कुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल  जागतिक समस्या

कुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या

या तीन समस्यांमुळे जगभरात आरोग्यक्षेत्रात प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाल्याचे लान्सेटच्या नव्या अहवालात म्हटले आहे.

भारतात मुलांचे ६९% मृत्यू कुपोषणामुळे : युनिसेफ
आदरणीय पंतप्रधान, भजन करण्यापेक्षा सकस अन्नामुळे कुपोषणाची समस्या सुटेल !
पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

नवी दिल्ली:  नैसर्गिक हवामानातील हस्तक्षेप आणि पोषक आहाराच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे मानवसमाजात एकाच वेळी अनेक आजारांचे उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे लान्सेट या ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकात नमूद केले आहे.

हा अहवाल सादर करणाऱ्या आयोगाला सुरुवातीला केवळ लठ्ठपणाचा अभ्यास करणे एवढेच कार्य दिले होते. मात्र इतर दोन्ही घटक याच समस्येशी निगडित असल्याचे संशोधनातून आणि चर्चेतून पुढे आले. त्यामुळे समस्येचे शब्दांकन बदलण्यात आले आणि आयोगापुढील कार्य अधिक व्यापक करून इतर दोन जोडलेल्या समस्यांनाही त्यात समाविष्ट करण्यात आले.

लान्सेट आयोगाचा अहवाल कुपोषण, लठ्ठपणा व हवामानबदल या तिन्ही समस्यांना एकमेकांशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतो. बहुतांशवेळा शासनाचे धोरण हे तीनही प्रश्न स्वतंत्र असल्यासारखे पाहते.

कुपोषण कमी होण्याचा वेग जागतिक स्तरावर इतका मंद आहे की कुपोषणमुक्ततेचे ध्येय गाठणे अवघड आहे. आज कुठल्याही देशाकडे लठ्ठपणाच्या आजारावर उत्तर नाही आणि जगभरातील सार्वजनिक धोरणे हवामान बदल रोखण्यासाठी अपुरी पडत आहेत. त्यामागे व्यावसायिक लागेबांधे, आर्थिक गुंतवणुकीची चुकीची धोरणे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि या बदलांसाठीचा सामाजिक रेटा अपुरा असणे ही कारणे दिसून येतात.

आहाराच्या वेगवेगळ्या निवडी आणि त्याचा पर्यावरणावरील परिणाम यासंबंधीचा असाच एक अहवाल लान्सेटच्या खाद्य आयोगाने (EAT Commission) याच महिन्यात प्रसिद्ध केला आहे.

आजारांचे उद्रेक किती घातक आहेत?

जगभरातील १५ कोटी ५० लाख प्रौढ आणि ५ कोटी २० लाख बालके कुपोषणाने वाढ खुंटणे आणि शारीरिक झीज या समस्येचे शिकार ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्याऐंशी कोटी पन्नास लाख लोक हे कुपोषित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आशिया आणि अफ्रिेकेतील सर्व देशांचा एकत्रितपणे विचार केल्यास कुपोषणामुळे होणाऱ्या खर्चांकरिता सर्व देश आपापल्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या जवळपास ४.११  टक्के खर्च करतात.

त्याचवेळी लठ्ठपणाची समस्याही वाढत चालली आहे. जगभरात दोन अब्जांहून अधिक लोक अतिलठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त आहेत तर चाळीस लाख लोकांचा त्यामुळे मृत्यू होतो. श्रीमंत देशांमध्ये १९८० पासून लठ्ठपणाच्या आजाराचा उद्रेक झाला आहे तर  दुसरीकडे गरीब देश अद्यापही कुपोषणाच्या समस्येशी झगडत आहेत. त्याचमुळे हा अहवाल सांगतो की, ‘लठ्ठपणाच्या आजारामुळे कुपोषणाच्या आकृतीबंधामध्येही फरक पडला आहे.’

