एकटं असण्यासाठी एकत्र येऊ या!

एकटं असण्यासाठी एकत्र येऊ या!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यावर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं हत्यार आहे. समाजातले आवाज असलेले लोकच सामान्य माणसाच्या हिताचे खरे चौकीदार आहेत. ते जेव्हा गाफिल रहातात तेव्हा चोर त्यांच्या वेशात शिरतात किंवा अनेकदा यांच्यातलेच काही महाभाग चोरांना सामील होतात.

बेरोजगारीत ‘अग्नीवीर’ची आग
राज्यातील राजकीय संकट सर्वोच्च न्यायालयात
किंमती वाढल्याने भूतानकडून बटाटा आयात

आपण आज इथे सारे एकत्र जमलो आहोत, ही अतिशय चांगली आणि उल्लेखनीय घटना आहे परंतु तिला कारणीभूत ठरलेली गोष्ट लाजिरवाणी आहे. हा एक विचित्र विरोधाभास आजच्या कार्यक्रमाच्या मुळाशी आहे याची जाणीव मला आहे. कोणी असं म्हटलं की, अपमान झाल्याशिवाय मराठी माणसं एकत्र येत नाहीत, तर ते फारसं चुकीचं असणार नाही.

मागच्या वेळी एका सत्ताधीशाने साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. तेव्हाही नांगीवर पाय पडल्यासारखे साहित्यिक पेटून उठले होते. आता कोणी असंही म्हणेल की, मराठी लोक अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला एकत्र येतात की नाही? तर येतात. पण त्याचवेळी राजकीय कृपाछत्राखाली आणि धनिकांच्या पैश्यांवर चालणारी अखिल भारतीय साहित्य संमेलनं ही त्यांचे हितसंबंध दुखवणार्‍या आणि त्यांना प्रश्न करणार्‍या साहित्यिकांचा अपमान करण्याची पूर्ण क्षमता राखून असतात, हेही आपण जाणून असायला हवं. आपली इस्त्रीदार घडी मोडू न देण्याची अभिजनवादी परंपरा राखण्याचा ती आटोकाट प्रयत्न करतात.

आता आखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक झाल्याचा दावा केला जातो. तसा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सर्व जातींना सामावून घेऊन आणि आदिवासींनाही सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक झाल्याचा दावा करतो. पण ह्या संस्थांचा मूळ ढाचा तोच असतो. त्यामुळे अशा संमेलनांचे प्रेरणास्त्रोत असणारे थोर समाजसेवक न्या. रानडे यांना त्यांच्या पहिल्या ग्रंथकार सभेचं आमंत्रण नाकारताना महात्मा जोतिराव फुले यांनी विचारलेले प्रश्न अजून तसेच आहेत. मी महात्मा फुल्यांचा वारसा मानतो. त्यामुळे मलाही काही प्रश्न पडतात.

त्याकडे वळण्यापूर्वी मी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो.

प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. आम्ही राज्य घटनेला बाधा येवू देणार नाही असं आता जाहीरपणे म्हणू लागलेले लोकच गेली चार वर्ष घटनेने दिलेल्या आचार, विचार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत. मला काही वर्षांपूर्वीची एक घटना आठवते आहे. टीव्हीवरच्या ‘टाइम्स नाऊ’ चॅनलवर अर्णब गोस्वामी यांनी भारतातील सर्वात मोठे चित्रपट अभिनेते आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळीही अर्णब गोस्वामी आरडाओरडा करण्यासाठी प्रसिद्ध होते, तरी आजच्या इतके स्वैर आणि उघड पक्षपाती नव्हते. त्यांनी अमिताभ बच्चन यांची अत्यंत संयमित स्वरात मुलाखत घेतली. मुलाखतीला निमित्त होतं ते महाराष्ट्र राज्य सरकारने लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीविरोधी कायद्याचं.

अर्णब गोस्वामी बच्चन यांना विचारत होते, सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे? त्यावर बच्चन म्हणाले, काही नाही. कायदा केला आहे म्हणजे तो चांगलाच असणार. तुमची यावर काय भूमिका आहे? पुढचा प्रश्न. बच्चन म्हणतात, काहीच नाही. त्यावर अर्णब विचारतात, तुम्ही कधीच काही भूमिका घेत नाही. असं का? बच्चन म्हणतात, तुला सांगतो अर्णब, आपण काही बोललो की त्यावर लोक टीका करतात. फोन करतात. असंख्य प्रश्न विचारतात. मीडियावर चर्चा सुरू होते. खूप त्रास होतो त्याचा. मला दुसर्‍या दिवशी सकाळी कॅमेर्‍यासमोर प्रसन्न मुद्रेने उभं राहायचं असतं. वेगवेगळ्या भूमिकांना सामोरं जायचं असतं. माझं ते काम आहे. पण तेच कठीण होवून जातं. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. त्यामुळे मी कुठल्याही लफड्यात पडत नाही. अगदी हेच शब्द नसतील, पण अमिताभ बच्चन यांच्या स्पष्टीकरणाचा गाभा हाच होता.

