कोईमतूर : तामिळनाडूमधील कोईमतूरनजीक नादुर गावातल्या दलित समाजातील सुमारे ३००० नागरिक टप्प्याटप्याने येत्या पाच जानेवारीपासून हिंदू उच्चवर्णियांकडून सामाजिक भेदभाव केला जात असल्याच्या निषेधार्थ इस्लाममध्ये धर्मांतर करणार आहेत. या गावांत २ डिसेंबरला दलितांच्या वस्तीवर एक भिंत कोसळून १७ दलित ठार झाले होते. ही भिंत शिव सुब्रह्मण्यम या व्यक्तीने दलित वस्तीला लागून उभी केली होती पण या भिंतीला काही आधार नसल्याने ती २ डिसेंबरला दलित वस्तीवर कोसळली होती, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.
‘ही भिंत स्वत:चे घर दलितांच्या घरांपेक्षा वेगळे असावे, या उद्देशाने शिव सुब्रह्मण्यम यांनी बांधली होती आणि या विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. आम्ही एससी-एसटी कायद्यान्वये शिव सुब्रह्मण्यमचा विरोधात गुन्हाही दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला नाही. प्रशासनाने अशी भेदभावाची वागणूक दिल्याच्या निषेधार्थ हे धर्मांतर केले जात असल्याचे नादूर गावातील पुलिगल काची (टीपीके) या दलित संघटनेचे महासचिव एम. इलावेनिल यांनी सांगितले. धर्मांतर करणारे बहुसंख्य पुलिगल काची (टीपीके) या संघटनेशी जोडले गेले आहेत.
‘आमच्या मागणीकडे पोलिस यंत्रणा जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून या दुर्घटनेसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आमच्या संघटनेचे अध्यक्ष नगाई थिरुवल्लुवन यांनाच पोलिसांनी अटक केली. पोलिसही आमच्यावर भेदभाव करत आहेत, असा आरोप एम. इलावेनिल यांनी केला.
येत्या ५ जानेवारी रोजी मुस्लिम धर्मामध्ये पहिले १०० नागरिक व नंतर अन्य भागातून सुमारे ३००० दलित मुस्लिम धर्मात जाणार असल्याचे इलावेनिल यांनी सांगितले.
मुस्लिम धर्मात जातव्यवस्था नसल्याने व अनेक वर्षाच्या संघर्षात याच धर्माने आम्हाला साथ दिली आहे. या धर्माचे लोक आमच्याशी बरोबरीचा सामाजिक व्यवहार करतात, त्यांच्या संस्कृतीशी आमची ओळख असल्याने आम्ही मुस्लिम व्हायचा पर्याय निवडल्याचे इलावेनिल यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणात शिव सुब्रह्मण्यम याला अटक केली होती पण त्यांची २० दिवसांनंतर जामीनावर सुटका झाली होती.
मूळ बातमी
COMMENTS