अतिलठ्ठपणा आणि मोठ्या कार्बन फूटप्रिंटचे ओझे वागवणाऱ्या श्रीमंत देशांमध्ये पर्यावरणाची अधिकाधिक हानी करणाऱ्या अन्ननिर्मिती प्रक्रिया व आहारपद्धती प्रचलनात आहेत. पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, आहारासाठी मोठ्या प्रमाणात केले जाणारे प्राणीपालन ही त्यातील काही उदाहरणे सांगता येतील.

अन्ननिर्मितीच्या वाईट पद्धती मोठ्या प्रमाणात हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात. निव्वळ शेतीतून १५-२३ टक्के ग्रीनहाऊस वायू उत्सर्जित होतो. याचबरोबर शेतजमिनीचे बिगरशेती जमिनीत रुपांतर करणे, अन्नपदार्थांवरच्या प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारा कचरा या सगळ्या प्रक्रियेतून उत्सर्जित वायूची टक्केवारी २९ टक्क्यांपर्यंत जाते.

भारतातील उद्रेक

‘’आत्तापर्यंत भारतात कुपोषण आणि अतिलठ्ठपणा ही दोन वेगळी टोके होती. एकीकडे फारच कमी कॅलरीज तर दुसरीकडे अती!”  आयोगात सहभागी अधिकारी डॉ. शिफालिका गोयंका यांनी सांगितले. ‘‘तसेच हवामान बदलाकडेही एक स्वतंत्र समस्या म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात या तीनही समस्या एकाच व्यवस्था आणि धोरणांमुळे उद्भवल्या आहेत.’’

गेल्या कित्येक वर्षांपासून पोषणाच्या प्रश्नावर भारताची कामगिरी अत्यंत वाईट राहिली आहे. मागील वर्षी वैश्विक भूक निर्देशांकाच्या ( ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’) ११९  देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक १०३  होता. ही २०१७ मधील १०० व्या क्रमांकापासून ३ क्रमांकांनी घसरण होती. (हा निर्देशांक चार घटकांवर अवलंबून असतो- कुपोषण, बालमृत्यू, बालकांमधील शारीरिक झीज आणि खुंटलेली वाढ) इतर दक्षिण आशियायी देशांची कामगिरी भारताच्या तुलनेत चांगली आहे. निर्देशांकाच्या क्रमवारीत चीन २५व्या क्रमांकावर, नेपाळ ७२, श्रीलंका ६७ आणि बांग्लादेश ८७व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १०६व्या क्रमांकावर आहे.

भारताच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, पाच वर्षांखाली ३८ टक्के बालके वाढ खुंटलेली, २१ टक्के बालके शारीरिक झीज असलेली आहेत तर ३६ टक्के बालके कमी वजनाची आहेत.

मधुमेहाच्या दृष्टीने अतिलठ्ठपणा हा एक जोखीम घटक आहे. भारतात अतिलठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. १९९० मध्ये अतिलठ्ठांची संख्या २ कोटी ६ लाख होती तर तीच २०१६मध्ये ६ कोटी ५ लाख इतकी होती.

हवामान बदलाबाबतही फारशी बरी स्थिती नाही. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, ६५ कोटी लोक आज ज्या प्रदेशात राहत आहेत ते प्रदेश २०५०पर्यंत मध्यम किंवा प्रचंड उष्ण प्रदेश म्हणून गणले जाणार आहेत. याचा शेती आणि अन्नसुरक्षेवर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे.

गोयंका यांनी सांगितले की या तिन्ही समस्यांचा सहसंबंध कसा आहे हे पाहणे ही या लान्सेट अहवालाची मुख्य प्रेरणा आहे. उदाहरणार्थ, हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होऊन अन्नाची अनिष्चितता  निर्माण होते आणि त्यातूनच कुपोषण किंवा मृत्यू होतात, तसेच अर्भक आणि मुलांच्या कुपोषणातून पुढे प्रौढांमधील लठ्ठपणा वाढीस लागतो.

हा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद: हिनाकौसर खान- पिंजार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1