दिल्ली निवडणुका – विकास विरुद्ध विभाजन

दिल्ली निवडणुका – विकास विरुद्ध विभाजन

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार काल संपला. या प्रचारात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर हिंदू-मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न भाजपने के

२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर
भाजपची घोडदौड कायम; आप दाखवू शकतो विरोधीपक्षांना मार्ग
दिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार काल संपला. या प्रचारात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर हिंदू-मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न भाजपने केला तर भाजपच्या या सापळ्यात न सापडता आम आदमी पार्टीने गेल्या पाच वर्षांत राज्यात शिक्षण व आरोग्यावर केलेले आपले काम लोकांपुढे नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. काँग्रेसने या निवडणुकांत फारसे प्रयत्नच केले नाही. तीनही पक्षांनी आपापल्या नेत्यांना घेऊन रोड शो काढले.

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आपली ‘विजय संकल्प यात्रा’ दक्षिण दिल्लीत काढली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य दिल्ली, पश्चिम दिल्ली या भागात रोड शो केले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्‌डा यांनीही हाच भाग पिंजून काढला.

विकासावरआपचा भर

आप

आप

आपचे सर्व नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीवरच भर दिला. ‘अच्छे बिताये ५ साल, लगे रहो केजरीवाल’, ही आपची घोषणा लोकप्रिय ठरलीच पण या घोषणेने प्रचारामध्ये आक्रमकताही आली. पक्षाने या घोषणेच्या माध्यमातून आपण केलेल्या ५ वर्षांतल्या कामगिरीचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडला. आरोग्य, शिक्षणात आपल्या पक्षाने केलेले काम अन्य कोणताही पक्ष करू शकत नाही, असा जोरदार प्रचार या निवडणुकींत दिसून आला.

केजरीवाल यांच्यासहीत आपचे ज्येष्ठ नेते प्रचाराचे हेच सूत्र घेऊन मतदारांपुढे होते. गेल्या डिसेंबर महिन्यात आपने आपल्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ जाहीर केले. यात जनतेला दिलेल्या ७० आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा पक्षाने केला. त्यानंतर केजरीवाल यांनी जनतेपुढे १० मुद्द्यांचे ‘गॅरंटी कार्ड’ ठेवले. या ‘गॅरंटी कार्ड’मध्ये भूमिगत वीज केबलचे जाळे, २४ तास पिण्याचे पाणी, पाण्यावर सबसिडी अशी आश्वासने आहेत. त्यानंतर पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात, गटार कामगाराला काम करताना मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियाना सुमारे १ कोटी रु.चे अर्थसाहाय्य देणे, शाळांमध्ये देशभक्तीवर भर देणारा अभ्यासक्रम आणणे, अशी आश्वासने दिली आहेत. आपचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास सरकारचा भर शिक्षणावर अधिक असेल हेच सूचवणारा हा जाहीरनामा होता.

 शाहीनबाग बिर्याणीवर भाजपचा प्रचार

सत्ताधारी पक्ष आपचा प्रचार शिक्षण व आरोग्यावर असताना भाजपने मात्र आपला संपूर्ण प्रचार शाहीन बागेतील महिलांच्या आंदोलनावर करून हे आंदोलन कसे देशद्रोही स्वरुपाचे आहे. या आंदोलनात कसे देशविरोधात कट रचले जात आहेत, असा प्रचार सुरू केला.

भाजप

भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडकडडुमा येथील प्रचारसभेत सीलमपूर, जामिया व शाहीनबागमध्ये सीएएविरोधात झालेले आंदोलन हे देशाचे विभाजन करणारे आंदोलन आहे, व ते सुनियोजित कटकारस्थान आहे, असा आरोप केला. मोदी यांच्यासारखीच भाषा भाजपच्या अन्य नेत्यांची होती. यात अमित शहा, उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा यांनी आपला प्रचार आप व काँग्रेसचे नेते विभाजनाचे राजकारण कसे करत आहे यावर केंद्रीत केला. या प्रचारात भाजपच्या नेत्यांकडून अनेक भडकाऊ विधाने जाणूनबुजून करण्यात आली. त्यावर प्रचंड राजकीय आरोपप्रत्यारोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर, परवेश वर्मा या नेत्यांवर दोन दिवस प्रचारबंदी घातली. अनुराग ठाकूर यांनी तर भरसभेत ‘देश के गद्दारोंको…’ अशा घोषणा देत उपस्थितांकडून ‘गोली मारो सालोंको..’ असे वदवून घेतले. तर परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना दहशतवादी संबोधल्याने त्यांच्यावर दोन वेळा प्रचारबंदी घालण्यात आली. आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सतत पाकिस्तान, शाहीन बाग, बिर्याणी असे उल्लेख केले.

भडकाऊ विधाने खालच्या पातळीवरील टीका

एकीकडे अनुराग ठाकूर आंदोलकांवर गोळ्या मारण्याचे आवाहन करत होते तर दुसरीकडे तीन घटनांमध्ये आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे प्रसंग घडले. या घटना जामिया-शाहीन बागच्या नजीक घडल्या. आपने याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला तर भाजपने हे आंदोलन घडवून आणण्यास आप जबाबदार असल्याचा आरोप केला.

