मार्क्सवादी परंपरेतील साक्षेपी इतिहासकार

मार्क्सवादी परंपरेतील साक्षेपी इतिहासकार

भारतीय इतिहास लेखन परंपरेत स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या व तत्वनिष्ठ मोजक्या इतिहासकारांपैकी डी. एन. झा एक होते.

भारतात ब्रिटिश सत्ता स्थापनेनंतर आधुनिक इतिहास लेखन परंपरेची सुरुवात झाली. वसाहतवादास व वसाहतवादी धोरणांना पूरक वैचारिक आधार द्यायचा प्रयत्न या सुरवातीच्या इतिहास लेखन परंपरेने केला होता. भारताचे मागासलेपण अधोरेखित करून भारतासाठी ब्रिटिश सत्ता कशी उपकारक आहे असा साधारणपणे या लेखनाचा सुरू होता. अशा प्रकारचे लेखन करणारे बरेचसे इतिहासकार ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी, कर्मचारी होते आणि हा काही निव्वळ योगायोग नव्हता. भारतातील साम्राज्यवादी इतिहास लेखन परंपरेची ही सुरवात होती.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात भारतात इंग्रजी व आधुनिक शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. भारतात आधुनिक शिक्षण देण्यासाठी विद्यापीठांची स्थापना झाली. नवशिक्षित भारतीय पिढीने मग साम्राज्यवादी इतिहास लेखन परंपरेला उत्तर द्यायचा प्रयत्न सुरू केला. इतिहास लेखन करताना या राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवाहात प्राचीन भारताच्या गौरवास्पद, सुवर्ण युगाची, भारताच्या इतिहासातला वैभवशाली कालखंड अशी मांडणी एकीकडे केली जात होती तर मध्ययुगीन कालखंडाला अंध:कार युग मानले जात होते. एका बाजूला साम्राज्यवादी इतिहास लेखनातील मर्यादा दाखवून देत असतानाच राष्ट्रवादी इतिहास लेखनाने साम्राज्यवादी इतिहास लेखनातून आलेली धार्मिक आधारावर भारताच्या ऐतिहासिक कालखंडाची विभाजन करण्याची कालविभागणी पण स्वीकारली होती.

साम्राज्यवादी अथवा राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा असो दोन्हीत भेद असले तरी दोन्ही परंपरात काही समान बाबी पण होत्या, इतिहास लेखनात राजकीय घडामोडी, युद्ध, संघर्ष यांना महत्त्व हे दोन्ही प्रवाह देत होते, सोबतच १९ व्या २० व्या शतकातील सुरवातीच्या काळातील प्रेरणा, विचार भूतकाळावर थोपवायचा प्रयत्न करत होते. त्यामुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात उदयाला येणारा राष्ट्रवाद, धर्मांधतेचा होत असलेला उदय यांच्या प्रभावापासून हे इतिहास लेखन अलिप्त राहिले नव्हते पण लवकरच हे चित्र बदलू लागले.

युरोपमध्ये प्रबोधन परंपरेनंतर उदयाला आलेला मार्क्सवादी विचार जसा कामगार चळवळ, राजकीय विचार, संस्था यांना प्रभावित करून गेला तसाच तो सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धतीला पण प्रभावित करून गेला. भारतातले इतिहास लेखन, प्रामुख्याने २०व्या शतकाच्या सुरुवातीला मार्क्सवादी संशोधन, विश्लेषण पद्धतीने प्रभावित झाले. राजकीय जीवनासोबतच गतकाळातील आर्थिक, सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास या प्रवाहाने महत्त्वाचा मानला. ऐतिहासिक बदलामागील आर्थिक/भौतिक प्रेरणा महत्त्वपूर्ण मानून भूतकाळाची चिकित्सा करण्याचा नवीन दृष्टीकोन या प्रवाहाने दिला. मोहम्मद हबीब, इरफान हबीब, रोमिला थापर, आर. एस. शर्मा, सतीश चंद्रा, बिपिन चंद्रा, सुमित सरकार या जेष्ठ इतिहासकारांच्या परंपरेतले स्वातंत्र्योत्तर काळातले एक महत्त्वाचे इतिहासकार म्हणजे द्विजेंद्र नारायण झा (D. N. Jha) (१९४०-२०२१) होत.

डी. एन. झा यांनी इतिहास विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण त कोलकत्ता व पटणा येथे पूर्ण केले होते. नंतर दिल्ली विद्यापीठात इतिहास विषयाचे अध्यापन, संशोधन करत असताना ते भारतीय इतिहास परिषदेचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. भारतीय इतिहासातील प्राचीन व प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड हे त्यांच्या आवडीचे, संशोधनाचे विषय होते. प्राचीन भारताची रूपरेखा (१९७७) प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास, The myth of holy cow(२००२) प्रारंभिक मध्ययुगीन काळातील सामंतशाही व्यवस्था, इ. त्यांचे महत्वपूर्ण लेखन आहे. १९८०नंतर प्रामुख्याने राम जन्मभूमी प्रश्न संवेदनशील राजकीय मुद्दा बनल्यानंतर भारतीय इतिहासकारांनी “राम जन्मभूमी बाबरी मस्जिद राष्ट्रासाठी इतिहासकारांचा अहवाल” प्रकाशित केला गेला. ज्यामध्ये डीएन झा यांचा लेखन संशोधन सहभाग होता.

