दारयाच्या निमित्ताने पुतींना इशारा

दारयाच्या निमित्ताने पुतींना इशारा

दारया दुगिना (२९) एका उत्सवातून परतत असताना क्रेमलिनमधे त्यांच्या कारमधे स्फोट झाला. त्या जागच्या जागी चिंधड्या होऊन मेल्या. स्फोट एव्हढा मोठा होता की

सोशल मीडियावर कडक निर्बंधांची संसदीय समितीची शिफारस
आजची गुरू-शनिची युती चुकवू नका
महाविकास आघाडीचे ५, तर भाजपचे ५ उमेदवार विजयी

दारया दुगिना (२९) एका उत्सवातून परतत असताना क्रेमलिनमधे त्यांच्या कारमधे स्फोट झाला. त्या जागच्या जागी चिंधड्या होऊन मेल्या. स्फोट एव्हढा मोठा होता की रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारती हादरल्या, खिडक्यांची तावदानं फुटली.

अंदाज असा आहे की त्यांचे वडील अलेक्झांडर दुगिन हे स्फोट करणाऱ्यांचं लक्ष्य होते. उत्सवाला वडील व मुलगी दोघी एकत्र हजर होत्या आणि अलेक्झांडर यांच्याच कारनं दोघं परतणार होते. काही कारणानं अलेक्झांडर उत्सवाच्या ठिकाणी थांबले आणि त्यांच्याच कारमधल्या दारया बळी पडल्या.

अलेक्झांडर आणि दारया, दोघंही पुतीन यांचे कट्टर समर्थक होते. रशियानं क्रिमिया गिळावा, जॉर्जिया ताब्यात घ्यावा, युक्रेनवर आक्रमण करावं असा आग्रह दोघंही जाहीरपणे धरत असत. रशियन टीव्हीवर दोघं सतत दिसत. रशियातल्या सरकार धारजिण्या माध्यमांमधून अपप्रचार चालत असे आणि त्या अपप्रचार यंत्रणेच्या मुख्य संपादक अशी दारया यांची ख्याती होती. पुतीन कसे थोर आहेत, कसे बरोबर आहेत, कसे देशभक्त आहेत याच्या गोष्टी या माध्यमात सतत पसरवल्या जातात. युक्रेन नाझी देश झालाय, युक्रेन रशियाविरोधी झालाय असं सांगण्यासाठी दारया खोट्या बातम्या तयार करत, काहीच्या काही खोट्या गोष्टी रचत.

अमेरिका आणि नाटो देशांनी दारया यांच्यावर निर्बंध घातले होते (सँक्शन्स) आणि त्यांना प्रवेश बंदी केली होती. दारया दुगिना रशियाच्या वरिष्ठ वर्तुळात लोकप्रिय होत्या.

रशियन माध्यमांमधे एक बातमी आली की कोणी युक्रेनच्या हस्तक स्त्रीनं हा स्फोट घडवून आणला, स्फोट आटोपल्यावर ती स्त्री आपल्या मुलीसह ईस्टोनियात पळून गेली.

माध्यमात एक अशीही बातमी पसरली की रशियन रिपब्लिकन आर्मी या पुतीनविरोधी भूमिगत दहशतवादी संघटनेनं हा स्फोट घडवून आणला. आता सूड म्हणून पुतीन युक्रेनवर अधिक घातक हल्ले करणार आहेत असंही या बातम्यांनी सुचवलं.

दहशतवादी कारवाया होतात तेव्हां खरं खोटं ठरवणं अशक्य असतं. कारण या कारवाया नेहमीच फार काळजीपूर्वक आखल्या जातात, पार पाडल्या जातात. या कारवाईला प्रबळ संघटनांचा ( देशांचा, देशांनी चालवलेल्या हेर संघटनांचा) पाठिंबा असल्यानं काहीही सिद्ध करता येत नसतं. सगळाच चोरीचा मामला असतो. जिथं माध्यमं स्वतंत्र असतात, तिथं अशा प्रकरणांचा छडा लावला जातो. चीन, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, इराण, सीरिया अशा देशांमधे माध्यमं स्वतंत्र नसतात, सरकारला बांधील असतात. त्यामुळं तशा देशांमधे खरं काय घडलं याचा काहीच अंदाज येत नाही. पण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातली माध्यमं स्वतंत्र असल्यानं ती घटनेचा पत्रकारी अंगानं शोध घेतात आणि बहुतांशी सत्य बाहेर येतं.

सर्जे आणि युलिया स्क्रिपाल यांच्यावर इंग्लंडमध्ये सॅलिसबरीत विषप्रयोग केला गेला. लिटविनेंकोला लंडनमधे विषप्रयोग करून ठार मारण्यात आलं. नवेल्नी या पुतीन विरोधकावरही विषप्रयोग झाला. तीनही प्रकरणं गार्डियन व इतर पेपरांनी खोदून काढली. एलियट हिगिन्स यांच्या बेलिंग कॅट या मुक्त पत्रकार संस्थेचे पत्रकार रशियातल्या सैन्यात पोचले आणि सैन्यातली एक शाखा विषाच्या कुप्या घेऊन जगभर हस्तक पाठवतात याची माहिती पेपरात आली.

