कलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण !

कलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण !

वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पहाणार्‍या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यावधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक शत्रू ठरवू पाहाते आहे.

उदारमतवादाचा लेखाजोखा
धारावीतील कोरोना : भय, तडजोड, अनिश्चितता
बदलत्या भारतात प्रेमात पडणे धोकादायक

माझा जन्म १९३९ मधला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला, पण ती वर्षे काही जाणतेपणाची नव्हती. पण जसजशी जाणीव होऊ लागली तसतशी राज्यघटनेची संहिता आणि वास्तव यातल्या फटी जाणवू लागल्या. राज्यकर्ते आणि राजकारण यांनी निर्माण केलेल्या अनेक फटी टोचू लागल्या. अनेक मागास समाजगटांचे प्रश्न जाणवू लागले. आणीबाणीचा कालखंड येण्यापूर्वीही राज्यघटनेला धक्का पोहोचविणारे अनेक प्रसंग घडू लागले. आणीबाणीत तर कहर झाला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी काही करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचवेळी स्वातंत्र्याविषयी गाभ्याचा विचार करण्याची संधी मिळाली. संकट आले होते त्यामानाने ते लवकर नाहीसे झाले. पण मन हादरून टाकणारा अनुभव मिळाला.

आणीबाणीनंतर मन अधिक सजग झाले, स्वातंत्र्याचे पेच जाणवू लागले. नयनतारा सहगल यांनी प्रश्न विचारला आहे, “आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का? आपल्या आधी होऊन गेलेल्या, भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आपलीविविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्यात आहेत. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबींवर वाईटरित्या परिणाम करत आहेत. आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो, आणि अर्थातच आपण ईश्वराशी कसा संवाद करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.

वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमध्ये प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेषभूषा भिन्न आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्माचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कोणत्याही देशाला माहित देखील नाही.

नयनतारा सहगल यांनी वर्णन केलेले हे जे भारत नावाचे व्यवस्थापन आहे, आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पहाणार्‍या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यावधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक बाहेरचे शत्रू ठरवू पहाते आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणार्‍या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाहीप्रजासत्तक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला, केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्व समावेशक, तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या वा तिच्या श्रध्देनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते.

हा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधिमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधूभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. या उच्च, आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या ‘अखिल मानवजात समान आहे’ अशा आग्रहातून जातीव्यवस्थेविरुद्ध एक क्रांती सुरू झाली, ते थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च, आदर्श बाजूला सारण्यात आला आहे. अल्पसंख्यांक आणि हिंदूराष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा देणारे लोक रस्त्यांवरुन मोकाट फिरणार्‍या दुराग्रही लोकांचे लक्ष्य ठरत आहेत.

कलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण आहे. एक प्रसिद्ध रशियन प्रकरण आहे सोल्झोनित्सिन यांचे – त्यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली. नंतर त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. लेखकांवर अज्ञानमूलक आगपाखड होते आणि त्याहीपेक्षा भयंकर प्रसंग येतात.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात केवळ बुद्धिप्रामाण्यवादी असल्याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकर, साथी गोविंद पानसरे यांना बंदुकीच्या गोळया घालून ठार करण्यात आले. तर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी या अभ्यासकाला आणि गौरी लंकेश या पत्रकाराला बंदुकीच्या गोळ्यांना बळी जावे लागले. तर काही लेखकांना, कवींना केवळ जहरी टीकेला सामोरे जावे लागले, ज्यामुळे ते लेखकसंन्यास घेऊ इच्छितात. अनेक चित्रपट दिग्दर्शकांना अमुक दृश्य वगळा नाहीतर आम्ही तुमचे चित्रपट दाखवू देणार नाही अशी धमकी देण्यात येते. सेन्सॉरशिपची जणू काही वेगवेगळी मंडळे स्थापन झाली आहेत.

वैयक्तिक आयुष्यात विवाहासारख्या संस्कारांवर अनेक बंधने निर्माण झाली आहेत. जातीपातीची बंधने पाळली नाहीत तर हिंसक प्रतिक्रिया निर्माण होतात. मृत्यूदंड देण्याची शिक्षा होते आणि त्याला ऑनर किलिंग म्हटले जाते. हत्येमध्ये काहीच गौरव नाही याचे भानही राखले जात नाही. गोहत्या आणि गाईचे मांस खाणे हे केवळ अफवांच्या आधारे मुस्लिमांवर आरोप करून कायदा हातात घेणारे लोक उघडपणे माणसांना चेचतात. यामुळे हिंसाचाराच्या भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भय वातावरणात आहे. स्वराज्यातील ज्या संस्था आपापले स्वायत्त रुप सांभाळून, आपले नेटके विव्दत स्वरुप सांभाळून उभ्या असायला हव्यात त्यांचे सुलभीकरण होते. सत्ताधिशांच्या सोयीने त्यांचा विनीयोग होतो.

