दिल्लीत मृतांची संख्या २७, अजित डोभाल यांच्याकडून पाहणी

दिल्लीत मृतांची संख्या २७, अजित डोभाल यांच्याकडून पाहणी

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत बुधवारी कोणतीही हिंसाचाराची घटना घडली नाही पण परिस्थिती तणावग्रस्त होती. सर्व शाळा, दुकाने, खासगी-सरकारी कार्यालये, आस्थाप

कोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव
दिल्लीत पोलिस आणि वकिलांचा संघर्ष रस्त्यावर
शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत बुधवारी कोणतीही हिंसाचाराची घटना घडली नाही पण परिस्थिती तणावग्रस्त होती. सर्व शाळा, दुकाने, खासगी-सरकारी कार्यालये, आस्थापने बंद होती. एक भयाण शांतता दिसत होती. पोलिसांनी सकाळपासून हिंसाचारग्रस्त भागांमध्ये संचलन केले व अनेक भागांची पाहणी केली. आतापर्यंत दंगलीत मरण पावलेल्यांची संख्या २७ झाली असून अडीचशेहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.

बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी हिंसाचारग्रस्त सीलमपूर, मौजपूर भागांची पाहणी केली. तुमचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी असल्याचा दिलासा ते लोकांना देत होते. सीलमपूर येथील डीसीपी कार्यालयात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी मंगळवारी नियुक्त करण्यात आलेले विशेष आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. डोभाल यांनी मंगळवारी रात्रीही काही दंगलग्रस्त भागांना भेट दिली होती.

बुधवारी पुन्हा डोभाल यांनी अनेक सामान्य नागरिकांशी चर्चा केली. महिलांशी बोलताना ते प्रेमाची, सद्भावना राखण्याचे आवाहन करत होते. हा देश सर्वांचा आहे, त्याला प्रगतीकडे नेण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे ते सांगत होते. त्यावर तुम्ही येथे आले आहेत आता टेन्शन नाही, आमच्यामध्ये हिंमत आली आहे, असे नागरिक त्यांना बोलत होते. मी पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या हुकुमावरून येथे आलो असून कोणीही चिंता करू नये, मी सर्व भाग फिरलो आहे, प्रत्येकाला शांततेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

पोलिसांची दंगलग्रस्त भागांची पाहणी

दिल्ली पोलिसांनी बुधवारी करावल नगर, खजुरी खास, चांद बाग, भजनपुरा, यमुना विहार, गोकुलपुरी, शिव विहार, मौजपूर व जाफराबाद या दंगलग्रस्त भागांची पाहणी केली. या सर्व भागांमध्ये १४४ कलम लावले आहे. विशेष पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव व अतिरिक्त पोलिस आयुक्त मनदीप सिंह रंधवा यांनी भजनपुरा भागात भेट देऊन तेथील पाहणी केली.

२६ वर्षीय आयबी कर्मचाऱ्याचा मृतदेह मिळाला 

दिल्ली पोलिसांसोबत काम करणारे इंटेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा मृतदेह बुधवारी ईशान्य दिल्लीतील चांद बागमधील एका नाल्यात सापडला. ते मंगळवारपासून बेपत्ता होते. त्यांना त्यांच्या घरातून जमावाने उचलले व त्यांच्यावर हल्ला केला असे इंडियन एक्स्प्रेसचे वृत्त आहे. पोलिसांनी अंकित शर्मा यांची ओळख पटवली असून ते पोलिसांसोबत सुरक्षेसंदर्भात काम करत असल्याचे मान्य केले. अंकित शर्मा खजुरी खास या भागात राहात होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अंकित शर्मा राहात असलेल्या ठिकाणी एका जमावाने जोरदार दगडफेक सुरू केली. त्यामुळे शर्मा यांच्या कुटुंबियांनी त्यांना बोलावून घेतले. अंकित शर्मा घटनास्थळी पोहचताच त्यांना जमावाने घेरले व त्यांना बेदम मारहाण केली. जमावाने त्यांना त्याच परिस्थितीत सोबतही नेले. बुधवारी त्यांचा मृतदेह नाल्यात आढळला.

अंकित शर्मा यांचे वडील देवेंद्र शर्मा आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितला पहिले मारहाण करण्यात आली व नंतर त्याला गोळी मारण्यात आली.

अंकित २०१७मध्ये आयबीमध्ये रुजू झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0