गेल्या आठवड्यात ‘क्लीन द नेशन’ (Clean the Nation) या फेसबुक ग्रुपला सोशल मीडियातील उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल ‘देवऋषी नारद पत्रकार सन्मान’ देऊन गौरवण्य
गेल्या आठवड्यात ‘क्लीन द नेशन’ (Clean the Nation) या फेसबुक ग्रुपला सोशल मीडियातील उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल ‘देवऋषी नारद पत्रकार सन्मान’ देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. संघपरिवाराशी निगडीत असलेल्या इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राकडून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर दोन दिवसानंतर ‘क्लीन द नेशन’ हा फेसबुक ग्रुप तयार करण्यात आला होता. पुलवामा हल्ल्यावर सोशल मीडियात जे कोणी मोदी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांना ‘देशद्रोही ठरवणे व देश साफ करणे’, या उद्देशाने हा ग्रुप जन्मास घालण्यात आला होता. पण दोन दिवसानंतर अनेकांच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर हा ग्रुप लगेचच बंद करण्यात आला. ट्विटर वर @CleanTheNation1 या हँडलचे ७० हजारहून अधिक फॉलोअर आहेत.
या पुरस्कारबाबत इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राचे सरचिटणीस वागिश इस्सार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, या ग्रुपचे देशाविषयीचे प्रेम पाहून आम्ही त्यांना हा पुरस्कार दिला आहे. अनेक जण देशावर प्रेम करतात पण या ग्रुपच्या सदस्यांच्या देशप्रेमात अधिक सक्रियता आहे.
‘क्लीन द नेशन’ने त्या दिवसांत फेसबुकवर सरकारविरोधात टीका करणाऱ्या ५० जणांच्या विरोधात ते देशद्रोही असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. हा ग्रुप आशुतोष वशिष्ठ यांनी तयार केला होता. ते या ग्रुपचे अॅडमिनिस्टर आहेत त्यांच्यासोबत अंकित जैनही काम करत होते. अंकित जैन यांना ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात ‘स्क्रोल. इन’ (Scroll.in) या संकेतस्थळाने ‘क्लीन द नेशन’ या फेसबुक ग्रुपबाबत एक वृत्तांत प्रसिद्ध केला होता.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांत ‘क्लीन द नेशन’कडून एक व्हिडिओ प्रसारित केला गेला. या व्हिडिओतून, ‘ही वेळ आपला डीपी बदलण्याची, हातात मेणबत्त्याही घेण्याची नाही’, असा संदेश या ग्रुपमधील एक सदस्य मधुर सिंग देत होते. मधुर सिंग यांनी भारतीय लष्कराचा गणवेशही परिधान केला होता. या गणवेशाच्या माध्यमातून, भारतीय जवानांवर हसणाऱ्या नोकरदारांच्या विरोधात मालकाकडे तक्रार करा, त्यांना नोकऱ्यांवरून बडतर्फ करा, विद्यार्थी असतील तर त्यांच्या विद्यापीठात तक्रार करा आणि त्यांचे शिक्षण बंद करा, असे आदेश मधुर सिंग देताना दिसत होते.
१९ फेब्रुवारीला भाजपचे पूर्व दिल्लीतील खासदार महेश गिरी यांनी ट्विटर ‘क्लीन द नेशन’च्या कार्याची स्तुती केली होती.
‘क्लिन द नेशन’ हा ग्रुप फेसबुकवर सुरू झाल्यानंतर काही तासांतच या ग्रुपने काश्मिरी विद्यार्थ्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. असंख्य महाविद्यालयांना त्यांनी लक्ष्य केले होते. गोहाटी येथील एका महाविद्यालयातील प्रा. पाप्री बॅनर्जी यांच्याविरोधात या ग्रुपने पोलिसांत तक्रार केली. त्यांना बलात्काराच्या व जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. पोलिसांनी त्यावेळी प्रा. बॅनर्जी यांच्याविरोधात दोन तक्रारीही नोंद करून घेतल्या होत्या. अखेरीस या धमक्यांना घाबरून प्रा. बॅनर्जी यांनी आपले घर सोडले. त्यांच्यावर बेतलेल्या या प्रसंगाचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. त्यानंतर महिन्याभराने त्या घरी परतल्या. प्रा. बॅनर्जी यांना त्यांच्या महाविद्यालयाने निलंबित करण्याचाही विचार केला होता.
राजस्थानमध्ये चार काश्मीरी तरुणांवर त्यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आणि महाविद्यालयाने त्यांना निलंबितही केले होते. पोलिसांनी या मुलांवर देशद्रोह, राष्ट्रविरोधी कारवायांचे आरोप ठेवले होते. नंतर तपासात पोलिसांना काही आढळले नाही. मुलांना महाविद्यालयात पुन्हा प्रवेश मिळाला.
जयपूरमध्ये विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिल्याबद्दल एका व्यक्तीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. सध्या ते जामिनावर आहेत.
ग्रेटर नॉयडा येथील आयआयएमटी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला फेसबुकवर लिखाण केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. या विद्यार्थ्याने आपण असे लिखाण केले नसल्याचा दावा केला होता. पोलिसांनाही या प्रकरणात काही आढळले नाही. पण हा विद्यार्थी अजूनही महाविद्यालयात आलेला नाही. त्याने परीक्षाही दिलेली नाही.
हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झाला.
मूळ बातमी
COMMENTS