दिलदार उद्योगपती

दिलदार उद्योगपती

अब्जावधी डॉलरची संपत्ती असलेले अझीम प्रेमजी विदेशात गेल्यानंतर कोणत्याही हॉटेलमध्ये न राहता कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये राहतात. एअरपोर्टला टॅक्सी किंवा रिक्षाने जातात. त्यांचे राहणीमानही अत्यंत साधे. आपण कमावलेली संपत्ती समाजाला सढळ हाताने परत द्यावी, समाजाचे ऋण फेडावेत असा दृष्टीकोन आयुष्यभर जोपासणारे हे व्यक्तिमत्व. असे दानशूर अझीम प्रेमजी येत्या जुलैमध्ये निवृत्त होत आहेत, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा..

“आपल्यापैकी ज्यांच्याकडे, संपत्ती मिळविण्याचा विशेषाधिकार आहे, त्यांनी लाखो लोकांसाठी चांगले जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी लक्षणीय योगदान दिले पाहिजे, अशी कायम आशा बाळगतो” – अझीम प्रेमजी .

महान उद्योजकांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी. असे अनेक गुण त्यांनी ध्येय मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात उतरलेले असतात हे आज आपण उद्योजकांमध्ये जवळून पाहतो आहोत. जगात भारताचे प्रतिनिधित्व करणारे असे मोठे उद्योजक अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. या यादीतील विप्रो उद्योग समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचं नाव आपल्याला अभिमानाने घेता येईल. नुकतेच त्यांनी ३० जुलै रोजी निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. एखादा उद्योगपती निवृत्त होणे हा काही खूप मोठा चर्चेचा विषय होऊ शकत नाही; परंतु अझीम प्रेमजींची निवृत्ती याला अपवाद आहे. कारण ते उद्योगपतींच्या साचेबद्ध प्रतिमेत बसणारे नाहीत, अझीम प्रेमजी एक दानशूर उद्योगपती आहेत. गेली ५३ वर्षे विप्रो कंपनीची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, मेहनत अशी ‘विप्रो’ उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आणि दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. ‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या यादीनुसार अझीम प्रेमजी यांच्याकडे १,१२० कोटी डॉलरची संपत्ती आहे. ते जगातील ९१वे अब्जाधीश (बिल्येनयर) आहेत. त्यांनी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती शिक्षण कार्यासाठी तर त्यांच्या मालकीचे २१३ दशलक्ष किमतीचे शेअर्स समाज कार्यासाठी दान करण्याचे ठरविले. ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा विनियोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या ‘गिव्हिंग प्लेज’ नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिलेच भारतीय उद्योजक आहेत. २००१ पासून त्यांची ‘अझीम प्रेमजी फाउंडेशन’ ही संस्था त्यासाठीच कार्यरत आहे. मार्च २०१९मध्ये त्यांच्या शेअर्समधला ३४% हिस्सा समाजकार्यासाठी दान करणार असल्याचे घोषित केले, जो २०१५ मध्ये १८% होता. शिक्षण हा त्यांचा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे प्रेमजी यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकी विषयाचे उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले होते. कोणालाही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहायला मिळू नये, असा त्यांचा ध्यास आहे. म्हणूनच ते अनेक शिक्षण संस्थांच्या मदतीला धावून जातात.

तांदूळ ते सॉफ्टवेअर

२४ जुलै १९४५ रोजी अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात झाला. प्रेमजी यांचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात अनेक देशांत तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत होते. त्यांची अनेक देशांत तांदूळाचा व्यापार करण्यासाठी कार्यालये होती. त्यांना ‘राईस किंग’ म्हणूनही ओळखले जात होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपल्या देशप्रेमामुळे अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी हे पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत न होता भारतातच राहिले. बॅरिस्टर जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. जिना यांनी मोहम्मद हशेम प्रेमजी यांच्याशी पाकिस्तानात येण्यास विचारपूस करूनही ते जिनांच्या दबावाला बळी पडले नाहीत. भारतात त्यांचा ‘वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स’ या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून ‘विप्रो’ हा शब्द तयार झाला .
प्रेमजी अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी यांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी खूप लहान होती. तेव्हा अझीम अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवीचे शिक्षण घेत होते. १९६६मध्ये कंपनीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.

वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनीचा मोठा विस्तार होत गेला. आपल्यासारखे अनेक उद्योग पुढे येत होते, अनेक तंत्रज्ञान येत होते हे पाहून अझीम यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त गोष्टी घेतल्या. नव्या तंत्रज्ञानाची पारख करून तांदूळ, साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. विप्रो टेक्नॉलॉजिस, विप्रो प्लुइडपॉवर, लायटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, इकोएनर्जी, मॉड्युलर फर्निचर अशा अनेक कंपन्या काढल्या. यासाठीची लागणारी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी टिकणारी माणसे निवडणे प्रेमजींसाठी आव्हानात्मक काम होते.

जागतिकीकरणाच्या लाटेत झोकून देणारा साहसवीर

८० च्या दशकात भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी आणखी एक मार्ग दाखवला, तो म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीचा. हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेकने, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक पातळीवर आपली छाप उमटवण्यास सुरुवात केली.

-१९८८मध्ये विप्रोने हेव्ही ड्युटी इंडस्ट्रियल सिलेंडर आणि मोबाइल हायड्रॉलिक सिलेंडर याचाही आपल्या उत्पादन लाइनमध्ये सहभाग केला. वैद्यकीय क्षेत्रात उपकरणे तयार करणारी ‘जनरल इलेक्ट्रिकल’ या अमेरिकन कंपनीशी करार करून १९८९मध्ये विप्रो वैद्यकीय क्षेत्रातही उतरली.

-१९९२मध्ये ‘विप्रो फ्लुइड पॉवर डिव्हिजन’ने बांधकाम उपकरणे आणि ट्रक टिपिंग सिस्टिमसाठी मानक हायड्रोलिक सिलेंडर ऑफर करण्याची क्षमता विकसित केली.

-१९९०मध्ये ‘संतूर’ टॅल्कम पावडर आणि बेबी टॉयलेटरीजची ‘विप्रो बेबी सॉफ्ट’ अशी उत्पादने सुरू करण्यात आली, जी आजही लोकप्रिय आहेत.
बरोबरच विप्रो सॉफ्टवेअरला जगभरातून ग्राहक मिळत होते. विप्रो सॉफ्टवेअरसुद्धा झपाट्याने वाढत होती. विप्रोसारख्या भारतीय आयटी कंपन्यांमुळे भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक प्रकारची क्रांती आली होती. १९९५ मध्ये विप्रोच्या उत्पादन निर्मिती आणि वाढता विकास पाहून विप्रोला ‘आयएसओ ९००१’ नामांकन मिळाले. १९९९ मध्ये विप्रोने सुपरजीनिअस पर्सनल कॉम्प्यूटर्स निर्माण करून जागतिक स्तरावर आपला वेगळा ठसा निर्माण केला. २०००मध्ये विप्रोला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले. फेब्रुवारी २००२मध्ये सॉफ्टवेअर सेवा आणि तंत्रज्ञानामधील विप्रो ही ‘आयएसओ १४००१’ प्रमाणित होणारी भारतातील पहिली कंपनी बनली. विप्रो प्रचंड वाढत होती, एका अभ्यासात दिसून आले की, १९९७ ते २००० या ५ वर्षात वेगवान संपत्ती निर्माण करणारी विप्रो एकमेव कंपनी होती. २००४मध्ये विप्रोची उलाढाल १ अब्ज डॉलर्सच्या घरामध्ये झाली. त्यातच ‘आई-शिक्षा’ या गरिबांना मदत करणाऱ्या योजनेसाठी विप्रोने इंटेलबरोबर भागीदारी केली. विप्रोने अनेक अमेरिकन आणि युरोपियन लहान कंपन्या विकत घेतल्या. बरोबरच जर्मनीतील नोकिया सीमेन्स नेटवर्क्ससह संशोधन भागीदारी करार केला. २००८ मध्ये, विप्रोने इको एनर्जीसह स्वच्छ ऊर्जा व्यवसायातही प्रवेश केला. विप्रो सध्या १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची कंपनी आहे. विप्रोमध्ये १ लाख ७० हजार कर्मचारी काम करतात. जगभरात ५४ देशात विप्रोची कार्यालये आहेत. मुख्य कार्यालय बंगळूरू येथे आहे.

