिक गुणकारी ठरतात का, यांवर संशोधक काम करतात.

आयुष सिक्स्टीफोर या सगळ्या दृष्टींनी गुणकारी आहेत हे ‘विस्तृत क्लिनिकल ट्रायल्स’मध्ये दिसून आले आहे, असे आयुष मंत्रालयाने जाहीर केले होते. मंत्रालयाच्या अधिकृत कोविड-१९ उपचार प्रोटोकॉलमध्येही या औषधाचा समावेश करण्यात आला होता.

मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी आपल्या नवीन अभ्यासांती असे जाहीर केले की, आयुष सिक्स्टीफोर कोविड-१९ रुग्णांवर परिणामकारक आहे असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. या संशोधकांनी कोविड-१९ची सौम्य लक्षणे असलेल्या ६० जणांची निवड केली (अहवालानुसार “अर्ली इन्फेक्शन” रुग्ण), त्यातील ३० जणांना हे औषध दिले आणि ३० जणांना दिले नाही. पाच दिवसांनंतर या सर्वांच्या चाचण्या करून त्यातील किती कोविड निगेटिव होते हे तपासण्यात आले. नियंत्रित गटातील (केवळ नियमित उपचारांवर असलेले) रुग्णांपैकी १६ जणांचा रिपोर्ट निगेटिव आला, तर उपचार गटातील (नियमित  उपचार व आयुष सिक्स्टीफोर दिलेले) रुग्णांपैकी २१ जणांचा रिपोर्ट निगेटिव आला. संख्याशास्त्राच्या दृष्टीने हा फरक नाममात्र असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला. मात्र, संशोधकांनी रॅण्डम पद्धतीने ट्रायल घेतली असता, त्यांना दोन मुद्दे आढळले. त्यामुळे निष्कर्षांची खात्रीशीरता आणखी कमी झाली.

पहिला मुद्दा म्हणजे नमुन्याचे आकारमान छोटे- केवळ ६० रुग्ण- होते. मात्र अधिक रुग्णांचा समावेश “सोयीस्कर” नसल्याने छोटा नमुना तपासण्यात आला असे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे. या चाचण्या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे ही ओपन लेबल ट्रायल होती. म्हणजेच कोणत्या रुग्णांना नियमित उपचार मिळत आहे आणि कोणत्या रुग्णांना नियमित उपचारांसह आयुष सिक्स्टीफोर दिले जात आहे हे संशोधकांना माहीत होते. क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहसा संशोधक नमुनागटाला कोणतीच माहिती देत नाहीत. म्हणजे कोणाला काय दिले जात आहे हे संशोधक व सहभागी रुग्ण कोणालाच माहीत नसते. यामुळे सर्व प्रकारचे पूर्वग्रह दूर ठेवले जातात.

एम्स जोधपूर पथकाने हे दोन्ही मुद्दे त्यांच्या अहवालात मान्य केले आहेत आणि अधिक मोठ्या नमुन्यासह डबल-ब्लाइंड ट्रायल घेऊन आयुष सिक्स्टीफोरची परिणामकारकता निश्चित करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आयुष सिक्स्टीफोर (दिवसातून दोनदा ५०० मिलीग्रॅम क्षमतेच्या दोन गोळ्या) घेण्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, सध्याच्या अहवालातील निष्कर्षावरून असे दिसत आहे की, भारत सरकारने धरलेला आयुष सिक्स्टीफोरच्या प्रशासनाचा आग्रह अनाठायी आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेमध्ये आल्यानंतर लगेचच आयुष विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून सरकार आयुर्वेदाचा प्राचीन हिंदू ज्ञानशाखा म्हणून पुरस्कार करत आहे आणि आयुर्वेद “पाश्चिमात्य औषधांना” उत्तम पर्याय आहे असे हिरीरीने सांगत आहे.  मात्र, या पर्यायी उपचारपद्धतींमध्ये मानकांचा अभाव नेहमीच दिसून आला आहे. ‘द वायर सायन्स’ने मे २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखातही यावर प्रकाश टाकण्यात आला होता.

“दुसरा मुद्दा म्हणजे हर्बल मिश्रणांमध्ये अचूक मानकांचा वापर अनेकदा केला जात नाही. जर एखाद्या औषधातील घटकपदार्थ व तो तयार करण्याची पद्धत अभिजात ग्रंथांत दिल्याप्रमाणे असेल तरच त्या मिश्रणाला ‘आयुर्वेदिक औषध’ असे संबोधण्याची परवानगी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) देते. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मध्ये अशा ५४ संस्कृत ग्रंथांची यादी दिलेली आहे. मात्र, या सर्व ग्रंथांचे एकच व्हर्जन आहे हे कायद्यात गृहीत धरलेले आहे.”

अशा परिस्थितीत मिश्रणे तयार करण्याच्या पद्धतींचे अनेक अन्वयार्थ लावले गेले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. देखरेखीच्या अभावामुळे अनागोंदीत आणखी भर पडते.

एप्रिल २०२० मध्येच आयुष मंत्रालयाने आयुष सिक्स्टीफोर तसेच अन्य आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्सच्या क्लिनिकल ट्रायल्सना निधी पुरवण्यासाठी ‘कृतीदल’ स्थापन केले आहे. मात्र, यासाठीच्या प्रस्तावांमध्ये अनेक समस्या आहेत.

पर्यायी उपचारपद्धतींचा उत्तेजन देण्याच्या सरकारच्या धोरणाला इंडियन मेडिकल असोसिएशनने अलीकडेच तीव्र विरोध केला आहे. आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांना छोट्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय त्यापैकीच एक आहे.

मूळ लेख: 

COMMENTS