दिल्ली दंगल : १०२ जणांना गोळ्या लागल्या

दिल्ली दंगल : १०२ जणांना गोळ्या लागल्या

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीत १०२ जणांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या तर १७१ जणांना अणकुचीदार शस्त्रास्त्राने जखमी करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असून या दंगलीत ५०० हून जण गंभीर जखमी झाले आहेत. बहुसंख्य दगडफेक व आगीमुळे जखमी झाले आहेत. जखमींच्या संख्येत ११ पोलिस कर्मचारी आहेत. डॉक्टरांनी दंगलीतील मृतांचा आकडा ५३ सांगितला असून जीटीबी रुग्णालयात ४४, राम मनोहर लोहिया रुग्णालयात ५, लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात ३ व जग प्रवेश चंद्र रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे.

दंगलीत हजारो दूरध्वनी

२२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या काळात पोलिसांना २१ हजाराहून अधिक दूरध्वनी आले. त्यात २४ व २५ फेब्रुवारी रोजी दंगलीत अडकलेल्यांच्या दूरध्वनींची संख्या अधिक होती. या दोन दिवसांत पोलिसांना १९ हजार दूरध्वनी आले.

दिल्ली पोलिसांनी दंगली संदर्भात ६५४ गुन्हे दाखल केले असून आता पर्यंत १,८२० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ४७ जणांवर शस्त्रास्त्र बंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताहीर हुसेनला अटक

दरम्यान गुरुवारी दिल्ली दंगलीतील हत्येचा आरोप असलेला आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. ताहीर हुसेनवर तीन गुन्हे दाखल केले आहेत. त्यात एक गुन्हा आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आहे.

मूळ बातमी

COMMENTS