१० मुस्लिमांची नावे सांगितल्यास मुक्तता!

१० मुस्लिमांची नावे सांगितल्यास मुक्तता!

२८ वर्षांच्या इलियासने पाच महिने तुरुंगात काढले पण आता तो सुटला आहे. फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीतील शिवविहार येथील राजधानी पब्लिक स्कूलची मोडतोड

दिल्ली जहांगीरपुरी दंगलप्रकरणी विहिंप, बजरंग दलावर गुन्हे दाखल
दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालीदला अटक
दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत

२८ वर्षांच्या इलियासने पाच महिने तुरुंगात काढले पण आता तो सुटला आहे. फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीतील शिवविहार येथील राजधानी पब्लिक स्कूलची मोडतोड केल्याप्रकरणी इलियासला १७ मार्च, २०२० रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर १४ मे २०२० रोजी त्याला डीआरपी माध्यमिक शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली. ३ सप्टेंबरला इलियास घरी परत आला. आपण मुस्लिम असल्यानेच आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचे त्याने नमूद केले.

“ये मांग रहे थे ना आझादी? ऐसे बात कर रहा थे ठाने में मुझसे और बाकी मुसलमानोंसे,” अशा शब्दांत त्याने ‘द वायर’कडे भावना व्यक्त केल्या.

मुस्लिम असल्यामुळे अटक?

पोलिसांनी पहिल्या केसमध्ये इलियासला अटक केली, तेव्हा त्याला दयालपूर पोलिस ठाण्यात नेऊन सीसीटीव्ही कॅमेरातील जमावाच्या हिंसाचाराचे फूटेज दाखवण्यात आले व तोही या जमावात होता असा आरोप ठेवण्यात आला. त्याने या आरोपाचा जोरदार विरोध केला, तेव्हा पोलिस म्हणाले की, जर त्याने व्हिडिओतील १० जणांची नावे सांगितली तर त्याला मुक्त केले जाईल.

“जैसे ही मैने कुछ हिंदू लोगों के नाम दिये, तो पुलीस ने कहा मुसलमान नाम बता,” असेही इलियासने सांगितले.

इलियास मोडतोडीत सहभागी होता याचा कोणताही पुरावा नसतानाही त्याला मंडोली कारागृहात पाठवण्यात आले. तो खूपच घाबरलेला होता. “मेरे मजहब को मेरा जुर्म बना दिया,” असे तो म्हणाला.

सध्या इलियासची केस हाताळणारे गुन्हे शाखेचे पोलिस सहाय्यक निरीक्षक पंकज कुमार यांनी या प्रकरणात बोलण्यास नकार दिला. दयालपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ तारकेश्वर सिंग यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न अनेकदा केला पण ते भेटू शकले नाहीत.

दिल्ली पोलिसांनी दंगलीसंदर्भातील अटकांबाबत घेतलेला निर्णायक पवित्रा इलियासच्या केसमधून दिसून येतो. इलियासच्या केसमधील आरोपपत्र आणि जामीनअर्ज ‘द वायर’ला मिळाले आहेत. त्यांतून वारंवार अटक करण्यामागील व त्रास देण्यामागील हेतू स्पष्ट होतो. इलियासला राजधानी पब्लिक स्कूलमधील मोडतोडप्रकरणी अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्याविरुद्ध पुरेसा पुरावा तर नव्हताच, शिवाय, दंगलींमध्ये मुस्लिमांना लक्ष्य केले जात असताना मुस्लिम व्यक्तीच्या मालकीच्या शाळेत मोडतोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याला डीआरपी शाळेचे नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीआरपी शाळेचे मालक हिंदूधर्मीय आहेत हा मुद्दा पोलिसांच्या पथ्यावर पडला. हा आरोपही पोलिसांना सिद्ध करता आलेला नाही. पहिल्या केसमध्ये त्याला जामिनावर मुक्त करण्याचा आदेश १६ मे रोजी आला. त्याच्या दोन दिवस आधी १४ मे रोजीच इलियासला या दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात आली. याचा अर्थ त्याला दीर्घकाळ तुरुंगात ठेवायचे असे पोलिसांनी ठरवलेलेच होते.