शाहीन बाग परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर दिल्ली पोलिसमधील वरिष्ठ अधिकारी राजेश देव यांनी या गोळ्या आपचा सदस्य कपिल बैसाला याने झाडल्याचे विधान केले. त्यावर बैसाला याच्या कुटुंबियांनी आमचा आपशी कोणताही संबंध नाही आम्ही ‘मोदी सेवक’ असल्याचा दावा केला. पण या घटनेनंतर दिल्ली पोलिस अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप आपने केला.

या घटने संदर्भात निवडणूक आयोगाने या पोलिस अधिकाऱ्यालाच निवडणूक ड्युटीवरून काढून टाकले. त्या अगोदर निवडणूक आयोगाने  आग्नेय दिल्लीच्या परिसरात वारंवार तणाव व हिंसाचार घडून येत असल्याने तेथील डीसीपीची बदली केली होती.

याचा परिणाम असा झाला की, भाजपने प्रचारात सतत शाहीन बागचा विषय आणला. ‘जागो दिल्ली’ हा भाजपचा नारा थेट शाहीन बागमधील आंदोलनाला लक्ष्य करणारा होता. भाजपची अशी प्रचारनीती पाहून आपनेही आपल्या प्रचारतंत्रात काही बदल केले. केजरीवाल यांनी काही ठिकाणी हनुमान चालिसा म्हणून दाखवली तर आपचे काही नेते शाहीन बागमधील आंदोलन काही काळ स्थगित करावे अशी विनंती करत होते.

भाजपने आपला जाहीरनामा जाहीर केला त्यात येत्या पाच वर्षांत १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन आहे. प्रत्येक घरात पाणी, ५५ हजार कोटी रु.चे पायाभूत प्रकल्प, सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त जागी भरती, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी इलेक्ट्रिक स्कुटर तर नववीत जाणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकल अशी प्रमुख आश्वासने भाजपची होती.

काँग्रेसचा थंडा प्रचार

१९९८ ते २०१३ अशी १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचा एकूण प्रतिसाद अत्यंत थंड होता. दिल्लीत बहुसंख्य जी विकासकामे झाली होती ती शीला दीक्षित यांच्या कारकीर्दीत झाली होती व त्या मुद्द्यावर काँग्रेसने पूर्वी निवडणुका लढवल्या होत्या. पण गेल्या पाच वर्षांत आपने काँग्रेसचा मुस्लीम, दलित व गरीब मतदार आपल्या बाजूला पूर्णपणे खेचल्याने काँग्रेसची अवस्था अगदीच दयनीय झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या अनेक नेत्यांना प्रचारात भाग घेण्यास सांगितले पण या नेत्यांनी अनास्थाच दाखवली. अपवाद वगळता माजी केंद्रीयमंत्री कृष्णा तिरथ, माजी राज्यसभा खासदार परवेज हाश्मी, माजी मंत्री हरून युसुफ, ए. के. वालिया, अरविंदर सिंग लवली हे नेते प्रचारात उतरले.

कॉंग्रेस

कॉंग्रेस

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी या प्रचारापासून दूर राहिल्या. पण माजी अध्यक्ष राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवस प्रचारात भाग घेतला. आपल्या प्रचारात या दोघांनी भाजपवर तोंड सुख घेतले. भाजपचे देशात फूट पाडण्याचे राजकारण, वाढती बेरोजगारी या मुद्द्यावर या दोघांनी भर दिला. तर आपचे नेते केजरीवाल यांच्या जाहिराती खर्चावर प्रियंका गांधी यांनी टीका केली. आपने दिल्लीचा फारसा विकास न करता केवळ जाहिरातबाजी केली असा त्यांचा आरोप होता.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ३०० युनिटपर्यंत नि:शुल्क वीज, पदवीधर बेरोजगारांना दरमहा ५ हजार रु.चा तर पदव्युत्तर बेरोजगारांना दरमहा ७,५०० रु. भत्ता देण्याचे आश्वासन दिले.

सर्वेक्षण चाचण्यात आपच पुढे 

आक्रमक प्रचारामुळे भाजपला काही प्रमाणात जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षण चाचण्यांचा असला तरी आपला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळून त्यांना ५० हून अधिक जागा मिळतील असेच सर्व सर्वेक्षण चाचण्या सांगत आहेत. तर भाजपला दुहेरी आकडा गाठता येईल असे सांगितले जात आहे. २०१५च्या निवडणुकांत भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. यंदा काँग्रेसला काही जागा मिळतील असे सांगितले जात आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती होईल?

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे हे गुलदस्त्यात ठेवले आहे. भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असे सततचे आव्हान आपकडून केले जात होते पण भाजपने मोदींचाच चेहरा पुढे करून मते मागितली आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने दिल्लीतल्या सातही लोकसभा जागा ४६.६ टक्के मतांनी जिंकल्या होत्या. तर २०१५च्या विधानसभा निवडणुकांत आपला ५४.३ टक्के मते मिळून त्यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपची मतांची टक्केवारी ३२ वर आली होती तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण त्यांना ९ टक्के मते मिळाली होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने ५८ टक्के मते मिळवून पुन्हा सातही जागा जिंकल्या तर काँग्रेसने २२ टक्के मते मिळवली. आपला १८ टक्के मते मिळाली.

एकूणात सर्वेक्षण चाचण्यांमध्ये केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे असा मतदारांचा कल आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0