भारतात मुलांचे ६९% मृत्यू कुपोषणामुळे : युनिसेफ

भारतात मुलांचे ६९% मृत्यू कुपोषणामुळे : युनिसेफ

भारतातील दोनपैकी एका महिलेला रक्तक्षय (ऍनिमिया) आहे, तसेच किशोरवयीन मुलींमध्ये त्याचे प्रमाण मुलांच्या दुप्पट आहे असे युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे.

आदरणीय पंतप्रधान, भजन करण्यापेक्षा सकस अन्नामुळे कुपोषणाची समस्या सुटेल !
पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर
कुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या

भारतातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूंपैकी ६९% मृत्यू हे कुपोषणामुळे होतात असे युनिसेफच्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

‘जगातील मुलांची स्थिती २०१९’ या शीर्षकाच्या अहवालामध्ये युनिसेफने म्हटले आहे, की या वयोगटातील दोनपैकी एक मूल कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कुपोषणामुळे बाधित आहे.

यामध्ये वाढ खुंटणे (३५%), अवयवांची झीज (१७%) आणि वजन जास्त असणे (२%)यांचा समावेश होतो. केवळ ४२% मुलांना (६ ते २३ महिने वयोगटातील) पुरेशा वेळांना खाऊ घातले जाते आणि २१% मुलांना पुरेसे वैविध्य असलेला आहार मिळतो.

६-८ महिने वयोगटातील केवळ ५३% अर्भकांसाठीच पूरक आहार वेळेवर चालू केला जातो.

भारतीय महिलांच्या आरोग्याबद्दल, असे म्हटले आहे की दोनपैकी एका महिलेला रक्तक्षय आहे. पाच वर्षे वयाखालील मुलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींमध्ये त्याचे प्रमाण किशोरवयीन मुलांच्या दुप्पट आहे.

भारतीय मुलांना उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा जुनाट विकार आणि मधुमेहपूर्व अवस्था यासारख्या प्रौढांमध्ये होणाऱ्या विकारांचे निदान होऊ लागले आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सूक्ष्म पोषद्रव्यांच्या कमतरतेचा त्रास होत असल्याचेही डेटामधून दिसते. पाच वर्षांखालील दर पाचव्या मुलाला अ जीवनसत्त्वाची कमतरता असून तीनपैकी एका मुलाला जीवनसत्त्व बी१२ ची कमतरता आहे आणि प्रत्येक पाच मुलांपैकी दोघांना रक्तक्षय आहे.

अहवाल असेही म्हणतो, की पोषण अभियान किंवा नॅशनल न्यूट्रिशन मिशन याची भारतातील पोषणासंबंधीची निर्देशके सुधारण्यात मोठी भूमिका आहे. जगभरातील सर्व सरकारांनी कुपोषणासाठी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये ऍनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाला सर्वोत्तम कार्यक्रमांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे.

ऍनिमिया चाचणी आणि उपचाराचा वापर आरोग्यपूर्ण आहारांबाबत माहिती पुरवण्यासाठी प्रवेश बिंदू म्हणून करणे यासाठी कार्यक्रमाच्या ६X६X६धोरणाला (सहा लक्ष्यित लाभार्थी गट, सहा हस्तक्षेप आणि सहा संस्थात्मक यंत्रणा) अधोरेखित करण्यात आले आहे.

अती वजन आणि स्थूलता यामुळे शाळेच्या वयातील मुले आणि किशोरवयीन मुले यांच्यामध्ये बालपणामध्येच मधुमेहासारख्या (१०%) संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा धोका वाढतो आहे.

शहरी भारतामध्ये लोकांच्या अनारोग्यपूर्ण अन्न खाण्याच्या सवयी वाढत आहेत, ज्यामुळे मुलांच्या अन्न निवडीवर परिणाम होत आहे आणि त्याचे लोण ग्रामीण भागातही पसरत आहे. भारतातील अन्न सेवनाच्या पद्धतींमुळे मुलांच्या आहारामध्ये प्रथिनांची आणि सूक्ष्मपोषकांची मोठी कमतरता असते. त्यांच्या आहारावर घरातील (प्रौढांच्या) अन्न निवडीचा प्रभाव असतो.

अनेक दशके, उत्पन्नामध्ये वाढ होत असूनही प्रथिनाधारित कॅलरींची संख्या कमीच आहे, त्यात काहीही बदल झालेला नाही आणि फळे व भाज्यांकडून मिळणाऱ्या कॅलरींचा वाटा कमी होत आहे. अहवाल म्हणतो, जगभरात ७७% प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर केवळ १०० मोठ्या फर्मचे नियंत्रण आहे.

जागतिक परिस्थितीच्या बाबतीत, युनिसेफचा अहवाल म्हणतो की पाच वर्षांखालील तीनपैकी किमान एक एक मूल – किंवा २० कोटी मुले – एकतर कुपोषित आहेत किंवा स्थूल आहेत.

अहवालात नमूद केल्यानुसार, सहा महिने ते दोन वर्षे वयाच्या जवळजवळ दोन तृतियांश मुलांना त्यांचे शरीर आणि मेंदू ज्या वेगाने वाढतात त्याला अनुसरून अन्न दिले जात नाही. यामुळे त्यांना मेंदूचा विकास चांगला न होणे, शिकण्याची क्षमता कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, अधिक प्रमाणात जंतुसंसर्ग, आणि अनेक वेळा मृत्यूचीही जोखीम असते.

युनिसेफने यापूर्वी २० वर्षांपूर्वी असा अहवाल प्रसिद्ध केला होता.

पीटीआय

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0