नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने व विरोधात गेल्या दोन दिवसांपासून जळत असलेला दिल्लीचा ईशान्य भाग मंगळवारीही धगधगत होता. या
नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने व विरोधात गेल्या दोन दिवसांपासून जळत असलेला दिल्लीचा ईशान्य भाग मंगळवारीही धगधगत होता. या भागात दंगलखोरांनी अनेक दुकाने फोडली, मोटारी अन्य वाहने जाळली व सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या हिंसाचारात आतापर्यंत १३ जण ठार झाले असून जीटीबी रुग्णालयात दीडशेहून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ५० टक्क्याहून अधिक जण बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झालेले आहेत. हा गोळीबार दोन्ही गटांकडून स्वैरपणे सुरू होता. पोलिसांनी या दंगलीसंदर्भात ११ फिर्यादी नोंद केल्या आहेत तर २० जणांना अटक केली आहे.
मंगळवारी उशीरा सरकारने दिल्लीतील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दिल्लीचे विशेष कमिशनर म्हणून एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती केली. श्रीवास्तव हे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. ते सध्याचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनायक यांच्याकडून २९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या पोलिस आयुक्ताचा कार्यभार स्वीकारतील.
तर मंगळवारी पोलिसांनी जाफ्राबाद रस्त्यावर सीएएविरोधातील आंदोलकांना हटवले आहे. मात्र चांद बाग भागात रात्री हिंसाचाराच्या घटना पुन्हा दिसून आल्या.
दरम्यान, ईशान्य दिल्लीतील परिस्थिती पाहता पोलिसांनी सुमारे महिनाभर येथे जमावबंदीचे १४४ कलम पुकारले आहे. विशेषत: या भागातील मौजपूरस कर्दमपुरी, चांद बाग, दयालपूर येथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी या भागांमध्ये शीघ्र कृतीदलाच्या जवानांनी संचलन केले.
रात्री ईशान्य दिल्लीतील काही भागात दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
अशोक विहारमध्ये मशिदीला आग लावण्याचा प्रयत्न
मंगळवारी ईशान्य दिल्लीतील अशोक विहारमध्ये एका जमावाने जय श्रीराम, हिंदुओं का हिंदुस्तान अशा घोषणा देत मशिदीला आग लावली तर काही युवकांनी मशिदीच्या मिनाऱ्यावर चढून हनुमानाचा झेंडा लावला.
मशिदीला आग लावत असताना जमावाकडून आसपासची दुकानेही फोडण्याचा व ती लुटण्याचाही प्रयत्न झाला. हा जमाव बाहेरून आला होता, असे त्या भागातल्या रहिवाशांचे म्हणणे होते. या भागात हिंदूंची वस्ती मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. नंतर अग्निशमन दलाने मशिदीला लागलेली आग विझवली. पण हे सगळे होत असताना दिल्ली पोलिस घटनास्थळी पोहचले नव्हते.
जमावाकडून काही पत्रकारांना मारहाण
ईशान्य दिल्लीतील दंगलीचे वृत्तांकन करणाऱ्या एनडीटीव्हीच्या तीन पत्रकार, एक कॅमेरामन व अन्य एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराला जमावाने मारहाण केली. एनडीटीव्हीचे पत्रकार अरविंद गुणशेखर यांना जमावाने अडवले व त्यांना घेरून त्यांच्या चेहऱ्यावर मारहाण केली. या मारहाणीत गुणशेखर यांचा एक दात पडला. गुणशेखर यांच्यावर जमावाकडून काठ्यांनीही मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाचवण्यासाठी एनडीटीव्हीचे दुसरे पत्रकार सौरभ शुक्ला मध्ये पडले तर त्यांनाही जमावाने काठ्यांनी मारले. सौरभ शुक्ला यांना बुक्क्याही मारण्यात आल्या पण हे दोघे कसेबसे तिथून निघून गेले.
एनडीटीव्हीच्या आणखी एक पत्रकार मरियम अल्वी यांनाही एका जमावाने पाठीत मारले. त्या पत्रकार श्रीनिवासन जैन यांच्यासोबत वृत्तांकन करत होत्या. त्यांच्या सोबत कॅमेरामन सुशील राठी उपस्थित होते.
जेके २४x७ न्यूजचे पत्रकार आकाश नापा हे दंगलीचे वृत्तांकन करत असताना त्यांना गोळी लागली. आकाश यांना तातडीने गुरु तेग बहादूर इस्पितळात भरती करण्यात आले.
वृत्तांकन करण्यास आलेल्या अनेक पत्रकारांना दंगलखोरांकडून धमकावण्यात येत असल्याचीही वृत्ते आहेत.
कर्दमपुरीमध्ये १४ वर्षाच्या मुलाला गोळी लागली
शाहदरा भागातील कर्दमपुरी येथे १४ वर्षाच्या फैजान याला कमरेत गोळी लागली, पण त्याला वेळेत उपचार मिळालेले नाही. फैजान रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे व त्याच्यावर स्थानिकांकडून प्राथमिक उपचार सुरू असल्याचे द वायरच्या प्रतिनिधींना दिसून आले. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते फैजानला उपचार मिळू नये म्हणून दिल्ली पोलिसांकडून रुग्णवाहिकेला बोलावण्यास टाळाटाळ केले जात होते. पण प्रत्यक्षदर्शींच्या या आरोपांची पुष्टी होऊ शकलेली नाही. रॅपिड अक्शन फोर्सच्या जवानांशी द वायरच्या प्रतिनिधींनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी फैजानला उपचार मिळतील असे आश्वासन दिले.
फैजान याच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते व तो त्याच्या आजीसोबत राहात होता. त्याचे वडील रामपूर येथे काम करतात. फैजानला गोळी लागल्याचे कळल्यानंतर त्याची आजी अत्यंत भयभीत झाली होती. फैजान कोणत्याही निदर्शनात सामील झाला नव्हता असे तिचे म्हणणे आहे.
COMMENTS