नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये गाय संवर्धन केंद्र (गोशाळा) स्थापन करण्यात आले असून या गोशाळेतून विद्यार्थ्यां
नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये गाय संवर्धन केंद्र (गोशाळा) स्थापन करण्यात आले असून या गोशाळेतून विद्यार्थ्यांना शुद्ध स्वरुपातील दूध, तूप, लोणी मिळेल असा दावा या कॉलेजच्या प्राचार्यांनी केला आहे. सध्या या गोशाळेत एक गाय असून तिच्यावर विविध अंगाने संशोधन करण्यात येईल असे प्राचार्य प्रा. रमा यांचे म्हणणे आहे. या गायींपासून मिळणाऱ्या शुद्ध दुधाचा व तुपाचा वापर कॉलेजमध्ये दरमहा करण्यात येणाऱ्या यज्ञात करता येईल असेही डॉ. रमा यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील हंसराज कॉलेज अत्यंत प्रसिद्ध असून सरकारच्या रॅंकिंग नुसार हे कॉलेज १४ व्या क्रमांकावर आहे. हे कॉलेज दयानंद सरस्वती ट्रस्टचे असून आर्य समाजाचे कॉलेज म्हणून हे प्रसिद्ध आहे. या कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी गायीवर संशोधन करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती गो-संवर्धन व संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले होते. या गोशाळेतून मिळणाऱ्या दूध, तुपाचा वापर दरमहा यज्ञ, होम-हवनात करण्यात येईल, विद्यार्थ्यांना शुद्ध दूध, तूप, दही मिळेल व विद्यार्थ्यांचा वाढदिवस दरमहा होणाऱ्या होमहवनाच्या निमित्ताने साजरा केला जाईल, असेही प्रा. डॉ. रमा यांचे म्हणणे आहे. भविष्यात गायीच्या शेणाचा उपयोग करण्यासाठी गोबर प्लँटही उभा करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. रमा म्हणाल्या.
पण या नव्या गोशाळेमुळे वाद निर्माण झाला आहे. कॉलेज व्यवस्थापनाने बांधलेली गोशाळा ही मुलींच्या वसतीगृहाच्या जागेवर बांधण्यात आल्याचा आरोप स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने केला आहे. हंसराज कॉलेजमध्ये सध्या केवळ मुलांसाठी वसतीगृह आहे. मुलींना वसतीगृह हवे म्हणून गेली कित्येक वर्षे चर्चा सुरू आहे. आता मुलींच्या वसतीगृहासाठी जमीन मिळाली आहे. पण या जागेवर गोशाळा बांधली जात असल्याबद्दल या संघटनेने तीव्र निषेध केला आहे. मुलांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा गायीवर संशोधनाचे प्राधान्य ठरवणाऱ्या कॉलेज व्यवस्थापनावरही विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत.
पण विद्यार्थी संघटनांचे आरोप प्रा. डॉ. रमा यांनी फेटाळले आहेत. वसतीगृहाची जागा अत्यंत अपुरी होती तेथे सध्या केवळ १०० विद्यार्थीच राहू शकतात. मुलींच्या वसतीगृहासाठी जागेसाठी क़ॉलेज व्यवस्थापन प्रयत्न करत असल्याचे प्रा. डॉ. रमा यांनी सांगितले.
मूळ वृत्त
COMMENTS