प्राचीन भारताचे आपले आकलना वरती उल्लेख केल्याप्रमाणे साम्राज्यवादी, राष्ट्रवादी इतिहास लेखन परंपरांनी ही प्रभावित झाले होते व आज ही तो प्रभाव समाजमानावर आहे. ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहास लेखनाला उत्तर म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन परंपरेने प्राचीन कालखंडाच्या प्रामुख्याने गुप्त कालखंडाचा उल्लेख ‘मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सर्वोच्च विकासाचा टप्पा गाठलेला काळ– ‘सुवर्णयुग’ असा केला. आधुनिक लोकशाही व्यवस्था, मूल्ये यांचा शोध प्राचीन गणराज्यात घेतला गेला. डी. एन. झा यांनी त्यांच्या लेखनातून अशा मांडणीला नकार दिला. साम्राज्यवादी अथवा राष्ट्रवादी दृष्टिकोन बाजूला सारून इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणून ते प्राचीन कालखंडाचा विचार करतात. पण सुवर्णयुग संकल्पनांना नाकारताना तत्कालीन सामाजिक जीवनातील शोषणाधारित वर्ण, जातीव्यवस्था, सती प्रथा, दृढ होत जाणारी अस्पृश्यता, राजकीय जीवनात सत्तेचे झालेले विकेंद्रीकरण अधोरेखित करतात. प्राचीन गणराज्य व्यवस्थेतील असमानता, सत्तेचे ठराविक समुहाच्या हाती झालेले केंद्रीकरण व स्त्रियांना गणराज्य व्यवस्थेत नसलेले स्थान नोंदवून गणराज्य व्यवस्थेतील मर्यादा त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला. एका बाजूला साम्राज्यवादी राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या मर्यादांवर बोट ठेवताना त्यांनी प्राचीन कालखंडाचे आकलन वर्तमानातील राजकीय गरजापोटी होणार नाही वर्तमान काळातील विचार, भूतकाळावर थोपवता कामा नयेत असा आग्रह पण त्यांनी धरला होता

डी. एन. झा यांचे सर्वात महत्त्वाचे आणि तेवढेच वादग्रस्त लेखन ठरले. ‘The myth of holy cow’ या २००२ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखनावर बंदी घातली गेली होती. प्राचीन कालखंडातील विविध साहित्यविषयक साधनांचे सूक्ष्म वाचन व अभ्यास यातून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. प्राचीन कालखंडात गोमांस भक्षण रूढ होते त्याचे कित्येक दाखले या लेखनात त्यांनी दिले आहेत. “गाईचे पावित्र्य” या आधारे त्यातून समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवणे, विशिष्ट समूहांना त्यांच्या खाद्य परंपरेच्या आधारावर वेगळे ठरवून सामाजिक दरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला जातो त्याला वैचारिक विरोध करत असतानाच गोवंशाच्या पावित्र्याबद्दलच्या मांडणीतील ऐतिहासिक फोलपणा पुराव्यांच्या आधारावर या लेखनात त्यांनी दाखवून दिला आहे व प्राचीन कालखंडात उच्चवर्णीय समूहात गोमांस भक्षण परंपरा होती हे दाखवत असतानाच संवेदनशीलपणे इतिहास अभ्यासाच्या शिस्तीतून एक ठाम वैचारिक भूमिका पण त्यांनी समोर मांडली. ‘राम जन्मभूमी बाबरी मशीद’ वादासंदर्भात पण ‘मंदिराला इजा पोहोचवून मशिदीचे बांधकाम झालेले नाही’ असा विचार त्यांनी अन्य सहकार्‍यांसोबत लिहिलेल्या या प्रश्ना संदर्भातील अहवालात मांडला होता. त्यांची ही मांडणी पण बरीच वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर त्यासाठी प्रचंड टीका पण केली गेली होती.

या संदर्भात ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर यांचे इतिहास लेखनाला संबंधीचे विधान लक्षात राहणारे आहे. ‘The reading and interpretation of the past requires a trained understanding of the resources and a sensitivity to understand what has been written..”

इतिहास विषयाच्या अभ्यासकांना डी. एन. झा यांचे इतिहास लेखन अभ्यासल्यावर वरील विधानाचा निश्चितपणे प्रत्यय येतो. भारतीय इतिहास लेखन परंपरेत स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या व तत्वनिष्ठ मोजक्या इतिहासकारांपैकी डी. एन. झा एक होते.

आज प्रचंड वेगाने माहितीची देवाण-घेवाण होत आहे, समाजावर, वाचकांवर खर्या खोट्या माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. इतिहास संशोधन, इतिहास लेखन या बदलांपासून दूर राहिलेले नाही. आपल्या राजकीय विचारसरणीला अनुकूल निवडक ऐतिहासिक घटना, इतिहासातील मोजकेच कालखंड निवडून सत्ताधारी गटाला सहाय्यक ऐतिहासिक मांडणी केली जात आहे. सामान्य माहितीला, ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करून, इतिहास अभ्यास, लेखनाची कोणतीही शिस्त न स्वीकारता केल्या गेलेल्या लेखनाला पण इतिहास मानलं जात आहे. अशा काळात आपले सखोल संशोधन व तत्वनिष्ठ भूमिका यासाठी ओळखले जाणारे इतिहासकार डी. एन. झा यांचे झालेले निधन (४ फेब्रुवारी २०२१) भारतीय इतिहास लेखन परंपरेसाठी, इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकांसाठी अत्यंत दुःखद बाब आहे…!!

COMMENTS