न्याय दूरच

इलियास आरोपी असलेल्या दुसऱ्या प्रकरणातील चार साक्षीदारांच्या जबाबात इलियासचा उल्लेखच नाही. पाचव्या साक्षीदाराने जबाबात इलियासला ओळखल्याचा दावा केला आहे. मात्र, तेही दुसऱ्या कोणीतरी दिलेल्या ‘टिप’च्या आधारे त्याने इलियासला ओळखले आहे.

इलियास पाच महिने तुरुंगात होता, त्या काळात त्याचे वकील अधिल सैफुद्दिन आणि लवकेश भांभानी यांनी पाच जामीनअर्ज दाखल केले.

“आपण तटस्थपणे पुराव्याकडे बघितले तर इलियास ‘ट्रिपल टेस्ट डॉक्ट्राइन’नुसार जामिनासाठी पात्र ठरत होता,” असे सैफुद्दिन म्हणाले.

“इलियासच्या बाबतीत (१) पळून जाण्याचा धोका नाही; (२) इलियासकडे साक्षीदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतीही साधने आणि संसाधने नाहीत”; (३) इलियास पुराव्यात फेरफार करण्याच्या स्थितीत नाही.”

इलियासची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि तो त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे. तरीही न्यायालय त्याला जामीन देण्यास तयार नव्हते.

“दंगलीसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अनेक गरीब व निष्पाप व्यक्तींपैकी इलियास एक आहे,” असे भांंभानी म्हणाले. “यातील खरा प्रश्न ताब्यात घेतलेल्यांना न्यायालयात प्रभावी प्रतिनिधित्व मिळत आहे की नाही हा आहे. या प्रश्नाचे उत्तर जर नकारात्मक असल्यास या व्यक्तींपैकी एक जरी दोष ठरला, तरी तो कायद्याच्या मूलभूत तत्त्वांवर थेट हल्ला ठरेल.”

मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या दंगलींसंदर्भात जाणूनबुजून मुस्लिमांनाच अटक करण्याच्या कृत्यांमधून राजधानी परिसरातील पोलिसांचा पूर्वग्रह दिसून येतो. आणखी चिंताजनक अंग म्हणजे जामिनाच्या प्रकरणांना न्यायालये न्यायशास्त्राचे मूलभूत नियम लागू करत नाही आहेत. ‘बेल इज रुल, जेल इज अॅन एक्सेप्शन’ (जामीन हा नियम, तर तुरुंगवास हा अपवाद असतो) हा त्यातलाच एक नियम.

आम्ही भयभीत आहोत’

इलियासचे मेहुणे मुलसलीम यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या शांततामय जीवनावर दंगलींनी कायमचे ओरखडे उमटवले आहेत.

“दंगों के वक्त, हमने जब घर के अंदर से जय श्रीराम सुनाई दिया, उसमें कोई भक्ती नही थी, वह एक ऐलान था, जैसे कोई जंग करने आया हो,” मुरसलीम म्हणाले.

इलियासची बहीण परवीन दंगलींपासून बुरखा घालण्यास घाबरू लागली आहे. इलियासच्या लांब दाढीमुळेच त्याला अटक झाली असे मुरसलीम यांना वाटते. इलियासच्या आईची श्रवणशक्ती कमी झाली आहे. आपला गुन्हा नेमका काय होता, हा विचार इलियास कुटुंबियांसमवेत करत आहे.

दयालपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ तारकेश्वर सिंग यांच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत.

गोकुलपुरी पोलिस ठाण्याचे एसीपी अनुज शर्मा, दयालपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ तारकेश्वर सिंग आणि भजनपुरा पोलिस ठाण्याचे एसएचओ आर. एस. मीणा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलकांवर गोळीबार करताना बघितल्याचे एका तक्रारदार स्त्रीने नमूद केल्याचे कॅराव्हान मॅगझिनने दिलेल्या वृत्तांतात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0