आपली प्रसन्नता जपण्यासाठी आणि चेहर्‍यावरचं निर्मळ हसू अबाधित राखण्यासाठी देशातल्या सर्वोच्च अभिनेत्याला गप्प राहायचं होतं. आपल्या अनेक लेखक-कलावंतांची हीच भूमिका असते. त्यांना वास्तव माहीत नसतं किंवा माहीत करून घ्यायचं नसतं.

लिओ तोलस्तोय आपल्या ‘व्हॉट इज अॅन आर्ट’ या पुस्तकात एक मार्मिक प्रश्न करतात. ते म्हणतात, कलेसाठी कलावंत जीवनाचा होम करतात. ते हुशार असतात, बुद्धिमान असतात. पण ते जी कलानिर्मिती करतात त्या कलेची साधनं निर्माण करण्यासाठी असंख्य मजूर कष्ट करत असतात. गवंडी, चित्रकार, रंगारी, शिंपी, न्हावी, धोबी, परीट, जवाहीरे आणि असे शेकडो प्रकारचे व धंद्यातले लोक आपली आयुष्यं कलांसाठी लागणार्‍या साहित्याच्या निर्मितीत खर्च करीत असतात. केवळ कलेच्या निर्मितीसाठीच नव्हे तर कलावंतांना ऐषआरामी जगता यावं म्हणूनही असंख्य लोक कष्ट उपसत असतात. कलावंतांना, कलेला धनिकांचा किंवा सरकारचा आश्रय मिळतो तेव्हा ते पैसे सामान्य माणसाच्याच खिशातून आलेले असतात. या सगळ्याची जाण जर कलावंताला नसेल तर त्याच्या कलेचा सर्वांगीण विकास होणार नाही. मग त्याच्या कलेला कला म्हणता येईल काय?

अमिताभ बच्चन यांच्यासारखे महान समजले जाणारे कलावंत जेव्हा सर्व सामान्य रसिकांनी दिलेलं स्टारपण जाहीरपणे मिरवतात आणि त्याचवेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या गोष्टींबाबत सोयिस्कर मौन बाळगतात तेव्हा त्यांची कृती ही आत्मवंचना ठरते. केवळ लेखक-कलावंतच नव्हे तर शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, वकील, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पत्रकार अशा ज्यांना ज्यांना समाजात आवाज आहे त्यांनी बाळगलेलं मौन म्हणजे सत्ताधार्‍यांना आणि सत्तेला अंकित असलेलल्या व्यवस्थांना सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांची लूट करण्याचा दिलेला परवाना ठरतो. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यावर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं हत्यार आहे. समाजातले हे आवाज असलेले लोकच सामान्य माणसाच्या हिताचे खरे चौकीदार आहेत. ते जेव्हा गाफिल रहातात तेव्हा चोर त्यांच्या वेशात शिरतात किंवा अनेकदा यांच्यातलेच काही महाभाग चोरांना सामील होतात.

मला असं वाटायला लागलं आहे की, शत्रू तिकडे दिल्लीच्या संसदेत किंवा मंत्रालयात किंवा कुठल्या पक्षाच्या, संघटनेच्या कार्यालयात बसलेला नसून तो आपल्या जवळच वावरतोय. तो या सभागृहात असेल, कदाचित आपल्या शेजारच्या खुर्चीत असेल किंवा शक्यता अशी आहे की तो आपल्या आतच असेल.

कवि गजानन माधव मुक्तिबोध म्हणाले होते, ‘अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने होंगे, तोडने होगे मठ और गढ सब’॰ पण या मठी आणि गढ्यांच्या आड व्यवस्थेने इतक्या भिंती शिताफीने उभ्या केल्या आहेत की आपल्याला आता मठी आणि गढ्याच दिसत नाहीत. या भिंतींच्या रक्षणासाठी अशा माणसांच्या फौजा उभ्या केल्या आहेत ज्यांच्या आयुष्यात अभावच अभाव भरून राहिला आहे. याच अभावग्रस्त माणसांसाठी आपण भांडत होतो का, असा प्रश्न पडावा आणि मती गुंग व्हावी अशी परिस्थिति आहे. म्हणजे तुमच्याच माणसांना किवा तुम्हालाच तुमच्या विरोधात झुंजवत ठेवायची युक्ति सत्तेने आणि सत्तेला अंकित असणार्‍या व्यवस्थांनी चालखीने अवगत केली आहे. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई अतिशय अवघड झाली आहे.

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका गरीब मुस्लिम मजुराला जाळणारा आणि जाळिताचा व्हिडिओ व्हायरल करणारा हिंदू तरुणही तितकाच गरीब आणि अभावग्रस्त जीवन जगणारा असतो. फक्त मेलेला देशद्रोही ठरवला गेलेला असतो आणि मारणारा देशभक्त मानला जातो. मेलेल्या इसमाच्या बिरादरीचे लोक स्थलांतरित, आगतिक, भयग्रस्त आणि हलाखीत जगणारे असतात आणि मारणार्‍याला धर्माभिमानी म्हणून मिरवत, त्याच्या प्रतिमेचे फलक अभिमानाने गावात लावणारे त्याचे दोस्त-बिरादर हेही गरीब, बेकार, निराश आणि जगण्याचा उद्देश हरवलेले तरीही उन्मादी  झालेले असतात. त्यांच्यात फरक एवढाच असतो की एक गट ‘देशद्रोही’ म्हणून ओळख चिकटवलेला असतो तर दूसरा ‘देशभक्त’ म्हणून मिरवत असतो. राष्ट्रावादाची अदृश्य पोलादी भिंत दोघांत उभी असते. तिच्यापुढे गरीबी, बेकारी, स्थलांतर हे प्रश्न दिसेनासे होतात. ही भिंत आता हिमालयापेक्षाही उंच गेली आहे. ती इतकी उंच गेली आहे की हिमालयापलीकडून शत्रू येत असल्याची आवई जरी उठली तरी देशांतर्गत युद्धाचा भडका उडेल.

अशावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई खूपच गुंतागुंतीची आणि कल्पनातीत झाली आहे. तिला तोंड देण्यासाठी आपण स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे. आपणच उभारलेल्या भिंती तोडायला पाहिजे आणि आधी आपल्याआतच असलेल्या दबावांशी झुंज घेतली पाहिजे. मला माझ्याशीच भांडता येईल का? माझ्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारता येतील का? माझ्या समाजात, जातीत होणार्‍या अन्यायाच्या विरोधात बोलता येईल का? माझ्याच घरातल्या पुरुषीवर्चस्वातून होणार्‍या अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार करता येईल का? मला माझ्यावर होणारी टीका निकोप मनाने स्वीकारता येईल का? मला दुसर्‍याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता येईल का? हे प्रश्न निकडीचे आणि तातडीचे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथूनच सुरू होतं आणि व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचं बळ देतं, असं मला वाटतं. अन्यथा ही लढाई तत्कालिक ठरून संपूनही जाईल.

माझी लेखक म्हणून असलेली भीती वेगळी आहे. ती आजच्या अपूर्व परिस्थितीत दडलेली आहे. मला ठाऊक आहे की आज अनेक लेखक बोलत आहेत, काही कलावंत उघडपणे देशातल्या परिस्थितिविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. आज आपण इतक्या प्रमाणावर एकत्र आलो आहोत, हे देखील याच उद्वेगाचं एक उदाहरण आहे. मी असं मानतो की, लेखक लिहितो तेव्हा तो त्याला गवसलेलं सत्य मांडत असतो. भले ते लहान असलं तरी ते त्याचं सत्य असतं. त्याला जगण्यातली, मानवी संबंधांतली काही रहस्यं उलगडलेली असतात, काही कोडी पडलेली असतात, तो ती समोर ठेवत असतो. तो त्याला दिसलेलं, जाणवलेलं वास्तव परिणामकारक शब्दांच्या वापरातून उभं करत असतो. यांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही विधान करत असतो. तो त्याचा आतला आवाज असतो. तो सापडावा म्हणून त्याची धडपड असते. म्हणजेच सत्याच्या दिशेने लेखक निघालेला असतो. पण आज असत्याचा आवाज इतका मोठा झाला आहे की सत्य आपला स्वरच गमावून बसलंय की काय असं वाटू लागलंय.

आपल्या देशाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या प्रभावळीतल्या लोकांनी असत्याचा एकच गजर मांडला आहे. सध्याचं युग हे काही विचारवंतांच्या मते ‘पोस्ट ट्रूथ’ युग आहे. या युगाचं लक्षण असं सांगितलं जातं की, यात लोक सत्य किंवा वास्तव याच्यापेक्षा श्रद्धा आणि भावनांना जास्त महत्त्व देतात आणि त्यांनाच मानतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यानंतर केलेला असत्याचा बेसुमार वापर हे ‘पोस्ट ट्रूथ इरा’चं ठळक उदाहरण मानलं जातं. अशी परिस्थिती जगातील ज्या ज्या देशांमध्ये आहे त्यांत भारताचा समावेश केला गेला आहे. ‘पोस्ट ट्रूथ पॉलिटिक्स’ असा शब्द प्रयोगच अस्तित्वात आला आहे. म्हणजे तुमच्या देशात सरकार निवडणुकांच्या माध्यमातूनच स्थापन होईल, पण या निवडणुका जाहिरात कंपन्या लढवतील. त्या तुमची मनोभूमिका निश्चित करतील. त्यांना जे हवं आहे तेच सत्य म्हणून सांगितलं जाईल. तसंच वातावरण निर्माण केलं जाईल.