साधी राहणीमान व निगर्वी

 अझीमजी यांचं राहणीमान अगदी साध्या पद्धतीचं आहे. त्यांना स्वतःच्या संपत्तीचा कसलाही गर्व नाही. एकदा ऑफिसला आल्यानंतर एका कर्मचाऱ्याने अझीमजींच्या गाडीच्या जागेवर स्वतःची गाडी पार्क केली म्हणून त्या कर्मचाऱ्याला पहारेकऱ्यांनी विरोध केला. अझीमजी ऑफिसला आल्यानंतर म्हणाले “गाडीसाठी ज्याला जी जागा मिळेल त्या जागी प्रत्येक कर्मचारी आपली गाडी पार्क करू शकतो. मला त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची असेल, तर मला ऑफिसला इतरांपेक्षा लवकर यायला पाहिजे.”

विदेशात गेल्यानंतर अझीमजी कोणत्याही हॉटेलमध्ये न राहता कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये राहतात. एअरपोर्टला टॅक्सी किंवा रिक्षाने जातात.

१९८७मध्ये कर्नाटकमधील विप्रोच्या तुमकूर कारखान्यामध्ये विजेचे कनेक्शन घेण्यासाठी अझीमजींना एका सरकारी कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. अझीमजी यांनी लाच देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “नियमाने वीज मिळत नसेल, तर आम्ही स्वतःची वीज तयार करू.” मग विप्रोने जनरेटरने काम चालवले. याच्यासाठी किमान १.५ करोड रुपयांचा खर्च झाला.

१९७७मध्ये एकदा विप्रोच्या बेंगळुरुतील ऑफिसमध्ये रामनारायण अग्रवाल नावाची व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी आली. ऑफिसमध्ये कोणीच नसल्याने तो व्यवस्थापनामधील लोकांची वाट पाहत होता. तितक्यात एक व्यक्ती येवून ऑफिसचे दरवाजे-खिडक्या उघडू लागला, जारमध्ये पाणी भरू लागला. रामनारायण अग्रवालला वाटले की, हा कोणी स्वच्छता करणाऱ्यांपैकी असेल. अग्रवालचा इंटरव्ह्यू सुरु झाल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितले, ‘मी अजीम प्रेमजी आहे.’

अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित

अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून अझीम प्रेमजी यांनी कर्नाटकात अझीम प्रेमजी विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले आहे. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता असे सर्व प्रकारचे काम लक्षात घेऊन २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०११मध्ये ‘पद्मविभूषण’ या उच्च नागरी पुरस्काराने गौरविले आहे. अशाच त्यांच्या योगदानामुळे २००९मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. २००० साली ‘एशिया विक’ने त्यांची जगातील २० सर्वाधिक सामर्थ्यवान पुरुषांच्या यादीत निवड केली. ‘टाइम’ने २००४ मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते.

आंतराराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्रात भारताची वेगळी ओळख निर्माण करण्यास अझीम प्रेमजी यांचा मोलाचा वाटा आहे. नवीन युवकांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी अनेक रोजगार उपलब्ध केले. भारत सरकार ‘डिजिटल इंडिया’ साकारत असताना अझीम प्रेमजी विप्रोच्या आणि समाजकार्याच्या माध्यमातून यासाठी अामूलाग्र मदत करत आहेत. अझीम प्रेमजी अनेक लहान-मोठ्या उद्योजकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. अझीमजी आजही आवर्जून सांगतात, की “‘तुमच्या मनात व्यवसायाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवा, कारण दहा चुकीच्या कल्पनांनंतर एक सुंदर कल्पना अशी असेल की त्यामागे तुमचे यश दडलेलं असेल आणि त्यापासून मिळालेलं समाधान विलक्षण असेल. प्रयत्न न करणे हा स्वतःचा सर्वात मोठा पराभव असतो.”

गणेश आटकळे पत्रकार आणि लेखक आहेत.

COMMENTS