नवी दिल्लीः शहरातील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीसंदर्भात दिल्ली पोलिसांनी विश्व हिंदू परिषद, दिल्ली बजरंग दल प्रांताच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी विहिंपच्या जिल्हा सेवा प्रमुखालाही अटक केली आहे.
त्याच बरोबर पिस्तुल दाखवणारी एक व्यक्ती सोनू चिकना यालाही सोमवारी अटक झाली. दंगलखोरांच्या घोळक्यात सोनू चिकनाकडे पिस्तुल होते व त्याने पिस्तुलातून गोळीबार केलेला एक व्हीडिओही व्हायरल झाला होता.
विहिंप, बजरंग दल दिल्ली प्रांत, मुखर्जी नगर जिल्हा, झंडेवाला यांनी पोलिस परवानगी न घेता रामनवमीला शोभा यात्रा काढली होती, त्या प्रकरणी पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर हनुमान जयंतीला उसळलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी विहिंपचा जिल्हा सेवा प्रमुख प्रेम शर्मा याला अटक केली असून जहांगीरपुरा येथील निवासी शेख हमीद यालाही अटक केली आहे. हमीद हा भंगार व्यावसायिक असून त्याने दंगलखोरांना बाटल्या पुरवल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू-मुस्लिम समुदायात दंगल उसळली. यात ८ पोलिस जखमी झाले तर अन्य ९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या २३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी ४ फोरेन्सिक पथकांनी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही फुटेज व डिजिटल मीडियाचे विश्लेषणही केले जात आहे.
COMMENTS