आपल्या देशाच्या संदर्भात विचार करता हिंदू युग संकल्पना ही सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुग अशा चार युगांत विभागली गेलेली आहे. सध्याचं युग हे कलियुग मानलं जातं. ‘गोपी’ सिनेमात गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी रामाचा हवाला देत दिलीप कुमारच्या तोंडून कलियुगाचं सांगितलेलं वैशिष्ट्य सर्वांना माहितीच आहे. ‘हे रामचंद्र कह गये सीया से, ऐसा कलियुग आयेगा, हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खायेगा’. पण आता ही अवस्थाही मागे पडली आहे. आता कौवाच हंस दिसू लागला आहे. हा विश्वसनीय वाटावा असा दृष्टीभ्रम आहे. पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाणी दाखवणारी ‘महाभारता’त मयासुराने उभी केलेली मयसभा ही अपवादात्मक होती, पण आता ती कायमची स्थिति झाली आहे. ही पोस्ट कलियुग अवस्था आहे. किंवा आपण याला उत्तर कलियुग म्हणू. पण अगदी अचूक शब्द योजायचा झाला तर हे ‘असत्य युग’ आहे.

आपले राष्ट्रप्रमुख हे युगकर्ते आहेत, हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी असत्याला अशा अस्मानी उंचीवर नेऊन ठेवलं आहे की तिथवर सत्याचा आवाज पोचणंच दुष्कर झालं आहे. या असत्य युगातला राम आणि त्याचं रामायण वेगळं आहे. आपणच वाल्मिकी असल्याच्या थाटात अनेक वाल्या सभोवताली आहेत. नारदाची म्हणजे मीडियाची शेंडी त्यांच्या हातात आहे. ते ‘राम राम’ म्हणतात पण प्रत्यक्षात ते ‘मरा मरा’ असं ऐकू येतं. अशा अभूतपूर्व मायावी युगात लेखकाला सत्य सांगायचं असेल तर ते त्याने कसं सांगावं? पोस्ट मॉडर्निस्ट म्हणतील की, सत्याचा अंत झाला आहे. पण ते खरं नाही. आज असत्यच सत्य म्हणून सांगितलं जातंय. समजलं जातंय आणि सत्य भूलभुलैयात गुमराह झालंय. ते कुणाला सापडू नये, सापडलं तर सांगितलं जाऊ नये, याचा बंदोबस्त केला जातो आहे. ही बांधबंदिस्ती ओळखून जे लेखक आपण बैल आहोत असं मान्य करतील त्यांना गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याखाली अभय असेल. वृद्धापकाळात अथवा संकटकाळात त्यांच्यासाथी चारा छावण्या उभारण्याची हमीही दिली जाईल. पण जे हे मान्य करणार नाहीत त्यांच्यासाठी प्रत्येक वाट बिकट करून ठेवली जाईल.

अशा भयानक गोंधळाच्या आणि संघर्षमय परिस्थितीत आव्हान स्वीकारायचं असेल तर अभिव्यक्तीचे आपले आतले गोंधळ मिटवीत एकमेकांच्या साथीने उभं राहण्याची आणि तगून राहण्याची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. लेखक निर्मितीच्या पातळीवर एकटा असतो. तो तिथे कुणाचाही, अगदी स्वत:चाही असत नाही. तीच त्याची खरी शक्ति आहे. हे एकटेपणाचं स्वातंत्र्य अबाधित राखून किंबहुना त्यासाठीच सर्वांनी एकत्र यायला हवं. या विधानातही एक विरोधाभास आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या मुळाशी एक विरोधाभासी स्थिती आहे, तसाच विरोधाभास या विधानातही आहे. पण एकूणच जगण्यात इतके अंतर्विरोध निर्माण झालेले आहेत की काहीच निखळ राहिलेलं नाही.

या स्थितीतून मार्ग काढण्यासाठीच आपण एक असू या, एकटं असणं शक्य व्हावं यासाठी एकत्र येवू या. तसा विश्वास आपण एकमेकांत निर्माण करू शकू, अशी आशा व्यक्त करून थांबतो.

जयंत पवार हे मराठीतील समकालीन साहित्यविश्वातील महत्त्वाचे नाटककार, कथाकार, पत्रकार आहेत. त्यांनी  गेली साडेतीन दशके वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा आणि कलासंस्कृतीची चिकित्सा केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0