कलावंताला नाडणार्‍या या परिस्थितीविषयी नयनतारा सहगल सतत व्यक्त होत आल्या आहेत. त्यांना यवतमाळच्या संमेलनास उद्घाटक म्हणून आमंत्रित केले गेले. त्यांचे या परिस्थितीचे विलक्षण समीक्षण करणारे भाषण आयोजकांकडे आले. आयोजकांनी त्यांचे आमंत्रण का कोण जाणे रद्द केले. या विलक्षण घटनेची अनेक कारणे असू शकतील, त्यातील एकही वैध नाही. महाराष्ट्राला लज्जास्पद ठरणारी अशी ही घटना होती. आज आपण कलावंत एकत्र आलो आहोत ती एकापरीने क्षमायाचना आहे. पण त्याहीपुढे जाऊन आपल्याला एकत्र येऊन काही करायचे आहे.

महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर, साथी पानसरे यांच्या खुनानंतर सततच्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या. दक्षिणायनमध्ये गणेश देवींच्याबरोबर लेखक-कवींचा मोठा जथा सामिल झाला. ही काही आनंदचिन्ह होती. नयनतारा सहगल यांच्याविषयी खूपच प्रतिक्रिया आल्या. आता आपल्याला इथे थांबायचे नाही. अखिल भारतीय मराठी संमेलनातही काही प्रसादचिन्ह दिसतात. ग.त्र्यं.माडखोलकरांनी केलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, दुर्गा भागवतांनी संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षिय हस्तक्षेप करीत सर्वांना जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी करायला लावलेली प्रार्थना आणि विंदा करंदीकर यांनी सातारच्या संमेलनात केलेली गर्जना. विंदांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे पण त्यांच्या गर्जनेचे स्मरण सोयीस्करदृष्ट्या विसरले जाते. सातार्‍याला नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन चालू होते. या संमेलनाच्या समारोप सोहळ्याआधीचा कार्यक्रम नाट्यपूर्ण कलाटणी घेणारा ठरला. विंदांना मध्यप्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ प्राप्त झाला होता. त्या सत्काराला उत्तर देताना कबीराचे नाव घेण्याची आपली लायकी नाही हे त्यांनी सांगून टाकले. आपल्या धारदार आवाजात ते कडाडले “स्वातंत्रोत्तरकाळात आपल्या हातून जी पंचमहापातके घडली त्यातले गांधीहत्या हे पहिले महापातक आहे आणि बाबरी मशीद पाडणे हे पाचवे महापातक आहे” यानंतर संपूर्ण मंडप सुन्न झाला. विंदांचे भाकित खरे ठरले आहे. आपण त्या महाचुकीच्या परिणामस्वरूप अशा एका द्वेषपूर्ण कालखंडात आलो आहोत. वाद, मतभिन्नता यांना टोकाचे अर्थ प्राप्त झाले आहेत. लेखक एकटा पडत चालला आहे. तो वेगाने आपलं लिहिण्याचं स्वातंत्र्य गमावत चालला आहे.

२०१४ मध्ये नवं सरकार सत्तेत आलं, तेव्हा ओरिएंट, ब्लॅक स्वान, पेंग्विन इंडिया सारख्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपणहून आपल्या आक्षेपार्ह ठरू शकतील अशा पुस्तकांची यादी करून यांच्या प्रती आपल्या दुकानांतून नष्ट केल्या होत्या. याची लेखकाला खंत वाटते आहे का? आपल्या संकुचित होणार्‍या अवकाशाची सल त्यांना बोचते आहे का? साहित्यसंमेलनाच्या प्रसंगी हा प्रश्न नेमकेपणाने विचारला पाहिजे. एका बाजूला दक्षिणायन मधील लेखक पोलिस संरक्षणात फिरत आहेत याची जणीव या माध्यमांना क्वचित दिसते. त्याहूनही ती जनसामान्यांना क्वचित दिसते.

प्रश्न परत येणाऱ्या निवडणूकांचा नाही. कोणताही पक्ष  निवडून आला तरी वातावरण कमी जास्त तसे रहाणार. कारण साऱ्याच पक्षांनाराज्यघटनेतील मानवी स्वातंत्र्याविषयी चिंता कमी आहे. एकदा विस्कळित झालेली मूलभूत संस्था पुरेशी बांधीव होत नाही. प्रश्न मूलभूत स्वातंत्र्याचा आहे, समूह जीवनाच्या चारित्र्याचा आहे. समाजजीवनाच्या पोताचा आहे. या समाजजीवनाचा नैतिक पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. हे काम विचारवंतांनी, कलावंतांनी नेटाने करायला हवे. हे काम करताना तळातून येणाऱ्या हातात हात मिळवायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर संवादात पारदर्शकता हवी.

नयनतारा सहगल यांनी आपल्याला जागे केले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

पुष्पा भावे ह्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ आहेत. रस्त्यावर उतरुन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वैचारिक बळ पुरवण्याचे काम पुष्पाबाई सातत्याने करत असतात. गुंतागुंतीच्या प्रश्नांची वैचारिक मांडणी करत सामाजिक कार्याला एक सुस्पष्टता देत असतात. शोषित-वंचितांच्या नव्यानव्या प्रवाहांची दखल घेत असतात.  आपल्या याच वैचारिक योगदानातून पुष्पाबाई आज राज्यातल्या वेगवेगळ्या चळवळींशी जोडलेल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: