दिल्ली दंगल, भीमा कोरेगाव तपासी अधिकाऱ्यांना मेडल

दिल्ली दंगल, भीमा कोरेगाव तपासी अधिकाऱ्यांना मेडल

गुन्ह्याचा तपास करताना उच्च व्यावसायिक मूल्यं जपली जावीत आणि अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेची दाखल घेतली जावी, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हंटले आहे.

नवी दिल्ली – वादग्रस्त दिल्ली पोलिस अधिकारी राजेश देव यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने तपासातील गुणवत्तेबद्दल १२ ऑगस्टला पुरस्कार अर्थात मेडल जाहीर केले आहे.

दिल्ली दंगलीचा तपास करणाऱ्या टीमचे प्रमुख असणारे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त देव यांनी शाहीन बाग आंदोलनामध्ये पिस्तूल घेऊन आलेल्या युवकाचे आम आदमी पक्षाबरोबर संबंध जोडल्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने फटकारले होते. पिस्तूल घेऊन आलेला युवक कपिल गुज्जर हा आणि त्याचे वडील हे दोघेही आम आदमी पक्षाचे सदस्य असल्याचे, त्याच्या फोनमधून मिळालेल्या फोटोमधून दिसत असल्याचे देव यांनी पत्रकारांना सांगितले होते.

देव यांचे वक्तव्य एकदम अनावश्यक आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे, निवडणूक आयोगाने, दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले होते आणि इशारा दिला की अशा प्रकारची वक्तव्ये मुक्त वातावरणातील निवडणुकांवर परिणाम करणारी आहेत.

८ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजप हा आम आदमी पक्षाला टक्कर देऊ शकेल अशी अपेक्षा होती. देव हे भाजपच्या इशाऱ्यावरुण काम करीत असल्याचा आरोप आप आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी केला होता.

निवडणूक आयोगाने देव यांना निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवले होते. दिल्ली निवडणुकीनंतर लगेच दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) देव प्रमुख आहेत. या पथकावर, तपास करताना पूर्वग्रह ठेवण्यात आल्याची टीका करण्यात होत आहे.

देशभरातील १२१ अधिकाऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी पुरस्कार जाहीर केला, त्यामध्ये देव यांचे नाव आहे. त्याच बरोबर भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेतील (एन आय ए) अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे.

‘एनआयए’चे पोलिस अधीक्षक विक्रम खलाटे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास जानेवारीपासून करीत आहेत. त्यांनी न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, कवी वरवरा राव हे कोरोनाच्या जागतिक परिस्थितीचा आणि स्वतःच्या वयाचा जामीन मिळविण्यासाठी अयोग्य फायदा घेत असल्याचा दावा केला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला होता, पण तो याचवर्षी ‘एनआयए’कडे हस्तांतरीत करण्यात आला. पुणे पोलिसांच्या तपास पथकाचे नेतृत्त्व करणारे सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनाही मेडल जाहीर झाले आहे.

भीमा कोरेगाव केसमध्ये वकील, प्राध्यापक, कार्यकर्ते अशा १२ जणांना अटक अटक करण्यात आलेली आहे. मतभेद व्यक्त करणाऱ्या लोकांचा आवाज बंद करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका अनेकवेळा झाली आहे.

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात झळ बसलेल्या लोकांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी नेत्यांवर दंगलीला जबाबदार असल्याचे आरोप केले आहेत, मात्र पुणे पोलिस आणि ‘एनआयए’ने ‘एल्गार परिषदे’ला कोणत्याही ठोस पुराव्या शिवाय दोषी ठरविले आहे.

गुन्ह्याचा तपास करताना उच्च व्यावसायिक मूल्यं जपली जावीत आणि अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेची दाखल घेतली जावी, या उद्देशाने हे पुरस्कार २०१८ मध्ये सुरू करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हंटले आहे. मात्र उच्च व्यावसायिक मूल्यं काय आहेत, ज्यामुळे या अधिकाऱ्यांना मेडल देण्यात आले, याचा तपशील मंत्रालयाने दिलेला नाही.

या मेडल मिळालेल्या यादीमध्ये विविध राज्यांमधील २१ महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

COMMENTS