सीआयए दक्षिण अमेरिकेत राजकीय पुढाऱ्यांचे खून करत असे. फिलिप एजी हा सीआयएचा एजंट त्यात गुंतलेला होता. त्यानं बंड केलं, पुस्तक लिहिलं तेव्हां साऱ्या गोष्टी उघड झाल्या.

सीआयए, एमआयपाच, मोसाद इत्यादी संघटना देशत्रूंचे काटे काढत असतात. अशा रीतीनं लोकांना ठार मारणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जातं. अमेरिका, रशिया, इस्रायल, ब्रिटन, इराण इत्यादी देश सर्रास अशी देशभक्ती करत असतात.

साधारणपणे लोकशाही देशांत या देशभक्तीवर न्यायसंस्था, माध्यमं यांचं लक्ष असतं. कायद्याच्या चौकटीत, परवानगी घेऊन, नीट कारणं दाखवून देशभक्ती होतेय की नाही ते तपासलं जातं. जिथं हुकूमशाही असते तिथं तपासणी वगैरे अजिबातच नसते. स्टालीननं किती माणसं आणि का मारली याचा हिशोब नसतो. पुतीन यांच्या कारकीर्दीत भरपूर खून झालेत. पण रशियात त्याची चर्चा होत नाही. तिथल्या माध्यमांत अशा घटना घडल्या अशी साधी नोंदही होत नाही. तिथं संसद असून नसल्यासारखी, स्वतंत्र न्यायव्यवस्था नाही. त्यामुळं स्टालीन किंवा पुतीननी माणसं खरोखरच देशाच्या हितासाठी मारली की व्यक्तिगत सत्तेसाठी मारली याची चौकशी होत नाही.

दुगिना यांना कोणी मारलं ते कसं कळणार? निदान रशियातून तरी ते कळणं अशक्य आहे. युक्रेननं हा उद्योग केला की अमेरिकेनं ते कळणं कठीण आहे. पण एक खरं. हा उद्योग कोणीही केला असला तरी तो पुतीन यांना इशारा आहे. पुतीन यांची सारी कारकीर्द केजीबी या हेरसंस्थेमधली. पुतीन एक साधे आणि काहीच कामगिरी न केलेले एजंट होते आणि चढत चढत ते रशियाच्या सर्वोच्चपदी पोचले. या वाटचालीत काय घडलं याची दबती चर्चा रशियात होते, कोणी उघडपणे बोलत नाही. परंतू रशियातली सत्तास्पर्धा अशा हिंसक कट कारस्थानी गुन्हेगारीच्या वाटेनं जात असल्यानं पुतीन ज्यांना नको आहेत त्यांनाही त्याच हिंसक-दहशतवादी वाटेनं जावं लागणार, हे तर्काला धरून आहे. निवडणुका जर फेक असतील तर निवडणुकीच्या वाटेनं पुतीन यांना सत्तेतून दूर करणं रशियात शक्य दिसत नाही.

पुतीन यांची सारी कारकीर्द संशयास्पद उद्योगांनी भरलेली आहे. कटकारस्थानं करणाऱ्या माणसाला अटळपणे शत्रू फार असतात. आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीलाच एक जुनाट ना दुरुस्त पाणबुडी लष्करी सरावात लोटून पुतीननी शेकडो नौसैनिकांचा बळी घेतला. अशा कित्येक घटना. ज्यांचे बळी गेले त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांना पुतीनवर कारवाई व्हावी असं वाटत असेल. पण ते तरी काय करणार? पुतीनवर टीका करता येत नाही. निवडणुकीत पुतीनना हरवता येत नाही. दहशतवाद ही एकच वाट उरते.

दारया दुगिना यांचा खून हा पुतीनना इशारा आहे. पुतीन म्हणतील की पश्चिमी सत्तांनी हा स्फोट घडवून आणला आहे. शक्यही आहे.

राजकारणाचा भाग सोडा. हा देश थोर की तो देश थोर अशा चहाच्या कपावर किंवा मद्याच्या ग्लासावर केलेल्या चर्चा सोडा. देश, अस्मिता इत्यादीच्या पलिकडंही एक गोष्ट उरते. ती म्हणजे स्वातंत्र्य. लोकशाही. नापसंत व्यक्तींचे काटे काढले जाणं कोणत्याही समाजाच्या हिताचं नसतं. रशियन लोकं याचा काय विचार करतात कुणास ठाऊक. पण इतरांनी यातून योग्य तो धडा घ्यायला हवा.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: